माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कम्युनिटी रेडिओसाठीचे वर्ष 2018 व 19 चे राष्ट्रीय पुरस्कार जावडेकर यांच्या हस्ते प्रदान


तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे सरकारचे उद्दिष्ट – प्रकाश जावडेकर

सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या 75 दिवसात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवरील पुस्तिकेचे जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 28 AUG 2019 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2019

 

नवी दिल्लीतल्या डॉ. बी.आर.आंबेडकर भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज कम्युनिटी रेडिओसाठीचे वर्ष 2018 व 19चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या 75 दिवसात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवरील ‘जनकनेक्ट: सही नियत मजबूत फैसले’ (जनतेशी संलग्न: योग्य विचार मजबूत निर्णय) या पुस्तिकेचे प्रकाशनही जावडेकर यांच्या हस्ते झाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ब्यूरो ऑफ आऊटरिच ॲण्ड कम्युनिकेशनने ही पुस्तिका तयार केली आहे.

विषय, लोकांसोबत काम, स्थानिक संस्कृतीला चालना, सर्वाधिक सृजनशील / नाविन्यपूर्ण आणि शाश्वतता अशा पाच वर्गवारीत वर्ष 2018 आणि 19 साठी हे पुरस्कार देण्यात आले.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे जावडेकर यांनी अभिनंदन केले आणि देशभरातली कम्युनिटी रेडिओ केंद्र करत असलेल्या कामाचे कौतुक केले. देशात कम्युनिटी रेडिओ चळवळीला अधिक चालना देण्यासाठी कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या 262 वरुन 500 वर वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. रेडिओ हे संवादाचे अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह माध्यम असल्याचे सांगून त्यांनी ‘मन की बात’चे यश अधोरेखित केले. ‘मन की बात’ आता ‘देश की बात’ आणि प्रत्येकाच्या ‘दिल की बात’ झाली असल्याचे ते म्हणाले. आपले अनुभव, सूचना पाठवण्याचे आवाहन त्यांनी केंद्रांना केले. देशभरातल्या कम्युनिटी रेडिओ केंद्रांवर चालणाऱ्या कार्यक्रमांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले.

कलम 370 रद्द करण्याचा निर्णय स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, शिक्षण हक्कासारखे कायदे, आरक्षणाचे फायदे त्यांना मिळावेत, यासाठी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 2014 ते 2019 या काळात भारतीय अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावरुन 5 व्या स्थानावर पोहोचली. भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, ती तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याचे उद्दिष्ट आता असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. राज्यसभेत आता वेगाने विधेयके मंजूर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्वसामान्यांच्या लाभासाठी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे आणि कम्युनिटी रेडिओ यावर आपले विचार मांडले.

 

 

Click here to see Write-up on Award Winners

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 



(Release ID: 1583287) Visitor Counter : 118


Read this release in: English