आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कुष्ठरोग्यांबाबत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावेत-डॉ. हर्ष वर्धन यांची केंद्रीय विधी आणि सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी

Posted On: 20 AUG 2019 6:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2019

 

कुष्ठरोग्यांच्या बाबतीत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद तसंच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांना पाठवले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ही यथोचित श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

कुष्ठरोगबाधित व्यक्तींबाबत होणाऱ्या भेदभावाचे उच्चाटन करणारे विधेयक लवकरात लवकर संसदेत मांडले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हा आजार आता पूर्णपणे बरा होत असला तरीही अजून अशा रुग्णांच्या बाबतीत भेदभाव करणारे कायदे अस्तित्वात आहेत यातील तीन कायदे संघसूचीत तर 105 कायदे राज्यसूचीत आहेत.  हे कायदे दुरुस्त केले जावेत किंवा रद्द केले जावेत असे त्यांनी म्हटले आहे. कुष्ठरोग निर्मुलनाची मोहीम देशभरात यशस्वी होत असून कुष्ठरोग बरा करणारी औषधं आणि उपचार सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. हा आजार बरा झालेल्या व्यक्तीपासून कोणालाही आजाराचा संसर्ग होत नाही, असे असताना या आजाराविषयी समाजात अनाठायी भीती असणे योग्य नाही. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार देशातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि समानता देण्यासाठी भारत कटिबद्ध असून त्याच आधारावर ही असमानता दूर केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.

हर्ष वर्धन यांनी याच आशयाचे पत्र 23 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनाही पाठवले आहे.

 

M.Chopade/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1582458) Visitor Counter : 81


Read this release in: English