नौवहन मंत्रालय
येत्या पाच वर्षात लॉजिस्टिक खर्च जागतिक सरासरीच्या 9 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी सरकार वचनबद्ध-केंद्रीय नौवहन मंत्री
किनारपट्टी नौवहन , अंतर्गत जलमार्ग आणि क्रूझ पर्यटन यांचे भांडवल करणे आवश्यक
नौवहन महासंचालनालयाचा 70 वा वर्धापनदिन साजरा
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2019 8:30PM by PIB Mumbai
मुंबई, 3 सप्टेंबर 2019
केंद्रीय नौवहन मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज मुंबईत नौवहन महासंचालनालयाचा (डीजीएस) ७० वा वर्धापनदिन सोहळ्याचे उदघाटन केले. संचालनालयाने आयोजित केलेल्या " भारतीय सागरी प्रशासन, ७० वर्षे-आगामी काळातील स्वप्ने" या विषयावरील परिषदेला संबोधित करताना मांडवीय म्हणाले कि नवभारताच्या निर्मितीत सागरी क्षेत्र महत्वाची भूमिका पार पाडू शकते. येत्या पाच वर्षात भारतीय उद्योग क्षेत्राचा लॉजिस्टिक खर्च जागतिक सरासरीच्या 14 टक्के वरून 9 टक्के पर्यंत खाली आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. यामुळे आपली निर्यात 25 टक्के वाढण्यास आणि किमतीही 2.5 टक्के कमी होण्यास मदत होईल असे ते म्हणाले. मुंबईत पवई इथल्या शिपिंग कार्पोरेशनच्या सागरी प्रशिक्षण संस्थेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यांनी सागरी उद्योगाच्या विविध हितधारकाना सांगितले की किनारपट्टी नौवहन, जहाज दुरुस्ती आणि देखभाल, क्रूझ पर्यटन आणि अंतर्गत जलमार्ग यांसारख्या संधींचे भांडवल करणे गरजेचे आहे. अंतर्गत जलमार्ग आणि किनारपट्टी नौवहन,यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा खर्च कमी होईल असे ते म्हणाले. समस्या सोडवण्यात लवचिकता आणि संशोधनाच्या महत्वावर भर देत ते म्हणाले कि तंत्रज्ञानामुळे घाबरून जाऊ नका. तंत्रज्ञान संधी निर्माण करते आणि स्पर्धेचा धैर्याने सामना करायला हवा, तीच यशाची गुरुकिल्ली आहे.

जहाज बांधणी करणारे आणि किनारपट्टी भागात नौवहन करणाऱ्यांसाठी भांडवली खर्च कमी करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार भारतीय कंपन्यांना परदेशी जहाजांच्या संचलनासाठी दीर्घकालिन चार्टरची अनुमति देण्याबाबत विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे छोट्या उद्योजकांना मदत मिळेल आणि किनारपट्टी नौवहनाचा विकास होईल असे ते म्हणले. सरकार स्थिर , उद्योग -स्नेही आणि संपत्ती निर्माण करणार्यांना मदत करणारे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सुधारणा, संशोधन आणि उत्तम परिणामांसाठी त्यांनी उपस्थितांना नियमितपणे शिकत राहण्याचे आवाहन केले .

तत्पूर्वी सकाळी त्यांनी सागरी प्रशिक्षण संस्थेच्या सर्वायवल इन सर्वायवल क्राफ्ट अँड रेस्क्यू बोट्स (PSCARB) नावाच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले.

भारतीय सागरी क्षेत्राच्या वैभवशाली इतिहास आणि कामगिरी अधोरेखित करणाऱ्या प्रदर्शनाचे उदघाटनही त्यांनी केले.
R.Tidake/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1584050)
आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English