पंतप्रधान कार्यालय
व्लादिवोस्टोक दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनाचा अनुवाद (04, सप्टेंबर 2019)
Posted On:
05 SEP 2019 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2019
महामहीम अध्यक्ष पुतिन ,
मित्रहो ,
नमस्कार ,
दोब्री वेचर.
संपूर्ण जगात जिथे सर्वप्रथम पहाट होते, जिथे दुर्दम्य संघर्षावर आपल्या रशियन मित्रांनी मिळवलेला विजय संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला आहे आणि जिथे 21 व्या शतकात मानव विकासाच्या नवनवीन यशोगाथा लिहिल्या जात आहेत, अशा व्लादिवोस्टोक या कर्मभूमीत येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. आणि माझे परम मित्र अध्यक्ष पुतिन यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे हे शक्य झाले आहे. याबद्दल मी माझे मित्र अध्यक्ष पुतिन यांचे मनापासून आभार मानतो. या निमंत्रणामुळे व्लादिवोस्टोकला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनण्याचे सौभाग्य मला लाभले, त्याबद्दलही मी अध्यक्ष पुतिन यांचा आभारी आहे.
हा सुखद ऐतिहासिक योगायोग आहे की, भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या 20 व्या वार्षिक शिखर परिषदेत अध्यक्ष पुतिन आणि मी सहभागी झालो. 2001 साली रशियात प्रथमच भारत-रशिया शिखर परिषद झाली, तेव्हा माझे मित्र पुतिन रशियाचे अध्यक्ष होते आणि तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबर भारतीय प्रतिनिधिमंडळात गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी सहभागी झालो होतो. अध्यक्ष पुतिन आणि माझ्या या राजकीय प्रवासादरम्यान उभय देशांमध्ये मैत्री आणि सहकार्य वेगाने वृद्धिंगत झाले. या काळात आमच्या विशेष आणि विशेषाधिकारात्मक भागीदारीमुळे केवळ आमच्या देशांचे धोरणात्मक हित साध्य झाले नाही तर दोन्ही देशांच्या लोकांचा विकास झाला आणि त्यांना प्रत्यक्ष लाभ देखील झाला. विश्वास आणि सहभागाच्या माध्यमातून अध्यक्ष पुतिन आणि मी हे संबंध सहकार्याच्या नव्या उंचीवर नेले आहेत आणि यातून केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक बदल देखील झाला आहे. एक, आम्ही सहकार्याला सरकारी परीघातून बाहेर आणून लोकांची तसेच खाजगी क्षेत्राची अमाप ऊर्जा त्यात जोडली. आज आम्ही डझनभर व्यापार करार केले.
संरक्षणासारख्या धोरणात्मक क्षेत्रात देखील रशियन उपकरणांच्या सुट्या भागांची दोन्ही देशांच्या संयुक्त उपक्रमांद्वारे भारतात निर्मिती करण्याबाबत झालेल्या करारामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. हा करार आणि यावर्षीच्या सुरुवातीचा AK-203 हा संयुक्त उपक्रम खरेदीदार-विक्रेत्याच्या मर्यादित कक्षेबाहेर जाऊन आमच्या संरक्षण सहकार्याला सहनिर्मितीचा मजबूत आधार देत आहेत. भारतात रशियाच्या सहकार्याने होत असलेल्या अणुप्रकल्पांच्या वाढत्या स्थानिकीकरणामुळे या क्षेत्रातही खऱ्या अर्थाने भागीदारी विकसित होत आहे. दुसरे म्हणजे, आम्ही आमचे संबंध राजधान्यांच्या बाहेरील भारतातील राज्ये तसेच रशियातील प्रांतांकडे नेत आहोत. ही आश्चर्याची बाब नाही कारण एक तर मी गुजरातचा दीर्घकाळ मुख्यमंत्री होतो आणि अध्यक्ष पुतिन यांनाही रशियाच्या प्रादेशिक क्षमतांची आणि संधींची माहिती आहे. म्हणूनच हे स्वाभाविक आहे की त्यांनी पौर्वात्य आर्थिक परिषद आयोजित केली आणि भारतासारख्या वैविध्याने नटलेल्या देशाला याच्याशी जोडण्याचे महत्व ओळखले. याची कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच वाटेल.
त्यांचे निमंत्रण मिळाल्यानंतर लगेचच आम्ही गांभीर्याने तयारी सुरु केली. यासाठी भारताचे वाणिज्य मंत्री, 4 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 150 हून अधिक उद्योजक व्लादिवोस्टोक इथे आले आहेत. सुदूर पूर्वेचे विशेष दूत आणि तिथल्या सर्व 11 प्रशासकांबरोबर झालेली चर्चा खूप फलदायी ठरली. राज्ये आणि प्रांतांमधील संबंधांना चौकट लाभली. कोळसा, हिरे, खाणकाम, दुर्मिळ धातू, कृषी, लाकूड, कागद आणि पर्यटन या क्षेत्रातील अनेक संभाव्य संधी समोर आल्या. आणि आता उभय देशांमधील प्रांतांना परस्परांशी जोडण्यासाठी चेन्नई आणि व्लादिवोस्टोक दरम्यान सागरी मार्गाचा प्रस्ताव सुचवण्यात आला आहे. तिसरे, आम्ही आमच्या द्विपक्षीय सहकार्यात खूप वैविध्य आणले आहे आणि त्यात नवे आयाम जोडले आहेत. आजकाल भारत आणि रशिया दरम्यान केवळ तेल आणि वायू सौदेच नाही तर परस्परांच्या हायड्रोकार्बन क्षेत्रातील अभूतपूर्व गुंतवणूक ही प्रमुख आणि ठळक बातमी बनली आहे. या क्षेत्रात सहकार्यासाठी 5 वर्षांचा आराखडा, सुदूर पूर्वेकडे आणि आर्क्टिक भागात हायड्रो कार्बन आणि एलएनजी शोधकार्यात सहकार्य करण्याबाबत सहमती झाली. अंतराळ क्षेत्रातील आमचे दीर्घकालीन सहकार्य नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. गगनयान म्हणजेच भारतीय मानवसहित अंतराळ यानासाठी भारताच्या अंतराळवीरांना रशियाकडून प्रशिक्षण मिळणार आहे. परस्पर गुंतवणुकीच्या सर्व संभाव्य संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही लवकरच गुंतवणूक संरक्षण करार करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. भारताचा 'Russia Plus Desk' आणि रशियाच्या सुदूर गुंतवणूक आणि निर्यात संस्थेचे मुंबई कार्यालय परस्पर गुंतवणुकीकडे लक्ष देतील.
मित्रहो,
आमच्या धोरणात्मक भागीदारीमध्ये नवे अध्याय जोडले जात आहेत. दोन्ही देशांमधील 'इंद्र -2019' या तिहेरी दल कवायती आमच्यातील वाढता विश्वास आणि भरोशाचे प्रतीक आहे. जेव्हा गरज असते तेव्हा भारत आणि रशिया जगातील सामान्य ठिकाणीच नाही तर अंटार्क्टिका आणि आर्क्टिक येथेही एकत्रितपणे काम करतात. आजच्या युगात शांतता आणि स्थैर्यासाठी बहु -ध्रुवीय जग आवश्यक असल्याचे दोन्ही देश जाणून आहेत.
याच्या निर्मितीत आमचे सहकार्य आणि समन्वय महत्वाची भूमिका पार पाडेल. म्हणूनच, आम्ही सहजतेने ब्रिक्स, एससीओ आणि इतर जागतिक मंचांवर घनिष्ठ सहकार्य करतो आहोत. आज आम्ही बहुतांश प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर खुली आणि अर्थपूर्ण चर्चा केली.
मुक्त, सुरक्षित, अखंड, शांत आणि लोकशाही असलेला अफगाणिस्तान भारताला पाहायचा आहे. आम्ही दोघेही कुठल्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाच्या विरुद्ध आहोत. आम्ही भारताच्या मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत संकल्पनेवर सार्थक चर्चा केली. सायबर सुरक्षा, दहशतवादाचा बिमोड, पर्यावरण संरक्षण यासारख्या क्षेत्रात भारत आणि रशिया सहकार्य अधिक मजबूत करतील, यावर आमचे सहमत झाले. पुढल्या वर्षी व्याघ्र संवर्धनावर उच्चस्तरीय मंचाचे आयोजन करण्याबाबत भारत आणि रशियाचे एकमत झाले.
हे निमंत्रण आणि स्वागत सत्काराबद्दल पुन्हा एकदा माझे मित्र अध्यक्ष पुतिन यांचे मी खूप-खूप आभार मानतो. उद्या त्यांच्याबरोबर आणि माझ्या अन्य मित्र नेत्यांबरोबर पौर्वात्य आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मी उत्सुक आहे. पुढल्या वर्षी भारतात होणाऱ्या वार्षिक परिषदेसाठी मी अध्यक्ष पुतिन यांची प्रतीक्षा करेन. 2020 साली रशिया एससीओ आणि ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवणार आहे. मला विश्वास आहे की अध्यक्ष पुतिन यांच्या नेतृत्वाखाली या संघटना यशाचे नवे विक्रम प्रस्थापित करतील. यासाठी भारताचे आणि माझे वैयक्तिक पूर्ण सहकार्य राहील.
खूप -खूप धन्यवाद
स्पासिबा बल्शोई
B.Gokhale/M.Pange/P.Kor
(Release ID: 1585443)
अभ्यागत कक्ष : 118