सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्र्यांचे आवाहन

Posted On: 27 AUG 2019 7:23PM by PIB Mumbai

मुंबई, 27 ऑगस्ट 2019

 

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 5 वर्षात 5 कोटी रोजगार निर्मितीसाठी सरकार एखाद्या अभियानाप्रमाणे काम करत आहे, असे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. येत्या 5 वर्षात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्मित उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण 50 टक्क्यांवर नेण्याचे आणि जीडीपीमधील योगदान 29 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांवर नेण्याचे सरकारने ठरवले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते आज मुंबईत सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या ‘ग्लोबलाइजिंग दी ब्रॅण्ड खादी : दी प्राइड ऑफ इंडिया’ या विषयावरील परिषदेत बोलत होते.

इंडिया आणि भारत यात नेहमी फरक केला जातो. रोजगाराच्या शोधात गावातले नागरिक शहरात स्थलांतर करतात. हे थांबवण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. स्थलांतर थांबवण्यासाठी उत्तम रस्ते, शाळा, रुग्णालये आवश्यक आहेत. शेतीतून चांगले उत्पन्न मिळणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी सांगितले. ‘आधुनिकता आणि यांत्रिकीकरणासोबत रोजगाराच्या संधींकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कमाल व्यक्तींच्या सहभागासह कमाल उत्पादनाची आपल्याला गरज आहे,’ असे गांधीजी म्हणायचे. नवीनतम शोध, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्यनिर्मित ज्ञान संपत्तीमध्ये रुपांतरित करण्याची आवश्यकता गडकरी यांनी व्यक्त केली.

खादी क्षेत्राच्या बळकटीकरणाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. खादी आणि ग्रामोद्योगावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी असून, त्यातली उलाढाल वाढवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

टेराकोट्टा कुल्हडमधून चहा देण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयासोबत बोलणी सुरु असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. सध्या ही सुविधा दोन स्थानकांवर उपलब्ध आहे. ती सर्व रेल्वे स्थानकांवर आणि बस स्थानकांवर बंधनकारक करावी, यासाठी रेल्वे मंत्री आणि सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

खादी हा गांधीजींच्या विचारांचा आत्मा आहे. खादीच्या तत्वांबाबत कोणतीही तडजोड करता, तिचे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. नव्या संशोधनाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. गिरण्यांमध्ये तयार होणाऱ्या सुतापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे आणि कमी किमतीतले सूत कसे तयार करता येईल, हे पाहण्याची, फॅशन डिझाइनमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाची गरज त्यांनी व्यक्त केली.

खादीला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी खासगी क्षेत्राला केले. उद्योग क्षेत्राकडून साहाय्य मिळाल्यास खादी ब्रॅण्ड जगप्रसिद्ध होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. विकासाला चालना देणाऱ्या धोरणांवर काम करत आहे.

अलिबाबाप्रमाणे भारत क्राफ्ट ई-मार्केट पोर्टल विकसित करण्यासाठी सरकार काम करत आहे. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात थेट संपर्क यामुळे होईल.

हे सरकार पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त असून, जलदगतीने निर्णय घेणारे आहे. खादीच्या विकासासाठी आणि अधिकाधिक लोकांना रोजगार पुरवण्याच्या या प्रयत्नात सहकार्य करावे, असे आवाहन गडकरी यांनी उपस्थित उद्योग प्रतिनिधींना केले. जगाच्या कानाकोपऱ्यात खादी पोहोचण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

सीआयआयच्या ‘टेक सक्षम’ प्रकल्पाचा प्रारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला.

यावेळी राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग सचिव डॉ. अरुण कुमार पांडा उपस्थित होते.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 



(Release ID: 1583182) Visitor Counter : 226


Read this release in: English