माहिती आणि प्रसारण मंत्रालय

नूतनीकरण करण्यात आलेल्या जयकर बंगल्याचे एनएफएआय येथे आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन


चित्रपट संशोधकांसाठी डिजिटल चित्रपट ग्रंथालय आणि चित्रपट पाहण्यासाठी जागा

Posted On: 15 SEP 2019 5:12PM by PIB Mumbai

पुणे, 15 सप्टेंबर 2019

 

पुण्याच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जयकर बंगला या वारसा स्थळाचे उद्‌घाटन आज माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) पुणे येथे करण्यात आले. या बंगल्यात एक डिजिटल चित्रपट ग्रंथालय असेल जिथे चित्रपट संशोधकांना संग्रहातील वैभवशाली चित्रपटविषयक माहिती उपलब्ध होईल. तसेच एनएफएआयच्या संग्रहातील चित्रपट पाहण्याची खासगी जागा देखील उपलब्ध आहे. जावडेकर यांनी ‘परंपरा : ऐन ओड टू जयकर बंगलो’ ही विशेष पुस्तिका प्रकाशित केली ज्यात  बंगल्याच्या इतिहासाबरोबरच त्याच्या जीर्णोद्धाराची कथा आहे. एफटीआयआयच्या मुलींच्या वसतिगृहाचा भाग म्हणून जयकर बंगल्यात वास्तव्य केलेल्या शबाना आझमी आणि रेहाना सुल्तान यांच्यासह काही नामांकित चित्रपट कलाकारांनी सांगितलेले अनुभव हे या पुस्तिकेचे खास वैशिष्ट्य आहे. एनएफएआयमध्ये चित्रपट पाहण्यासाठी वेळ आरक्षित करण्यासंबंधी मोबाइल अ‍ॅप देखील सुरू केले.

जावडेकर म्हणाले की, जयकर बंगल्याला पुण्याच्या कला आणि स्थापत्य क्षेत्रात विशेष स्थान आहे आणि आता जीर्णोद्धार झाल्यानंतर चित्रपट संशोधकांच्या हितासाठी याचा उपयोग केला जात आहे. याप्रसंगी खास उपस्थित असलेल्या बॅरिस्टर एम. आर. जयकर यांची पणती प्रसन्ना गोखले यांचा त्यांनी सत्कार केला. इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल सीसीडब्ल्यू आणि संवर्धन-जतन पथकासह एनएफएआय टीमची त्यांनी प्रशंसा केली.

1940 च्या दशकात प्रसिद्ध राष्ट्रीय नेते, संविधान सभा सदस्य आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर एम. आर. जयकर यांनी हा बंगला बांधला होता. काळाच्या ओघात बंगल्याची मालकी बॅरिस्टर जयकरांकडून इंडियन लॉ सोसायटीकडे, नंतर एफटीआयआय आणि त्यानंतर एनएफएआयकडे गेली. 1973 पासून, एनएफएआय त्याच्या आवारात कार्यरत आहे.

ट्यूडोर शैलीतील वास्तुशास्त्रानुसार बांधलेला बंगला जो मुख्यत: ग्रेट ब्रिटनमध्ये आढळतो, तशाच प्रकारचा पुण्यात आहे. उत्कृष्ट रचना असलेल्या या बंगल्यात लाकडी फ्लोअरिंग, अरुंद लाकडी पायऱ्या, ब्रिटिश वास्तुशास्त्राचे वैशिष्ट्य आणि जवळजवळ छतापर्यंत पसरलेली भव्य पुस्तकांची कपाटे आहेत.  दोन मजली बंगला लोड-बेअरिंग सिस्टममध्ये बांधला आहे.

1990 च्या दशकात संग्रहालयाच्या बऱ्याच घडामोडी सध्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्यामुळे गेली अनेक वर्ष बंगल्याचा बराचसा भाग वापरातच नव्हता. त्यामुळे कायापालट घडवून आणण्यासाठी नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय झाला.  नूतनीकरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण नियम संपूर्ण प्रकल्पात लागू करण्यात आला तो म्हणजे वाया जाणाऱ्या सामानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा. पहिल्या टप्प्यात, नंतर बांधकाम केलेले बदल काळजीपूर्वक काढण्यात आले. ज्यामुळे या इमारतीला बऱ्याच वर्षांनंतर मोकळा श्वास घेता आला. वास्तूचे वारसा महत्व अबाधित ठेवत, सध्याचा काळ आणि भविष्यातील उपयोगांचा विचार करून नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. बंगला त्याच्या शक्य तितक्या मूळ स्वरूपात नव्याने बांधण्यात आला आहे आणि त्याचा अनुकूल पुनर्वापर केला आहे.

जुना वैभवशाली काळ परत आणण्यासाठी आम्हाला त्यात अद्वितीय वास्तुकला आणि सौंदर्य पुन्हा जोडायचे होते. वारसा वास्तूचे संवर्धन करणे आणि ते समकालीन बनविणे हा उद्देश होता, जेणेकरून ते नागरिक आणि चित्रपट प्रेमींसाठी सुलभ होऊ शकेल. डिजिटल लायब्ररी आणि चित्रपट पाहण्याची खासगी जागा ही या दिशेने उचललेली पावले आहेत. ही जागा सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनावे अशी आमची इच्छा आहे, जिथे चित्रपट प्रेमी येऊन अर्थपूर्ण संभाषणांमध्ये सहभागी होतील असे एनएफएचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1585123) Visitor Counter : 150


Read this release in: English