माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी सरकार कायम प्रतिबद्ध-प्रकाश जावडेकर

Posted On: 30 AUG 2019 6:49PM by PIB Mumbai

कामगिरी, सुधारणा आणि परिवर्तन या तीन स्तंभांवर नवभारताचा दृष्टिकोन उभारलेला आहे, असे माहिती आणि प्रसारण तसेच पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. केरळमधल्या कोची इथे मल्याळा मनोरमा कंपनी लिमिटेडने आयोजित केलेल्या परिषदेत ते आज ' नवभारत : सरकारे आणि माध्यमे' या विषयावर बोलत होते.

भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, सांप्रदायिकता आणि जातीमुक्त , गरिबीमुक्त नवा भारत हे सरकारचे स्वप्न आहे. आपल्या देशात विविधता आहे. जगा आणि जगू द्या यावर भारतीय तत्त्वज्ञान आधारलेले आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी सरकार कायम प्रतिबद्ध असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. माध्यमस्वातंत्र्य हे लोकशाहीचे मूलतत्त्व आहे. मात्र लोकशाही असलेल्या नागरी समाजात हे स्वातंत्र्य जबाबदारीसह असते. जबाबदार स्वातंत्र्य म्हणजे नियंत्रित स्वातंत्र्य नव्हे तर ते आपापल्या पद्धती वापरून केलेले स्वनियमन असते, असे जावडेकर यांनी सांगितले.

सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांमुळे मॉब लिंचिंगसारखे प्रकार घडतात. स्वनियमन यंत्रणेच्या अभावामुळे हे घडते.

टीकेतून नवा दृष्टिकोन प्राप्त होत असल्याने सरकार हर प्रकारच्या टीकेचे स्वागतच करते, असे जावडेकर यांनी नमूद केले. स्वतंत्र संस्था या लोकशाहीची ताकद असल्यामुळे संस्था स्वतंत्र असण्यावर आमचा विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.

***

RT/SK



(Release ID: 1583689) Visitor Counter : 117


Read this release in: English