पंतप्रधान कार्यालय

भूतान, थिंपू येथील रॉयल विद्यापीठात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 18 AUG 2019 2:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2019

 

भूतानचे पंतप्रधान महामहिम डॉ. लोटे शेरिंग, भूतानचे राष्ट्रीय सभागृह आणि राष्ट्रीय परिषदेचे माननीय सदस्य, भूतानच्या रॉयल विद्यापीठाचे प्रतिष्ठित कुलगुरू आणि प्राध्यापक,

 

माझ्या तरुण मित्रांनो,

कुझो झांगपो ला. नमस्कार! आज सकाळी तुम्हा सर्वांसोबत इथे उपस्थित असणे ही खूप सुखद भावना आहे. मला खात्री आहे की, तुम्ही विचार करत असणार, आज रविवार आहे आणि तुम्हाला एका व्याख्यानाला उपस्थित राहावे लागत आहे. परंतु मी अगदी संक्षिप्त आणि तुमच्याशी निगडीत विषयावरच बोलणार आहे.

 

मित्रांनो,

भूतानला भेट देणाऱ्या कोणालाही त्याच्या नैसर्गिक सौंदर्याने जितके खिळवून ठेवेल तितकेच तुमचे आदरातिथ्य, माया आणि साधेपणा देखील त्याला तितकाच भावेल. काल मी सेमतोखा झोंग येथे होतो, भूतानच्या भूतकाळातील समृद्धी आणि त्याच्या आध्यात्मिक वारशाच्या महानतेचे हे सर्वात पहिले उदाहरण. या भेटीदरम्यान मला भूतानच्या विद्यमान नेतृत्वाशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. भारत-भूतान संबंधांसाठी मला पुन्हा एकदा त्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले, त्यांनी वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे या संबंधांना याचा नेहमीच लाभ झाला आहे.

आज, मी इथे भूतानच्या भविष्यासोबत आहे. मला इथे उत्साह दिसत आहे आणि मला इथे ऊर्जा जाणवत आहे. मला विश्वास आहे की, हे या महान देशाचे आणि नागरिकांचे भविष्य घडवतील. भूतानचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ बघताना मला सखोल अध्यात्म आणि तरुणाईचा जोश हे समान दुवे येथे आढळतात. हे आपल्या द्विपक्षीय संबंधांची शक्ती देखील आहेत.

 

मित्रांनो,

भूतान आणि भारतातील लोकांना एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे हे स्वाभाविक आहे. आपण केवळ भौगोलिक दृष्ट्याच जवळ नाही तर आपला इतिहास, संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरेने आपले देश आणि नागरिकांमध्ये एक अद्वितीय आणि सखोल संबंध निर्माण केले आहेत. राजकुमार सिद्धार्थ जिथे गौतम बुद्ध झाले ती भूमी भारताची होती हे भारताचे सौभाग्य आहे; आणि जिथून त्यांचे अध्यात्मिक संदेश, बुद्ध धर्माचा प्रकाश जगात सर्वदूर पसरला. भिक्षू, अध्यात्मिक नेते, अभ्यासक आणि साधकांच्या अनेक पिढ्यांनी भूतानमध्ये ती ज्योत नेहमीच प्रज्वलित ठेवली. त्यांनी देखील भारत-भूतान मध्ये विशेष बंध निर्माण केले.

परिणामी एक समान जागतिक मत घेऊन आपली मुल्ये आकाराला आली आहेत. वाराणसी आणि बोधगया मध्ये आपल्याला हे पाहायला मिळते तसेच ते झोंग आणि चोरटेनमध्ये देखील पाहायला मिळते; आणि या महान वारसाचे आपण साक्षीदार आहोत हे आपले भाग्य आहे. जगातील इतर कोणतेही दोन देश एकमेकाला इतक्या चांगल्या पद्धतीने समजून घेत नसतील किंवा इतक्या बाबी सामायिक करत नसतील. तसेच कोणतेही दोन देश आपल्या लोकांना समृद्ध करण्यासाठी असे नैसर्गिक भागीदार राहतील हे मी खात्रीपूर्वक सांगतो.

 

मित्रांनो,

आज भारत विविध क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणत आहे.

भारत जलद गतीनं दारिद्र्य निर्मूलनाचे कार्य करत आहे. मागील पाच वर्षात पायाभूत सुविधांच्या बांधकामाची गती दुप्पट झाली आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांसाठी अंदाजे 15 अब्ज डॉलर्सचे वचन दिले आहे. ‘आयुषमान भारत’ हा जगातील सर्वात मोठा आरोग्य सेवा कार्यक्रम आहे. या योजनेत 500 दशलक्ष भारतीयांना आरोग्य हमी देण्यात आली आहे.

जगातील सर्वात स्वस्त डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये भारताचा समावेश आहे, जे लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सामर्थ्य देत आहे. जगातील सर्वात मोठी स्टार्ट अप प्रणाली भारतात आहे. खरोखरच भारतामध्ये नवनिर्मितीसाठी हा एक चांगला काळ आहे! या आणि इतर बऱ्याच परिवर्तनांमध्ये भारतीय तरुणांची स्वप्ने आणि आकांक्षा हे मुख्य कारण आहे.

 

मित्रांनो,

आज मी इथे भूतानच्या सर्वोत्तम आणि हुशार तरुणांमध्ये उपस्थित आहे. महाराजांनी मला काल सांगितले की, ते तुमच्याशी नियमित संवाद साधतात आणि तुमच्या दीक्षांत कार्यक्रमाला संबोधित करतात. तुम्हा सर्वांमधूनच भूतानचे भावी नेते, नवोन्मेषक, व्यावसायिक, खेळाडू, कलाकार आणि वैज्ञानिक उदयास येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी माझे मित्र पंतप्रधान डॉक्टर शेरिंग यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती जी माझ्या मनाला खूपच भावली. त्या पोस्टमध्ये त्यांनी एक्झाम वॉरियर्सचा उल्लेख केला होता आणि नुकतचं एका विद्यार्थ्याने देखील पुस्तकाबद्दल उल्लेख केला होता. ‘परीक्षेतील ताणतणावांना कसे तोंड द्यावे’ याविषयावर मी ते पुस्तक लिहिले आहे. प्रत्येकजण शाळा, महाविद्यालय आणि आयुष्यातील मोठ्या वर्गामध्ये देखील परीक्षांना सामोरे जात असतो. मी तुम्हाला काहीतरी सांगू का? मी एक्झाम वॉरियर्समध्ये जे लिहिले त्यातील बरेचसे भगवान बुद्धाच्या शिकवणुकीने प्रभावित होऊन लिहिले आहे. मुख्यतः सकारात्मकतेचे महत्व, भीतीवर मात करणे आणि एकतेने राहणे मग ते सध्याच्या क्षणात असो किंवा मग निसर्गासोबत असो. तुम्ही या महान भूमीत जन्माला आला आहात.

म्हणूनच हे गुण तुमच्यात नैसर्गिकरित्या येतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देतील. जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा या वैशिष्ट्यांचा शोध मला थेट हिमालयापर्यंत घेऊन गेला होता. या पवित्र मातीची मुले म्हणून, आपल्या विश्वातील समस्यांचे निराकरण करण्यात तुम्ही तुमचे योगदान द्याल याची मला खात्री आहे.

हो, आपल्यासमोर आव्हाने आहेत. परंतु प्रत्येक आव्हानासाठी, त्यावर मात करण्यासाठी, नवीन उपाययोजनांसाठी आपल्याकडे तरुण तल्लख बुद्धी आहे. कोणतेही अडथळे तुम्हाला थांबवू शकत नाही.

मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे- तरुणपणा सारखा दुसरा चांगला कोणता काळ नाही! आज जगात पूर्वीपेक्षा जास्त संधी उपलब्ध आहेत. आपल्याकडे असामान्य गोष्टी करण्याचे सामर्थ्य आणि क्षमता आहे, जे आगामी पिढ्यांना प्रभावित करेल. तुम्हाला नक्की काय करायचे आहे याचा शोध घ्या आणि त्यास संपूर्ण आवेगाने ते साध्य करा.

 

मित्रांनो,

जलविद्युत आणि उर्जा क्षेत्रात भारत-भूतान सहकार्य अनुकरणीय आहे. परंतु शक्ती आणि उर्जेच्या या संबंधांचे, या नातेसंबंधाचे वास्तविक स्त्रोत हे आपले नागरिक आहेत.म्हणूनच सर्वात आधी लोकं, आणि लोकं नेहमीच या नात्याच्या केंद्रस्थानी असतील. या भेटीच्या परिणामांमध्ये  ही भावना स्पष्टपणे दिसून येते. सहकार्याच्या पारंपारिक क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन आम्ही शाळा ते अंतराळ, डिजिटल देयके ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य करू इच्छित आहोत. या सर्व क्षेत्रातील आमच्या सहकार्याचा थेट परिणाम आपल्यासारख्या तरुण मित्रांवर होईल. मी काही उदाहरणे देतो. आजच्या काळात आणि युगात, सीमांच्या पलीकडे विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञांना जोडणे फार महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कलागुण त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट लोकांच्या पंक्तीत नेऊन बसवतील. भारताचे नॅशनल नॉलेज नेटवर्क आणि भूतानचे ड्रुक्रिन यांच्यातील सहकार्य या उद्देशासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे आपली विद्यापीठे, संशोधन संस्था, वाचनालये, आरोग्य-सुविधा केंद्रे आणि कृषीसंस्थांमधील संपर्क आंशिक जलद आणि सुरक्षित होऊ शकेल.मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण या सुविधेचा संपूर्ण लाभ घ्यावा.

 

मित्रांनो,

दुसरे उदाहरण म्हणजे अवकाश क्षेत्रातील आघाडी. आजच्या क्षणाला, भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेअंतर्गत, सोडण्यात आलेले चांद्रयान-2 यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2022 पर्यत, भारताच्या अवकाशयानातून भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ही सगळे भारताच्या स्वतःच्या परिश्रमाचे आणि त्याला मिळालेल्या यशाची परिणीती आहे. आमच्यासाठी, आमचा अवकाश कार्यक्रम हा केवळ राष्ट्रीय अभिमानाची बाब नाही. तर राष्ट्राचा विकास आणि जागतिक सहकार्यासाठीचे ते महत्वाचे साधन आहे. 

 

मित्रांनो

काल, पंतप्रधान त्शेरिंग आणि माझ्या हस्ते दक्षिण आशिया उपग्रह सेवेसाठीच्या थीम्पू ग्राउंड स्टेशनचे उद्‌घाटन झाले, याद्वारे आम्ही दोन्ही देशातील अवकाश सहकार्य अधिक वृद्धिंगत केले. या उपग्रहांद्वारे,टेली-मेडिसिन, दूरस्थ शिक्षण, स्त्रोतांचे मोजमाप, हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आपल्या प्रदेशातील दुर्गम भागापर्यंत पोहचू शकते. भूतानचा स्वतःचा छोटा उपग्रह विकसित करण्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी भूतानचे काही युवा शास्त्रज्ञ भारतात येणार आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला आशा आहे, तुमच्यातील अनेक जण भविष्यात वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधक बनतील.

 

मित्रांनो,

अनेक शतकांपासून, शिक्षण आणि ज्ञानसंवर्धन हे भारत आणि भूतानमधील दृढ संबंधांचे केंद्र राहिलेले आहे. प्राचीन काळी बौद्ध शिक्षक आणि अभ्यासकांनी दोन देशांमधील लोकांमध्ये या शिक्षणाचा पूल बांधला होता. हा अमूल्य वारसा आम्हाला केवळ जतन करायचा नाही तर पुढेही न्यायाचा आहे. त्यामुळेच भूतानच्या शिक्षणसंस्थांच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भारतात नालंदा विद्यापीठात शिक्षण घ्यावे असा आग्रह मी करतो. नालंदा विद्यापीठ हे बौद्ध धर्म आणि परंपरा यांचे मोठे अभ्यासकेंद्र असून 15 हजार वर्षांपूर्वी हे जसे होते, तशाच प्रकारे पुनर्स्थापित केले आहे. आज भूतानच्या जुन्या पिढीच्या अनेक ज्येष्ठ नागरीकांच्या शिक्षणकाळात किमान एक तर भारतीय शिक्षण असल्याचे आठवत असेल. गेल्यावर्षी त्यांच्यापैकी काही शिक्षकांना भूतानच्या माननीय राजांच्या हस्ते गौरवण्यातही आले होते.त्यांनी दिलेल्या या सन्मानासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.

 

मित्रांनो

सध्या किमान चार हजार भूतानी विद्यार्थी भारतात कुठे ना कुठे शिक्षण घेत असतात. जेव्हा आपण आपल्या देशाचा विकास करण्यासाठी काम करतो, त्यावेळी आपल्या आजूबाजूला बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या वेगासोबतच हा प्रवास करावा लागतो. आणि म्हणूनच, नव्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात आपल्यात सहकार्य असणे अत्यंत आवश्यक आहे.

भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान संस्था, आयआयटी आणि या प्रतिष्ठीत विद्यापीठादरम्यान एकत्र कार्यक्रम राबवण्याचा नवा अध्याय आपण काल सुरु केला याचा मला आनंद आहे. या समन्वयातून ज्ञानवर्धन आणि संशोधनाच्या क्षेत्रात आंशिक सहकार्य निर्माण होईल, अशी मला आशा वाटते.

 

मित्रांनो,

जगाच्या कुठल्याही भागात तुम्ही कोणाला विचारले की, भूतानचे नाव उच्चारल्याबरोबर आपल्याला काय आठवते, तर, त्याचे एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे-सकल राष्ट्रीय आनंदाची त्यांची संकल्पना! मला त्याविषयी काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण भूतानला आनंदाचा खरा अर्थ गवसला आहे. भूतानला सौहार्द, एकात्म आणि करुणेचा भाव समजला आहे. काल माझ्या स्वागतासाठी इथे रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या गोड मुलांच्या चेहऱ्यावर ह्याच भावनांचा आनंद, प्रेरणा ओसंडून वाहत होती. त्यांचे हास्य माझ्या कायम स्मरणात राहील. 

 

मित्रांनो

स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, प्रत्येक राष्ट्राकडे देण्यासाठी एक संदेश असतो, पूर्ण करण्यासाठी एक धेय्य असते, पोहचण्यासाठी एक निश्चित स्थान असते. भूतानने मानवतेला दिलेला संदेश आहे- आनंद! असा आनंद जो सौहार्दातून वाहतो, अशा आनंदाच्या झऱ्यातून जग अनेक गोष्टी साध्य करु शकते. हा आनंद, निरर्थक,निर्बुद्ध अशा द्वेषभावनेवर मात करेल. जर लोक आनंदी असतील, तर ते एकमेकांशी सौहार्दाने, प्रेमाने वागतील आणि जिथे सौहार्द असेल, तिथे शांतता निश्चितच नांदेल.

आणि केवळ शांतताच समाजाला शाश्वत विकासाच्या मार्गाने प्रगती करण्यासाठी प्रेरक ठरु शकते. ज्या ज्या वेळी, विकास आणि परंपरा व पर्यावरण यांच्यात संघर्ष निर्माण झाला, त्या त्या वेळी जगाला त्याची उत्तरे भूतानकडून मिळाली आहेत. इथे विकास, पर्यावरण आणि संस्कृती एकमेकांच्या विरोधात उभे नाहीत तर त्यांची एकत्र उर्जा आपल्याला जाणवेल. आपल्या युवकांकडे असलेली कल्पकता, उर्जा यांनी संस्कृतीच्या आधारावर, आपले देश शाश्वत भविष्यासाठी जे जे आवश्यक असेल, ते सर्व साध्य करु शकतात. मग ते जलसंवर्धन असो कि शाश्वत कृषी किंवा मग आपल्या समाजाला एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचे ध्येय असो. 

 

मित्रांनो,

माझ्या या आधीच्या भूतान दौऱ्यात, मला इथल्या लोकशाहीच्या मंदिरात, भूतानच्या संसदेत जाण्याची संधी मिळाली होती. आज मला या ज्ञानमंदिरात येण्याची संधी मिळाली आहे. आज इथे प्रेक्षकांमध्ये भूतानच्या संसदेचे मान्यवर सदस्य उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. ‘लोकशाही आणि शिक्षण’ या दोन्हीचे उद्दिष्ट आम्हाला मुक्त करणे हेच आहे, आणि एकमेकांशिवाय या दोन्ही गोष्टी अपूर्ण आहेत. या दोन्हीमुळे आपल्याला आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याचा वाव मिळणार आहे. या ज्ञानकेंद्रामुळे पुन्हा एकदा आपल्यातले कुतूहल जागृत करेल आणि आपल्यातला विद्यार्थी सदैव जिवंत ठेवेल. 

या प्रयत्नात आज भूतान नवनव्या उंचीवर पोहोचत असतांना, तुमचे 130 कोटी भारतीय मित्र केवळ बघत बसणार नाहीत, तर ते हि तुमच्या आनंद आणि अभिमानात सहभागी होतील. ते तुमचे भागीदार बनतील, तुमच्यासोबत सगळे वाटून घेतील आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकतीलही. या शब्दांसोबतच, मी भूतानच्या रॉयल विद्यापीठाचे कुलगुरू आणि भूतानचे राजे,प्र-कुलगुरु, आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांसह तुम्हा सर्वांचे आभार मानतो.  

आपण मला या कार्यक्रमात बोलावून माझा गौरव केला आहे. तसेच आपला बहुमुल्य वेळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला जो स्नेह मला दिलात, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्हा सर्वांकडून प्रचंड सकारात्मक उर्जा आणि आनंद घेऊन मी परत जाणार आहे.

धन्यवाद ! खूप खूप धन्यवाद!  

ताशी देलेक! 

 

B.Gokhale/S.Mhatre /R.Aghor/P.Kor



(Release ID: 1582299) Visitor Counter : 141


Read this release in: English