पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

युएनसीसीडी सीओपी 14 कार्यक्रमाला सुरूवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय बैठकीचे उद्‌घाटन


जमिनीचा स्तर खालावण्याच्या समस्येवर दिल्ली जाहीरनामा तोडगा काढणार - केंद्रीय पर्यावरण मंत्री

Posted On: 02 SEP 2019 6:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2019

 

यूएन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन अर्थात यूएनसीसीडी च्या 14 व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज् (सीओपी 14) ला आज ग्रेटर नोएडा येथे इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्टमध्ये सुरूवात झाली. ही परिषद12 दिवस चालणार आहे. यावेळी यूएनसीसीडीचे कार्यकारी सचिव इब्राहिम थिया, पर्यावरण, वन आणि हवामानातील बदलविषयक राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानातील बदलविषयक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, यांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींना संबोधित केले. आजघडीला जनजागृती आणि लोकसहभाग ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. "हवामानातील बदल असो वा वाळवंटाची निर्मिती असो, निसर्गाचे संतुलन बिघडवण्यास मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. आता लोकांना याची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की जर मानवी कृतीतून काही नुकसान झाले असेल तर सकारात्मक मानवी कृतींच्या माध्यमातून त्यास पूर्ववत करता येईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक चांगले जग घडवता येईल."

उत्पादक जमीनीचे रक्षण करण्याच्या अभूतपूर्व जागतिक मोहिमेकडे लक्ष वेधताना जावडेकर म्हणाले की, पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आणि जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी ब्राझील, चीन, भारत,नायजेरिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिका अशा एकूण 122 देशांनी ‘जमिनीची किमान हानी’ हे राष्ट्रीय लक्ष्य निश्चित करत शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यास सहमती दर्शविली आहे. या कार्यक्रमांतर्गत 9 सप्टेंबर, 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्चस्तरीय बैठकीचे उद्‌घाटन करतील, असेही जावडेकर यांनी यावेळी नमूद केले.

मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जाणाऱ्या अशा परिषदेचे महत्त्व सांगताना जावडेकर म्हणाले की अशा प्रकारच्या जागतिक मंचावर एकत्र येऊन आपण चांगल्या कथा आणि अनुभवांची देवाणघेवाण करू शकतो, जे जगासाठी निश्चितच लाभदायक ठरेल. प्रत्येक देशात पुढे झेप घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. या दृष्टीने, यूएनसीसीडीचे महत्व अनन्यसाधारण आहे. या माध्यमातून आम्हाला काही चांगल्या बाबी समोर येणे अपेक्षित आहे, ज्या दिल्लीच्या जाहिरनाम्यात अधिसूचित केल्या जातील. दिल्लीचा जाहीरनामा भविष्यात उचलायच्या पावलांचा मार्ग आखून देईल.

अशाच काहीशा भावना इब्राहिम यांनी व्यक्त केल्या. अलीकडील वैज्ञानिक चाचण्या आणि दुष्काळ,वणवे, अनपेक्षित पूर तसेच मातीची धूप अशा हवामानाशी संबंधित आणि वारंवार उद्भवू लागलेल्या आपत्तींकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी यात बदल घडवून आणण्यासाठी मनाची कवाडे खुली ठेवण्याचे आणि बदलाच्या संधी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी प्रतिनिधींना  केले.

ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याबद्दल इब्राहिम यांनी भारत सरकारचे आभार मानले. इब्राहिम म्हणाले, "भारतात येणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. ही परिषद निःसंशयपणे यूएनसीसीडीने आजवर आयोजित केलेली आजवरची सर्वात मोठी परिषद ठरेल," असा विश्वास इब्राहिम यांनी व्यक्त केला.

या परिषदेत सुमारे 7,200 जण सहभागी होत असून त्यात मंत्री आणि सरकारी प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि आंतरशासकीय संस्था, वैज्ञानिक तसेच 197 पक्षांमधील महिला आणि युवा प्रतिनिधींचा समावेश आहे. या सर्वांच्या विचारविनिमयातून  जगभरातील जमीनीच्या वापरासंबंधीची धोरणे सक्षम करणे आणि सक्तीचे स्थलांतर, वाळू आणि धूळीची वादळे आणि दुष्काळ असे संभाव्य धोके टाळण्यासाठी पावले निश्चित करण्यासंदर्भातले सुमारे 30 निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.

 

युएनसीसीडी विषयी:             

यूएनसीसीडी हा जमीनीच्या चांगल्या देखभालीसंदर्भातला एक आंतरराष्ट्रीय करार आहे. या माध्यमातून जमीनीचा वापर करणाऱ्यांना शाश्वत जमीन व्यवस्थापनासाठी सक्षम वातावरण प्रदान करुन नागरिक,समुदाय आणि देशांना संपत्ती निर्माण करण्यास, अर्थव्यवस्थेची वाढ करण्यास आणि पुरेसे अन्न, पाणी आणि ऊर्जा सुरक्षित ठेवण्यास सहाय्य केले जाते. भागीदारीच्या माध्यमातून या कराराच्या 197  पक्षांनी दुष्काळ व्यवस्थापनासाठी तातडीने आणि प्रभावी अशी मजबूत यंत्रणा निर्माण केली. चांगली धोरणे आणि विज्ञानावर आधारित अशा जमीनीच्या चांगल्या देखभालीच्या पद्धतींसह यूएनसीसीडी शाश्वत विकासाची ध्येये वेगाने साध्य करण्यास सहाय्य करते, हवामानातील सकारात्मक बदलांसाठी पोषकता निर्माण करते आणि जैवविविधतेच्या नुकसानास प्रतिबंध करते.

अधिक माहितीसाठी https://www.unccd.int/conventionconference-parties-copcop14-new-delhi-india/cop14-media-resources येथे क्लिक करा.

 

D.Wankhede/M.Pange/P.Kor

 



(Release ID: 1583890) Visitor Counter : 321


Read this release in: English