पंतप्रधान कार्यालय

मोतिहारी -अमलेखगंज (नेपाळ) पाईपलाइनचे पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन

Posted On: 10 SEP 2019 5:25PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2019

 

पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी आज संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सीमा पार जाणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्या पहिल्या पाईपलाइनचे उदघाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आज संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतातील मोतिहारी ते नेपाळमधील अमलेखगंज दरम्यान  दक्षिण आशियाच्या पहिल्या सीमेपार जाणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्या पाईपलाइनचे उदघाटन केले.

यावेळी नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी या  महत्वपूर्ण संपर्क प्रकल्पाच्या जलद अमलबजावणीबद्दल प्रशंसा केली. हा प्रकल्प निर्धारित वेळेच्या बराच आधी पूर्ण झाला आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले कि 69 किलोमीटर लांबीच्या मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइनमुळे नेपाळच्या जनतेला  किफायतशीर दरात स्वच्छ पेट्रोलियम उत्पादने  उपलब्ध होतील. या पाईपलाइनची क्षमता वार्षिक दोन दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. नेपाळमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या किमती २ रुपये प्रति लिटरने कमी करण्याच्या पंतप्रधान ओली यांच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले.

उच्च राजनैतिक पातळीवर नियमित आदानप्रदानामुळे भारत-नेपाळ भागीदारी विस्तारण्यासाठी एक सकारात्मक कार्यक्रमाची पायाभरणी झाली आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत आणि नेपाळ दरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील आणि विविध क्षेत्रात त्यांचा विस्तार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान ओली यांनी पंतप्रधान मोदी यांना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले जे मोदी यांनी स्वीकारले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1584688) Visitor Counter : 130


Read this release in: English