पंतप्रधान कार्यालय
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या नियंत्रण कक्षातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Posted On:
07 SEP 2019 2:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2019
भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय,
तुम्ही ती माणसं आहात जी भारत मातेसाठी, तिच्या विजयासाठी जगता, तिच्या विजयासाठी अविरत कष्ट करता, तुम्ही ती माणसं आहात, ज्यांच्या मनात भारत मातेसाठी विशेष भावना आहेत. भारत मातेची मान उंचावण्यासाठी तुम्ही जीवन खर्ची घालता, त्यासाठी आपली स्वप्ने समर्पित करता.
मित्रांनो, मला काल रात्री तुमची मनःस्थिती समजत होती, आपले डोळे खूप काही बोलत होते, तुमच्या चेहऱ्यावरची निराशा मी वाचू शकत होतो. म्हणून मी जास्त वेळ तुमच्यासोबत थांबलो नाही. कित्येक रात्री तुम्ही झोपला नव्हतात. तरीही मला वाटत होतं की पुन्हा एकदा सकाळी आपल्याला बोलवावं, आपल्याशी बोलावं. या अभियानाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती वेगळ्याच अवस्थेत होती. मनात अनेक प्रश्न होते. मोठं यश मिळालं की त्यासोबत पुढची वाटचाल होते. आणि अचानक सगळा अंधार होतो, काहीही दिसायचं बंद होतं. मी देखील तो क्षण तुमच्यासोबत जगलो. जेंव्हा संपर्क तुटल्याचा संदेश आला, तेंव्हा तुम्ही सगळे हादरून गेला होतात. मी बघत होतो, सर्वांच्या मनात स्वाभाविक प्रश्न निर्माण झाला होता. का झालं, कसं झालं आणि वैज्ञानिकांचं मन तर मुळातच प्रत्येक गोष्टीचा विचार का? ह्या प्रश्नाने सुरु करत. अनेक अपेक्षा होत्या. मी बघत होतो, त्यानंतरही आपल्याला वाटत होतं, अरे यार, काही तरी होईल, कारण त्यामागे आपले परिश्रम होते, प्रत्येक क्षण अन क्षण तुम्ही अपार कष्ट केलेत.
मित्रांनो, आज भलेही काही अडचणी आल्या असतील, अडथळे आले असतील. पण यामुळे आमची हिंमत कमी होणार नाही, उलट आणखी दृढ झाली आहे. आज भलेही अगदी शेवटच्या पावलावर अडथळा आला, पण यामुळे आम्ही आपल्या मार्गावर ठामपणे उभे आहोत. भलेही आज आपण योजनेप्रमाणे चंद्रावर उतरू शकलो नाही. जर एखाद्या कवीने, साहित्यिकाने आजच्या घटनेविषयी लिहिलं असतं..तर वेगळंच वर्णन केलं असतं, मात्र विज्ञानाची भाषा, वैज्ञानिक विचारपद्धती वेगळी असते. पण कला आणि साहित्याच्या भाषेत कुणाला लिहायचं झालं तर तो नक्की लिहेल, आपण चंद्राचं इतकं वर्णन केलं आहे, इतकं रोमँटिक वर्णन केलं आहे, तर चांद्रयानावर देखील त्याचा परिणाम झाला असेल. आणि यासाठीच शेवटच्या क्षणी, चांद्रयान चंद्राला मिठी मारायला धावून गेलं असेल. कवी असंच म्हणतील.... आज चंद्राला स्पर्श करण्याची, चंद्राला कवेत घेण्याची आमची इच्छाशक्ती आणि संकल्प आणखी दृढ झाला आहे, प्रबळ झाला आहे.
भारतातील बंधू आणि भगिनींनो, माझ्या वैज्ञानिक मित्रांनो, गेले काही तास पूर्ण राष्ट्र जागे होते. आमच्या महत्वाकांक्षी अंतराळ मिशनवर असलेल्या वैज्ञानिकांना साथ द्यायला जागे होतो.
आम्ही अगदी जवळ पोहोचलो होतो. पण येणाऱ्या काळात आपल्याला आणखी मेहनत करवी लागणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना आणि आत्मविश्वास आहे. आमचा अंतराळ कार्यक्रम, आमचे वैज्ञानिक, त्यांचे परिश्रम आणि दृढनिश्चय यामुळेच केवळ आपल्या नागरिकांनाच नव्हे तर इतर देशाच्या नागरिकांचे आयुष्य देखील सुखकर झाले आहे.
वैज्ञानिकांच्या परिश्रमामुळेच अनेक लोकांना आज चांगल्या आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा मिळत आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे. देशाला विश्वास आहे की़ अभिमान आणि आनंद वाटावा अशा अनेक संधी भविष्यात तुमच्यामुळे पुन्हा मिळतील, धन्यवाद. आणि आपल्या अंतराळ कार्यक्रमातील सर्वोत्तम कामगिरी अजून व्हायची आहे असा, आम्हाला विश्वास आहे.
अजून नवी क्षितिजं शोधायची आहेत, नव्या सीमा ओलांडायच्या आहेत, आणि आम्ही हे करणारच.
मला आमच्या वैज्ञानिकांना सांगायचं आहे, की संपूर्ण भारत देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही एकमेवाद्वितीय आहात आणि देशाच्या प्रगतीमध्ये तुमचा अमूल्य वाटा आहे.
तुम्ही नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केली आहे, आणि भविष्यातही आम्हाला आनंदाचे अनेक क्षण देणार आहात. आपल्या स्वभावाला साजेशी कामगिरी करत तुम्ही अशा ठिकाणी पोहोचले आहात, जेथे आजवर कुणीच गेलं नाही.
तुम्ही लोण्यावर नव्हे तर, दगडावर रेघ ओढणारे लोक आहात.
तुम्ही ध्येयाच्या अगदी जवळ आला आहात. शांत राहा आणि पुढे चला. मी आपल्या अवकाश संशोधकांच्या कुटुंबांचे देखील अभिनंदन करतो. त्यांचा शांत पण मोलाचा पाठिंबा ही मोठी संपत्ती आहे.
बंधू आणि भगिनींनो, लवचिकता आणि तपश्चर्या ही भारतीय संस्कृतीचा गाभा आहेत. हजारो वर्षांच्या आपल्या गौरवशाली इतिहासात आपल्या वाटचालीत अनेक अडथळे आले पण त्यामुळे आपला उत्साह तसूभरही कमी झाला नाही. आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊन नेत्रदीपक गोष्टी केल्या आहेत. ह्यामुळेच आपली संस्कृती ताठ मानेने उभी आहे.
माझ्या प्रिय मित्रांनो, अंतिम ध्येयाइतकेच तिथवरचा प्रवास आणि प्रयत्न देखील महत्वाचे असतात. मी अभिनामानाने सांगू शकतो, की तुमचे प्रयत्न आणि प्रवास दोन्ही समाधानकारक होता. आपल्या चमूने खूप परिश्रम घेतले. खूप लांबचा पल्ला गाठला आहे, आणि या प्रवासात मिळालेले ज्ञान सदैव आपल्यासोबत राहील. आपण ह्या प्रवासाचे सिंहावलोकन मोठ्या समाधानाने करु. आज आपण जे शिकलो त्यातून आपण अधिक मजबूत बनू. लवकरच नवी पहाट होईल.
मित्रांनो, परिणामांनी खचून न जाता, ध्येयाकडे निरंतर वाटचाल करणे ही आपली परंपरा आहे, आणि आपले संस्कार देखील. आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात असे अनेक उदाहरणं आहेत. सुरुवातीच्या काळात अनेक अडथळे येऊन सुद्धा आपण ऐतिहासिक यश प्राप्त केलं आहे.
कधीही हार न मानण्याच्या संस्कृतीचं जिवंत उदाहरण म्हणजे खुद्द इस्रो. जर सुरवातीच्या काळातील आव्हाने आणि समस्यांना घाबरून आपण हार मानली असती तर, आज इस्रो जगातील अग्रगण्य अंतराळ संस्थांमध्ये जागा मिळवू शकली नसती.
मित्रांनो, निकाल आपल्या जागी आहे, पण मला आपले वैज्ञानिक, अभियंते, आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान आहे. मी आपल्याला रात्री सांगितलं होतं, आणि आत्ता देखील सांगतो. मी आपल्या सोबत आहे, देशही आपल्या सोबत आहे.
मित्रांनो, प्रत्येक समस्या....प्रत्येक संघर्ष....प्रत्येक अडथळा आपल्याला काही तरी नवीन शिकवतात. काही नवे शोध, नवे तंत्रज्ञान निर्माण करण्याची प्रेरणा देतात आणि यावरच आपले भविष्यातले यश अवलंबून असते. तसंही, विज्ञान हा सर्वात मोठा शिक्षक आहे असं मी मानतो. विज्ञानात अपयश नसतंच. फक्त प्रयोग आणि प्रयत्न असतात. प्रत्येक प्रयोग, प्रत्येक प्रयत्न ज्ञानाचे नवीन बीजारोपण करतो. नवीन शक्यतांची पायाभरणी करतो आणि आपल्या अमर्याद सामर्थ्याची जाणीव करून देतो.
मित्रांनो, चांद्रयानाच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा भलेही अपेक्षेप्रमाणे झाला नसेल. पण आपण हे विसरता कामा नये, की चांद्रयानाचा हा प्रवास गौरवास्पद होता. या अभियानाच्या काळात देशाला अनेकदा आनंदाचे क्षण मिळाले आहेत. अभिमान वाटला आहे. ह्या क्षणी देखील आपलं ऑरबिटर दिमाखात चंद्राभोवती परिक्रमा करत आहे. ह्या पूर्ण अभियानाच्या काळात, मी देशात असो व परदेशात, चांद्रयानाशी संबंधित माहिती घेतच होतो.
मित्रांनो, आज भारत जगातील महत्वाची अंतराळ शक्ती बनला आहे, त्यामागे आपण सर्वांची दशकांचे...... ज्या साथीदारांनी इस्रोमध्ये काम केलं आहे त्यांचे ......परिश्रम आहेत, त्यांचे योगदान आहे. तुम्हीच ते लोक आहात ज्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळावर भारताचा तिरंगा फडकवला. यापूर्वी जगात असं कुणीच करू शकलं नव्हतं. आमच्या चांद्रयानानेच चंद्रावर पाणी असल्याची अतिशय महत्वपूर्ण माहिती जगाला दिली. तुमच्या प्रयत्नांमुळेच आपण शंभरपेक्षा जास्त उपग्रह अवकाशात सोडण्याचा नवा विक्रम केला. जेंव्हा इस्रो खुद्द यशाचा विश्वकोश आहे, तेंव्हा असे क्षणिक अडथळे आले म्हणून तुमचे उड्डाण भरकटवू शकत नाही.
मित्रांनो, ‘वयम् अमृतस्य पुत्र:’, या आपल्या विचाराने आपले संस्कार, आपली तपश्चर्या, आपले विचार व्यापले आहेत. आपण अमृताचे पुत्र आहोत, ज्याच्या सोबत अमृत आहे. अमृताच्या पुत्राला ना कुठला अडथळा आणि ना कुठली निराशा! जे झालं, त्यामुळे आपण निराश व्हायचं नाही. ह्यातून धडा घ्यायचा आहे, शिकायचं आहे, पुढे जात राहायचं आहे आणि यश मिळेपर्यंत थांबायचं नाही. आपण नक्की यशस्वी होणार, अभियानाच्या पुढच्या प्रयत्नात आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश मिळणार आहे.
21व्या शतकात भारताची स्वप्नं आणि आकांक्षांची पूर्तता करण्यापासून आपल्याला क्षणिक अडथळे थांबवू शकत नाही. पुढील अभियानासाठी आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. मी आधी म्हणालो देखील, विज्ञान निकालांवर समाधानी होत नाही, नवीन प्रयोगांचा शोध आणि प्रयत्न सुरूच राहतात. प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न हे विज्ञानाचे उपजत गुण आहेत. निकालांतून देखील नव्या संधी शोधल्या जातात. निकालांवर विज्ञान थांबत नाही, आणि अपयशाने खचूनही जात नाही. आणि हे आपले संस्कार आहेत. आणि म्हणूनच देशाला आपला अभिमान आहे. मला आपल्यावरही विश्वास आहे, आपली स्वप्नं माझ्यापेक्षा खूप मोठी आहेत, माझ्यापेक्षा आपले संकल्प खूप मोठे आहेत. आणि हे ध्येय गाठण्याचे आपले सामर्थ्य माझ्यापेक्षा देखील खूप मोठे आहे. आणि म्हणूनच मला आपल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे...... मी इथे आपल्याला उपदेश करायला आलेलो नाही. सकाळी सकाळी आपल्या दर्शनाने प्रेरणा घेतो आहे. आपण प्रेरणेचा अथांग सागर आहात, प्रेरणेचं मूर्त रूप आहात. आणि म्हणूनच हे माझ्यासाठी प्रेरणादायी क्षण आहेत, जिथे वैज्ञानिक मन निराशेला आशेत परिवर्तीत करते. म्हणूनच अशा सामर्थ्यवान, उर्जावान, संकल्पवान, ध्येयाला समर्पित ह्या मित्रांचं खूप खूप अभिनंदन करतो, अनेक अनेक शुभेच्छा देतो.
अनेक अनेक धन्यवाद
भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय,
अनेक अनेक धन्यवाद !
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1584526)
अभ्यागत कक्ष : 149