माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रपतींच्या ‘लोकतंत्र के स्वार’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या निवडक भाषणांच्या संग्रहाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन
भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही मात्र कुणी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ- उपराष्ट्रपती
ई- बुक स्वरुपात वाचण्यासाठी किंडल आणि ॲप स्टोअरवर ही पुस्तके उपलब्ध- माहिती आणि प्रसारण मंत्री
Posted On:
06 SEP 2019 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2019
नवी दिल्लीत प्रवासी भारतीय केंद्र येथे आयोजित एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘लोकतंत्र के स्वार (खंड-2)’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक (आवृत्ती-2)’ ही पुस्तके प्रकाशित केली. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळातल्या दुसऱ्या वर्षात (जुलै 2018 ते जुलै 2019) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेली 95 भाषणं या पुस्तकांमध्ये संकलित करण्यात आली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रकाशन विभागाने ही पुस्तके छापली आहेत.

या भाषणांमध्ये नवभारताचा आराखडा असून देशाचा दूरदर्शीपणा, आकांक्षा आणि नीतीमूल्य अधोरेखित केल्याचे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले. तरुण नोकरशहांसाठी राष्ट्रपती प्रेरणास्रोत राहिले असून या पुस्तकांच्या माध्यमातून राष्ट्रपतींचे विचार आणि कल्पना युवा पिढीपर्यंत पोहचतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपतींच्या भाषणातील ‘वसुधैव कुटुंबकम्’ तत्वज्ञान अधोरेखित करत उपराष्ट्रपती म्हणाले, “संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, यावर भारताचा विश्वास आहे. त्यामुळेच भारताने कधीही कुठल्या देशावर हल्ला केला नाही. मात्र एखाद्या देशाने हल्ला केलाच तर त्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल.”
राष्ट्रपतींनी आपले जीवन सामाजिक न्यायासाठी समर्पित केले ज्याचे प्रतिबिंब या पुस्तकांमधल्या भाषणात दिसते असे केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत म्हणाले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशन विभागाची प्रशंसा केली. ई-बुक स्वरुपात वाचताना प्राधान्य देणाऱ्यांसाठी ही पुस्तके किंडल आणि ॲप स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध केली जातील असे जावडेकर म्हणाले.
या भाषणांमुळे राष्ट्रपतींचे विचार जगभरातील लोकांपर्यंत पोहचतील असे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे म्हणाले.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1584325)
Visitor Counter : 176