आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला आढावा; योजनेच्या वर्षभरातल्या प्रगतीची केली प्रशंसा
Posted On:
21 AUG 2019 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2019
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु झाल्यापासून गंभीर आजारांसाठी 39 लाख लोकांनी सुमारे 6100 कोटी रुपयांच्या रोकडरहीत उपचारांचा लाभ घेतल्याबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी समाधान व्यक्त केले आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा उच्चस्तरीय आढावा घेतल्यानंतर ते आज बोलत होते. या रोकडरहित उपचारामुळे लाभार्थी कुटुंबांचे 12,000 कोटी रुपये वाचले आहेत असे ते म्हणाले. या योजनेला वर्ष पूर्ण होत आले असून या काळात योजनेच्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली. देशातल्या गरीब आणि वंचितांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना आणल्याचे ते म्हणाले.
योजनेची गती कायम राखत, समाजातल्या वंचितांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी राज्यांनी पूर्ण क्षमता पणाला लावण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच 15 ते 30 सप्टेंबर हा कालावधी ‘आयुष्मान भारत पंधरवडा’ म्हणून साजरा केला जाईल आणि 29-30 सप्टेंबरला ‘ज्ञान संगम’ हा आयुष्मान भारत योजनेवरील मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल असे ते म्हणाले.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1582550)
Visitor Counter : 118