वस्त्रोद्योग मंत्रालय

लॅक्मे फॅशन विकमध्ये शाश्वत फॅशन दिनानिमित्त SU.RE प्रकल्पाचा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


शाश्वततेचा ठराव हे गांधीजींच्या विचारांचे प्रतीक: वस्त्रोद्योग मंत्री

SU.RE प्रकल्प हा शाश्वत फॅशनकडे वळण्याप्रती भारतीय तयार कपडे उद्योगाच्या कटिबद्धतेचे द्योतक

Posted On: 22 AUG 2019 7:48PM by PIB Mumbai

मुंबई, 22 ऑगस्ट 2019

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति झुबिन इराणी यांनी आज मुंबईत लॅक्मे फॅशन विंटर/फेस्टीव्ह 2019 मध्ये SU.RE प्रकल्पाचा शुभारंभ केला. भारतीय फॅशन उद्योगासाठी शाश्वत मार्ग स्थापित करण्याप्रती भारताच्या तयार कपडे उद्योगाची वचनबद्धता म्हणजे हा SU.RE प्रकल्प आहे. SU.RE म्हणजेच ‘Sustainable Resolution’ अर्थात शाश्वत निर्धार हा स्वच्छ पर्यावरणाप्रती योगदान देण्याचा प्रयत्न आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वस्त्रोद्योग मंत्री म्हणाल्या की, “इतिहासाची साक्षीदार असलेली भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मी संयुक्त राष्ट्रसंघाला सांगू इच्छिते की हे उद्योग, IMG रिलायंस आणि लॅॅक्मे मुळे शक्य झाले. गांधीजींनी आपल्याला अपेक्षित बदल प्रथम स्वतःमध्ये घडवायला सांगितले होते. शाश्वत फॅॅशनचा ठराव हे त्याचे उदाहरण आहे.

यापूर्वी कधीही फॅॅशन जगतातील 16 ब्रांड एकत्र आले नव्हते. आपला सर्व वापर हा जबाबदार असला पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाठींब्याचे ही मी आभार मानते.”  

भारतीय वस्त्रोद्योग निर्माता संघ (CMAI), संयुक्त राष्ट्र संघ, भारत आणि IMG  Reliance या लॅक्मे फॅशन विकच्या आयोजकांनी संयुक्तपणे हा प्रकल्प सुरु केला आहे.

यावेळी CMAI चे अध्यक्ष राहुल मेहता म्हणाले की, काही वर्षांपूर्वी आपल्या उद्योगातील अनेक उत्पादनं आणि प्रक्रिया पर्यावरणस्नेही नव्हत्या. शाश्वत फॅशनकडे वळण्यासाठी हे उचित पाऊल आहे. या प्रकल्पात सहभागी होणं ही CMAI साठी अभिमानाची बाब आहे.

फ्यूचर ग्रुप, शॉपर्स स्टॉप, आदित्य बिर्ला रिटेल, अरविंद ब्रँड्स, लाईफ स्टाइल, मॅक्स, रेमंड, हाऊस ऑफ अनिता डोंगरे, डब्ल्यू, बिबा, वेस्टसाइड, 109एफ, स्पाइकर, लेवीज्‌, बेस्टसेलर्स, ट्रेंड्स यासारखे देशातले 16 अव्वल फॅशन आणि रिटेल ब्रँड्स या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. 2025 पर्यंत आपल्या वस्त्रोद्योग निर्मितीमधे शाश्वत कच्चा माल आणि प्रक्रियेचा वापर करण्याचा संकल्प या ब्रँड्सनी घेतली आहे.

भारतातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक रेनाटा लोक-देसालिअन म्हणाले की, शाश्वत पुरवठा साखळी शिवाय फॅशन उद्योग व्यवहार्य बनणार नाही. SU.RE प्रकल्पामुळे शाश्वतता आणि हवामान बदलाचा विचार करुन ठोस कृती करायला गती मिळेल. या प्रकल्पात सहभागी झालेल्या 30 ब्रँड्स आणि कंपन्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

IMG रिलायन्सचे उपाध्यक्ष आणि फॅशन प्रमुख जसप्रित चांडोक म्हणाले की, शाश्वततेला मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट यामुळे साध्य झाले आहे. या उपक्रमाचा मोठा प्रभाव पडून पुढील पाच वर्षात लक्षणीय बदल झालेला दिसून येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

SU.RE प्रकल्पाबद्दल

पाच सूत्री शाश्वत संकल्प पुढील प्रमाणे:

  1. आपल्या ब्रँड मार्फत सध्या उत्पादित केल्या जाणाऱ्या कपड्यांच्या पर्यावरणीय प्रभावाबाबत जनजागृती करणे.
  2. पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या प्रमाणित कच्च्या मालाचा वापर आणि त्याला नियमित प्राधान्य देण्याबाबत शाश्वत धोरण विकसित करणे.
  3. शाश्वत आणि नवीकरणीय सामुग्रीची निवड करुन योग्य निर्णय घेणे.
  4. ऑनलाईन आणि दुकानांमार्फत तसेच सोशल मिडिया जाहिराती आणि कार्यक्रमांद्वारे ग्राहक आणि माध्यमांपर्यंत शाश्वत उपक्रम पोहोचवणे.
  5. या उपाय योजनांच्या माध्यमातून 2025 पर्यंत हवामान बदलासारख्या जागतिक समस्येवर तोडगा काढणे आणि संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमधे योगदान देणे, भावीपिढ्यांसाठी सुरक्षित विश्व निर्माण करणे.

या संकल्पामुळे या क्षेत्रातील उत्पादकांना स्पष्‍ट संदेश जाईल आणि पर्यावरण रक्षण करणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे.

SU.RE प्रकल्पाला ‘लेन्झींग इको वेरो’ आणि ‘आर ईलान’ यांचे सहाय्य लाभले आहे.

***

 

M.Chopade/S.Kane/D.Rane

 (Release ID: 1582684) Visitor Counter : 312


Read this release in: English