पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केला फिट इंडिया अभियानाचा प्रारंभ


नवभारत सुदृढ भारत असला पाहिजे : पंतप्रधान

जीवनशैली बदला, फिटनेस दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे : पंतप्रधानांचे आवाहन

सुदृढ आरोग्य आपल्या ऐतिहासिक वारशाचा भाग : पंतप्रधान

नवभारत सुदृढ भारत होण्यासाठी, व्यक्ती, कुटुंब आणि समाज सुदृढ होणं आवश्यक : पंतप्रधान

Posted On: 29 AUG 2019 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2019

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नवी दिल्ली इथे आज झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया अभियानाचा प्रारंभ केला. फिटनेस, आपल्या जीवनशैलीचा भाग करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकचळवळीचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. आपल्या प्रयत्नांनी जागतिक स्तरावर तिरंगा फडकावत ठेवणाऱ्या युवा क्रीडापटूंचे त्यांनी अभिनंदन केले.

‘ही पदके केवळ त्यांच्या कठोर परिश्रमांचा परिपाक नाहीत तर नवभारताच्या नव्या विश्वासाचे, नव्या उमेदीची ती प्रतिबिंब आहेत,’ असे पंतप्रधान म्हणाले.

फिट इंडिया अभियान राष्ट्रीय उद्दिष्ट झाले पाहिजे. सरकारने सुरु केलेले हे अभियान लोकांचे झाले पाहिजे आणि लोकांनी ते यशस्वी केले पाहिजे.

यश आरोग्य संपन्नतेशी संबंधित आहे. कुठल्याही क्षेत्रातील आपल्या सगळ्या आदर्शांच्या यशोगाथांमध्ये एक सामायिक धागा दिसून येतो तो आरोग्यसंपन्नतेचा. त्यांच्यातले बहुतांश सुदृढ आहेत आणि त्यांना फिटनेसची आवड आहे.

‘तंत्रज्ञानामुळे आपली शारीरिक क्षमता घटली आहे आणि आपले आरोग्याचे दैनंदिन वेळापत्रक  कोलमडून गेले आहेत. आज आपण आपल्या आरोग्य संपन्न पारंपरिक प्रथा आणि जीवनशैलीपासून अनभिज्ञ आहोत. काळासोबत सुदृढतेला आपला समाज कमी प्राधान्य देऊ लागला. पूर्वी लोक कित्येक किलोमीटर चालायचे किंवा सायकल चालवायचे. आज मोबइल ॲप्सना आपल्याला सांगावे लागते, आपण किती पावले चालतो’, असे पंतप्रधान म्हणाले.

‘आज भारतात जीवनशैलीचे आजार वाढत आहेत. तरुणांनाही ते जडत आहेत. मधुमेह आणि हायपरटेन्शनचे प्रमाण वाढत असून, ते मुलांमध्येही दिसून येत आहे. जीवनशैलीतला थोडासा बदल हे जीवनशैलीचे आजार रोखू शकतो. ‘फिट इंडिया अभियान’, हे जीवनशैलीतले छोटे बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवले तर कोणत्याही नोकरीपेशातले लोक त्यांच्या नोकरीपेशात स्वत:ला कार्यक्षम ठेवू शकतात, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. शरीर जर धडधाकट असेल, तर तुम्ही मानसिकदृष्ट्याही कणखर असता, असे पंतप्रधान म्हणाले. खेळाचा संबंध थेट तंदुरुस्तीशी असतो पण फिट इंडिया अभियानाचा उद्देश तंदुरुस्तीच्या पलिकडे आहे. आरोग्यसंपन्नता हा केवळ शब्द नाही, तर तो निरामय आणि समृद्ध जीवनाचा स्तंभ आहे. आपण आपले शरीर जेव्हा युद्धासाठी तयार करतो तेव्हा आपण देश लोखंडासारखा कणखर करतो. सुदृढ आरोग्य हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात खेळ खेळले जातात. शरीर घडवतानाच, लक्ष केंद्रीत करणे, विविध अवयवांमधील समन्वय यासह खेळ मनेही घडवतात. सुदृढ व्यक्ती, कुटुंब आणि निरोगी समाज, नवभारत सुदृढ भारत घडवण्यासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज हाच नव्या भारताला श्रेष्ठ भारत बनवण्याचा मार्ग आहे. आज राष्ट्रीय क्रीडा दिनी, फिट इंडिया अभियान बळकट करण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 



(Release ID: 1583465) Visitor Counter : 468


Read this release in: English