पंतप्रधान कार्यालय

बहारीन येथील भारतीय समुदायापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 24 AUG 2019 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असून आज त्यांनी बहारीन येथे भारतीय समुदायासमोर भाषण केले.

“बहारीन ला माझी भेट कदाचित राष्ट्रप्रमुख म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून असेल, मात्र माझां उद्देश येथे राहणाऱ्या भारतीयांना भेटणे आणि बहारीनच्या माझ्या ह्या लाखो मित्रांशी संवाद साधणे हाच आहे. आज जन्माष्टमीचा पवित्र सण आहे. आखाती देशांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण कथा सांगण्याचा प्रघात आजही आहे, असे मला सांगण्यात आले आहे. उद्या मी श्रीनाथजींच्या मंदिरात जाणार आहे. तिथे मी तुमच्या आणि तुमच्या या देशाच्या सुख समृद्धी तसंच शांततेसाठी प्रार्थना करणार आहे.”असे पंतप्रधान म्हणाले .

“तुम्ही सर्व आणि भारतातील भाविकही हा उत्सव किती उत्साह आणि आनंदात साजरा करता, याची मला कल्पना आहे. उद्यापासूनच या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु होणार आहे, ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

“बहारिनमध्ये राहणाऱ्या भारतीयांचा प्रामाणिकपणा, निष्ठा, कार्यक्षमता आणि सामाजिक-आर्थिक  क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे इथल्या नागरिकांच्या मनात भारतीयांबद्दल आदराची भावना आहे. तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्ही इथे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ही आदराची भावना आपल्याला कायम ठेवायची आहे. जेव्हाही मी, इथल्या सरकारकडून माझ्या भारतीय सहकाऱ्यांची तारीफ ऐकतो, इथे असलेले भारतीय उद्योजक आणि इतर लोकांविषयी मी ज्यावेळी कौतुक ऐकतो, तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो,”असे पंतप्रधान म्हणाले.

आज भारतातील प्रयेक कुटुंब बँकिग सेवेशी जोडले गेले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मोबाईल फोन्स, इंटरनेट हे सगळे आज सर्वसामान्य भारतीयाच्या आवाक्यातले झाले आहे, हे सगळे त्यांना सहज उपलब्ध आहे. आज जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा भारतात उपलब्ध आहे. देशातील सर्व सेवा डिजिटल माध्यमातून पुरवल्या जाव्यात असे प्रयत्न सुरु आहेत.

भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे विश्वास निर्माण झाला आहे की त्याची स्वप्ने, आशा-आकांक्षा आता पूर्ण होऊ शकतील. “आमची उद्दिष्टे उच्च आहेत, कठीण आहेत, मात्र जेव्हा तुमच्याकडे 130 भारतीयांचे बाहुबल असेल, तेव्हा तुम्हाला पुढे  जाण्याचा विश्वास निर्माण होतो. आज भारत प्रगती करतो आहे, ते केवळ सरकारच्या प्रयत्नांमुळे नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या प्रयत्नांमुळे. या प्रगतीच्या गाडीचे चाक केवळ सरकारच्या हातात आहे, मात्र त्याचे अक्सिलरेटर दाबून जनताच विकासाचा वेग वाढवते आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.

भीम ॲप, युपीआय आणि जन धन खाते यासारख्या योजनांमुळे सर्वसामान्य जनतेलाही बँकिग व्यवहार करणे शक्य झाले आहे. आज जगभरात व्यवहाराचे साधन म्हणून रूपे कार्ड लोकप्रिय होत आहे. आता जगात कुठेही भारताचे रूपे कार्ड बँका आणि विक्रेते स्वीकारतात.

“बहारिनमध्येही लवकरच तुम्ही रूपे कार्डच्या माध्यमातून व्यवहार करु शकाल याचा मला आनंद आहे. आज रूपे कार्डच्या वापरासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. भारतातील तुमच्या घरी तुम्हाला रूपे कार्डच्या माध्यमातून पैसे पाठवणे शक्य व्हावे, असा आमचा हेतू आहे. आता यापुढे तुम्ही असे म्हणू शकाल “बहारीन- पे विथ रूपे”. असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या पाच वर्षात, देशातील 130 कोटी भारतीयांसोबतच परदेशात राहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंच राहावी, असा आमचा प्रयत्न राहिला आहे. आज जर सगळा देश भारताकडे आदराने बघतो आहे, तर त्यामागे तुमच्यासारख्या लाखो सहकाऱ्यांचीच साथ आहे.

भारतातील विकासाविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, की सहज संचारासाठी भारत आज “वन  नेशन वन कार्ड” च्या दिशेने यशस्वी वाटचाल करतो आहे. सगळा देश आज ‘वन नेशन, वन ग्रीड’ आणि जीएसटीच्या माध्यमातून ‘वन नेशन-वन टैक्स’ ने जोडला गेला आहे. सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करत आहोत. सगळ्या उपाययोजना, देशातील युवकांनीच केल्या आहेत. भारतातील युवक, अत्यंत प्रामाणिकपणे जागतिक स्तरावर चालू शकतील अशा स्थानिक उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. जागतिक प्रकल्प आणि संस्थांमध्ये भारतीय युवक अप्रतिम काम करत आहेत. अत्यंत कमी पैशात चांद्रयानसारखी महत्वाची मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व भारतीय शास्त्रज्ञांचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. अशी गुणवत्ता केवळ जमेची बाजुच नाही तर आपली ओळख देखील आहे. आपण आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या बजेटवर नाही तर आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर काम करतो.

2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्त आपण सर्वानी काहीतरी संकल्प करावा असे आवाहन मी करतो. इथल्या प्रत्येक भारतीयाने, दरवर्षी किमान एका तरी बाहरीनच्या नागरिकाला भारतात पर्यटनासाठी येण्यासाठी तयार करावे, असा संकल्प करता येऊ शकतो. भारतातील सुंदर हिल स्टेशन्स, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ऐतिहासिक स्थळे, बघण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी. त्याशिवाय, 2022 पर्यत भारताला प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्पही आम्ही केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

पंतप्रधान पुढे म्हणाले, की आपली समान मूल्ये आणि हितांसाठी दोन्ही देशांनी एकत्र काम करायला हवे. भारत आणि बाहरीन हे दोन्ही देश प्राचीन संस्कृती आणि नागरी सभ्यता असलेले आधुनिक देश आहेत. दोन्हीमध्ये अनेक क्षमता आहेत. बाहरीनमध्ये असलेले माझे भारतीय लोक, दोन्ही देशांतील संबध अधिक दृढ करण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. भारत-बाहरीनमधील संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण सर्व  प्रयत्न करुया.” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

***

 

M.Chopade/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1582987) Visitor Counter : 182


Read this release in: English