पंतप्रधान कार्यालय

भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून लाल किल्ल्यावरून केलेले भाषण

Posted On: 15 AUG 2019 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2019

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व भाऊ-बहिणींना या रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त मी अनेक अनेक सदिच्छा देतो. स्नेहाच्या भावनेनं ओथंबलेला हा सण माझ्या सर्व बंधू -भगिनींच्या जीवनामध्ये आशा- आकांक्षांची पूर्ती करणारा ठरावा. तुम्हा सर्वांची स्वप्ने साकार करणारा ठरावा आणि स्नेहाची, ममतेची सरिता अखंड वहात राहणारा ठरावा, अशी भावना व्यक्त करतो.

आज ज्यावेळी देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो आहे,त्याचवेळी देशाच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे आणि लोकांना गंभीर समस्येला तोंड द्यावं लागत आहे. काही जणांना तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावं लागलं आहे. त्यांच्याविषयी मी मनापासून दुःख,संवेदना व्यक्त करतो. अशा संकटसमयी राज्य सरकार, केंद्र सरकार, एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल असे सर्वजण नागरिकांचे कष्ट कमी कसे होतील, शक्य तितक्या लवकर जनजीवन सुरळीत कसे होवू शकेल, यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

आज ज्यावेळी आपण सर्वजण देशाच्या स्वातंत्र्याचा पवित्र उत्सव साजरा करीत आहोत, त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, ज्यांनी आपला ऐन तरूणपणाचा काळ दिला, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष कारावास भोगला, जे लोक देशासाठी हसत-हसत फासावर गेले, ज्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अहिंसेचा पुरस्कार करीत स्वातंत्र्यासाठी लढा पुकारला, खुद्द बापूजींच्या नेतृत्वाखाली देशानं स्वातंत्र्य मिळवलं. देशासाठी असे बलिदान केलेल्या, त्यागी, तपस्वींना मी आज आदरपूर्वक वंदन करतो. अगदी त्याचप्रमाणे देश स्वतंत्र झाल्यानंतर इतकी वर्षे देशामध्ये शांती नांदण्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या समृद्धीसाठी लक्षावधी लोकांनी आपले योगदान दिले. आज स्वतंत्र भारताच्या विकासासाठी, शांतीसाठी, समृद्धीसाठी, जनसामान्यांच्या आशा- आकांक्षांच्या पूर्तीसाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आहे, त्या सर्वांनाही मी आज वंदन करतो.

नवीन सरकार बनल्यानंतर लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा आपणा सर्वांचा गौरव करण्याचं सौभाग्य मला आज लाभलं आहे. नवीन सरकारला सत्तेवर येऊन अद्याप 10 आठवडेही झालेले नाहीत. परंतु 10 आठवड्यांच्या अल्पशा कार्यकाळातही सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व दिशांमध्ये सर्व प्रकारच्या प्रयत्नांवर भर देण्यात येत आहेत. नव्या पद्धतीनं काम सुरू करण्यात आलं आहे  आणि जनसामान्यांच्या आशा, अपेक्षा तसेच आकांक्षा लक्षात घेवून त्यांच्यासाठी सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला दिली आहे. या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एका क्षणाचाही विलंब न करता, आम्ही संपूर्ण सामर्थ्‍यानिशी त्याचबरोबर संपूर्ण समर्पणाच्या भावनेनं, आपल्या सेवेमध्ये कार्यरत आहोत. 10 आठवड्यांच्या आतच घटनेतलं 370 वे कलम काढण्यात आलं, 35 ए काढण्यात आलं. हे काम म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. 10 आठवड्यांच्या आत आमच्या मुस्लिम माता आणि भगिनींना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तिहेरी तलाक विरोधी कायदा करणे, दहशतवादाशी संबंधित सर्व कायद्यांमध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणून त्या कायद्याला एक नवीन क्षमता देण्याचं काम केलं आहे. दहशतवादाच्या विरोधात आम्ही जी लढाई सुरू केली आहे तिला आणि देशाच्या सुरक्षेला अधिक बळकटी आणण्याचं काम केलं आहे.

आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी प्रधानमंत्री सन्मान निधीच्या माध्यमातून 90 हजार कोटी रूपये शेतकरी वर्गाच्या खात्यांमध्ये जमा करण्याचं महत्वपूर्ण काम प्रगतीपथावर आहे. आमचे शेतकरी बंधू-भगिनी, आमच्या लहान व्यापारीबंधू-भगिनींनो आपल्या जीवनात 60 वर्षांनंतर कधी निवृत्ती वेतन मिळण्याची व्यवस्था होवू शकते याची कल्पनाही नव्हती. 60 वर्ष वयानंतर हे लोकही सन्मानानं उर्वरित आयुष्य जगू शकतात. शरीराला ज्यावेळी जास्त काम करणं शक्य नसतं, अशा वेळी जर कोणाकडून आर्थिक मदत मिळणं गरजेच असतं. म्हणून छोटे व्यापारी आणि शेतकरी वर्गासाठीही निवृत्ती वेतनाची योजना लागू करण्यात आली आहे.

जलसंकटाची चर्चा तर खूप होते. भविष्यात जलसंकट मोठे येणार याचीही चर्चा होते. या गोष्टींचा आधीपासूनच विचार करून केंद्र आणि राज्य सरकारांनी योजना तयार कराव्यात यासाठी एका स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आमच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची आवश्यकता आहे. आरोग्य सुविधा आणि व्यवस्था निर्माण करण्याची खूप मोठी गरज आहे. या गरजेच्या पूर्तीसाठी नवीन कायदा आणि नवीन व्यवस्था तयार करण्याची गरज आहे. नव्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. नवतरूणांना डॉक्टर बनण्यासाठी संधी देण्याची गरज आहे. या गोष्टींचा विचार करून, वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्र प्रमाणबद्ध आणि पारदर्शी बनवण्यासाठी अनेक कायद्यांमध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचं काम करण्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले आहे. आज संपूर्ण जगामध्ये मुलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना आपण ऐकतो. भारतही आमच्या या लहान लहान मुलांना असहाय्य सोडू शकत नाही. या मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची आज आवश्यकता आहे. आम्ही हे कामही पूर्ण केले आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

2014 ते 2019 ते अशी पाच वर्षे सेवा करण्याची मला संधी मिळाली. अनेक गोष्टी अशा होत्या की, सामान्य माणूस आपल्या आवश्यकता, गरजा पूर्ण करण्यासाठी झगडत होता. आम्ही पाच वर्ष सातत्याने प्रयत्न केले. आमच्या नागरिकांच्या ज्या रोजच्या गरजा आहेत विशेष करून ग्रामीण भागातल्या गरीब जनतेच्या, शेतकरी बांधवांच्या, दलितांच्या, पिडीतांच्या, शोषितांच्या, आदिवासींच्या, वंचितांच्या ज्या  आवश्यकता त्या पूर्ण  करण्यावर आम्ही भर दिला. आम्ही आता आणखी वेगानं या दिशेनं कार्यरत आहोत. परंतु काळ बदलतोय. जर 2014 ते 2019 या काळाचा विचार केला तर हा काळ म्हणजे आवश्यकतांच्या पूर्तीचा काळ होता. आणि आताचा म्हणजे 2019 नंतरचा कालखंड देशवासियांच्या आकांक्षापूर्तीचा सुरू झाला आहे. त्यांची स्वप्ने साकार करण्याचा हा कालखंड आहे. आणि म्हणूनच 21 व्या शतकातला भारत कसा असेल? किती वेगानं पुढे जात असेल? हा देश किती व्यापक कार्य करणार आहे? हा देश किती महान,उच्च विचार करतोय? या सर्व गोष्टींचा विचार करून आगामी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाला पुढं घेवून जाणारा एक आराखडा तयार करून आपल्याला त्याअनुसार एका पाठोपाठ एक पावले टाकायची आहेत.

2014 मध्ये  मी देशासाठी नवीन होतो. 2013-14 मध्ये सत्तेत येण्याआधी मी संपूर्ण भारतामध्ये भ्रमण  करून देशवासियांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत  होतो. परंतु मला जाणवत होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निराशा होती. एक आशंका होती. अविश्वास होता. हा देश बदलू शकतो का? असा प्रश्न होता. एक निराशा जनसामान्यांच्या मनात भरून राहिली होती. कारण त्यांच्या मनावर गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवांचा परिणाम होता. मनातल्या आशा दीर्घकाळ टिकून राहत असतात. आशा-निराशेचा, पळभराचा खेळ असतो. परंतु 2019 मध्ये ज्यावेळी मी पाच वर्षे जनसामान्यांसाठी कठोर परिश्रम केल्यानंतर आणि जनसामान्यांसाठीच कार्य करण्याच्या समग्र भावनेबरोबर पुन्हा एकदा त्यांच्यासमोर गेलो, माझ्या सर्व देशवासियांच्या मनात विश्वासाचे भाव निर्माण झालेले दिसून आले. आम्ही क्षणनक्षण जनतेसाठी कार्य करीत राहिलो. 2019 मध्ये आम्ही त्यांच्यासमोर गेलो, तर दिसून आलं, देशवासियांच्या भावनांमध्ये बदल घडून आला आहे. त्यांच्या मनातल्या निराशेची जागा आता आशेनं घेतली होती. स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी जे संघर्ष करीत होते. त्यांना आता स्वप्नपूर्तीची सिद्धी आपल्या नजरेसमोर दिसायला लागली होती आणि सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये एकच विश्वासाची भावना निर्माण झाली होती की, ‘होय,माझा देश बदलू शकतोसामान्य माणसाचा एकच आवाज होता, ‘होय, आम्हीही देश बदलू शकतोयामध्ये त्यांना तीळमात्र शंका नव्हती. आम्ही मागे राहू शकत नाही.

130 कोटी नागरिकांच्या चेह-यावर आलेले भाव, या देशाच्या जनतेने दिलेला आवाज, आम्हाला नवीन ताकद आणि नवीन विश्वास देतोय. सबका साथ, सबका विकासह मंत्र जपत आम्ही मार्गक्रमण सुरू केले होते. परंतु पाच वर्षाच्या आतच देशवासियांनी, सर्वांच्या मनात विश्वासाचे रंग भरले आणि संपूर्ण देशाच्या वातावरणातच नवे रंग भरले.

या पाच वर्षात सर्वांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. आता आपल्याला आगामी काळात अधिक सामर्थ्‍याने, देशवासियांची सेवा करायची आहे. या निवडणुकीत मी पाहिलं होतं, आणि मी त्यावेळीही सांगितलं होतं, ही निवडणूक काही कोणी राजकीय नेता लढवत नाही किंवा कोणी राजकीय पक्ष लढवत नाहीए. तसेच मोदी निवडणूक लढवत नाही किंवा मोदींचे सहकारी निवडणूक लढवत नाहीत. तर देशाचा आम नागरिक, देशातली जनता-जनार्दन निवडणूक लढवत होती. 130 कोटी देशवासी ही निवडणूक लढत होते. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ते निवडणूक लढत होते. लोकशाहीचं योग्य स्वरूप या निवडणुकीतून स्पष्ट दिसून येत होतं.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

समस्यांचे समाधान यासोबतच स्वप्न संकल्प आणि सिद्धीचा अवलंब करत आपल्याला एकत्र चालायचे आहे. ही बाब स्पष्ट आहे की जेव्हा समस्यांचे निराकरण होते तेव्हा स्वावलंबनाची भावना जागृत होते. समस्यांचे निराकरण झाल्याने स्वावलंबनाची गती वाढते, जेव्हा स्वावलंबन होते तेव्हा आपसूकच स्वाभिमान जागृत होतो आणि स्वाभिमानाचे सामर्थ्य खूप ताकतवान असते. आत्मसन्माची ताकत सर्वाधिक असते आणि जेव्हा समाधान असते, संकल्प असतो, सामर्थ्य असते, स्वाभिमान असतो तेव्हा यशाच्या मार्गात कोणताच अडथळा येऊ शकत नाही आणि आज देश स्वभिमानासह यशाची नवीन उंची गाठण्यासाठी पुढे मार्गक्रमण करत आहे.

जेव्हा आपण समस्यांचे निराकरण करण्याचा विचार करतो तेव्हा त्याबाबत तुकड्या तुकड्यांमध्ये विचार व्हायला नको. समस्या या येणारच. एकत्र येऊन केवळ प्रशंसा मिळवण्यासाठी एखादा मुद्दा उचलणे आणि नंतर तो विषय सोडून देणे ही पद्धत देशाची स्वप्ने साकार करण्यासाठी कामी येणार नाही. समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही पाहिले असेल आपल्या मुस्लीम मुली, आपल्या बहिणी त्यांच्या डोक्यावर तीन तलाकची टांगती तलवार लटकत होती. त्या त्यांचे आयुष्य घाबरून जगत होत्या, त्यांना कदाचित तीन तलाकचा सामना करावा लागला नसेल पण त्या कधीही तीन तलाकचा बळी होऊ शकतात ही भीती त्यांना जगू देत नव्हती त्यांना भीती वाटायची. जगातील कित्येक इस्लामिक देशांनी देखील ही कुप्रथा आपल्या आधी बंद केली. परंतु कोणत्या ना कोणत्यातरी कारणामुळे आपल्या मुस्लीम माता आणि भगिनींना हा हक्क प्रदान करण्यात आपण कचरत होतो. जर या देशात आपण सती प्रथा बंद करू शकतो, आपण भ्रूण हत्येविरुद्ध कायदा तयार करू शकतोजर आपण बाल विवाहाविरुद्ध आवाज उठवू शकतो, आपण हुंडाबळी विरोधात कठोर पावले उचलू शकतो तर का नाही आपणतीन तलाक विरुद्ध देखील आवाज उठवायचा? आणि म्हणूनच भारतीय लोकशाहीची भावना लक्षात घेऊन, भारतीय राज्यघटनेची भावना, बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनेचा आदर करत, आपल्या मुस्लीम बहिणींना समान अधिकार मिळावा, त्यांच्यामध्ये देखील एक नवीन विश्वास जागृत व्हावा, भारताच्या विकास यात्रेत त्यादेखील सक्रीय भागीदार व्हाव्यात यासाठी आम्ही हा महत्वाचा निर्णय घेतला. हे  निर्णय राजकीय तराजूत तोलण्याचे निर्णय नसतात. शेकडो वर्षांपर्यंत माता भगिनींच्या आयुष्याच्या रक्षणाची हमी देतात. त्याचप्रकारे मी दुसरे उदाहरण देऊ इच्छितो, ‘कलम 370’, ‘35 अ’, काय करत होती ही कलमं? सरकारसमोर ही कलमे  समस्या होती? आम्ही समस्या टाळत देखील नाही आणि समस्या आपल्याकडे ठेवत देखील नाही. आता समस्या टाळण्याची देखील वेळ नाही आणि समस्या पाळण्याची देखील वेळ नाही. जे काम मागील 70 वर्षात झाले नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 70 दिवसांच्या आत कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचे काम भारताच्या दोन्ही सभागृहांनी, राज्यसभा आणि लोकसभेने दोन तृतीयांश मतांनी मंजूर केले. याचा हा अर्थ असा झाला की प्रत्येकाच्या मनात ही बाब होती परंतु सुरूवात कोण करणार, पुढे कोण येणार कदाचित ह्याचीच वाट पाहत होते आणि देशवासीयांनी मला हे कार्य दिले; आणि तुम्ही जे मला हे काम सुपूर्द केले आहे तेच करण्यासाठी आलो आहे. माझे स्वतःचे काही नाही. आम्ही जम्मू काश्मीरच्या पुनर्गठनाच्या दिशेने देखील पुढे मार्गक्रमण करत आहोत. 70 वर्ष... प्रत्येक सरकारने प्रयत्न केले आहेत परंतु इच्छित परिणाम साध्य झाले नाही आणि जेव्हा इच्छित परिणाम मिळाले नाहीत तेव्हा नवीन पद्धतीने विचार करण्याची, नवीन पद्धतीने पावले उचलण्याची गरज असते आणि जम्मू काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्या स्वप्नांना नवीन पंख मिळाले पाहिजेत ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी 130 कोटी देशवासीयांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी जे काही अडथळे समोर आले ते सर्व दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मागील 70 वर्षात या व्यवस्थांनी फुटीरतावादाला पाठबळ दिले आहे, दहशतवादाला जन्म दिला आहे, घराणेशाहीचे पालनपोषण केले आहे आणि एकप्रकारे भ्रष्टाचार आणि भेदभावाचा पाया मजबूत करण्याचे काम केले आहे. आणि म्हणूनच तिथल्या महिलांना अधिकार मिळावेत, तिथल्या माझ्या दलित बंधू भगिनींना देशातील इतर दलित बंधू भगिनींप्रमाणे अधिकार मिळत नव्हते. आपल्या देशातील अनुसूचित जाती जमातींना जे अधिकार मिळतात ते त्यांना देखील मिळाले पाहिजेत. तिथले आपले अनेक समाजातील लोकं मग ती गुर्जर असो, पटवाल असो, शिंपी असो, अशा अनेक जाती जमाती त्यांना राजकीय अधिकार देखील मिळाले पाहिजेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथले आपले सफाई कामगार बंधू भगिनींवर कायद्याची बंधने होती, त्यांची स्वप्ने पायदळी तुडवली होती. आज आम्ही त्यांना हे स्वातंत्र्य देण्याचे काम केले आहे. भारताची फाळणी झाली, लाखो करोडो विस्थापित इथे आले त्यांचा काहीच अपराध नव्हता. परंतु जे काश्मीर मध्ये येवून स्थायिक झाले त्यांना मानवी अधिकार देखील मिळाले नाहीत, नागरिकांचे अधिकार देखील मिळाले नाहीत. या काश्मीरमध्ये माझे डोंगराळ प्रदेशात राहणारे बंधू-भगिनी देखील आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कल्याणाच्या दिशेने देखील आम्ही पावले उचलत आहोत.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

जम्मू, काश्मीर आणि लडाखमध्ये सुख समृद्धी, शांती भारतासाठी एक प्रेरणा बनू शकते. भारताच्या विकास यात्रेत खूप मोठे योगदान देऊ शकते. त्या भागाची जुनी गौरवशाली परंपरा परत आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रयत्नासाठी ही जी नवीन व्यवस्था तयार झाली आहे ती थेट नागरिकांच्या हितासाठी काम करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. आता देशातील जम्मू काश्मीर मधील सामान्य नागरिक देखील विना अडथळा केंद्र सरकारला जाब विचारू शकतो. ही थेट व्यवस्था आज आम्ही कार्यरत करू शकलो. परंतु जेव्हा संपूर्ण देश, सर्व राजकीय पक्षांमध्ये - एकही राजकीय पक्ष अपवाद नाही - कलम 370, 35अ रद्द करण्यासाठी कोणी उघडपणे तर कोणी मूकपणे समर्थन देत होते. परंतु राजकीय वातावरणात निवडणुकींच्या तराजूत तोलणारे काही लोकं 370 च्या बाजूने काहीतरी बोलत राहतात. जे लोकं 370 च्या बाजूने वकिली करतात त्यांना देश विचारत आहे जर हे कलम 370, 35अ इतके महत्वाचे होते, इतके अनिवार्य होते त्यानेच भाग्य बदलणार होते तर 70 वर्षांपर्यंत बहुमत असून देखील तुम्ही लोकांनी त्याला कायमस्वरूपी का केले नाही? अस्थायी का ठेवले? परंतु याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देखील हे माहित होते, जे काम झाले आहे ते योग्य नव्हते. परंतु ते सुधारण्याची तुमच्यात हिंमत नव्हती. ते तुम्हाला रद्द करायचे नव्हते. राजकीय भविष्यावर प्रश्न उपस्थित होत होते. माझ्यासाठी देशाचे भविष्यच महत्वाचे आहे. माझ्यासाठी राजकीय भविष्य महत्वाचे नाही. आपल्या राज्यघटना निर्मात्यांनी, सरदार वल्लभभाई पटेल सारख्या महापुरुषांनी देशाच्या एकतेसाठी, राजकीय एकीकरणासाठी त्या कठीण प्रसंगी देखील मोठ्या हिंमतीने महत्वपूर्ण निर्णय घेऊन देशाच्या एकीकरणाचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु कलम 370 आणि 35अ मुळे काही अडथळे देखील आले. आज लाल किल्यावरुन जेव्हा मी देशाला संबोधित करतो तेव्हा मी हे अभिमानाने सांगतो की आज प्रत्येक भारतीय सांगू शकतो की एक देश एक राज्यघटना’, आणि आपण सरदार पटेलांचे एक भारत श्रेष्ठ भारताचेस्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. तेव्हा हे अगदी स्पष्ट आहे की आपण अशा व्यवस्था निश्चित केल्या पाहिजेत ज्या देशाची एकता बळकट करतील, देशाला जोडण्यासाठी सिमेंट सारखे काम केले पाहिजे आणि ही प्रक्रिया निरंतर चालू राहिली पाहिजे. प्रक्रिया एकवेळची नसावी अविरत सुरु राहिली पाहिजे. जीएसटीच्या माध्यमातून आम्ही एक देश एक करप्रणालीचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचप्रकारे मागील काही दिवसांमध्ये ऊर्जेच्या क्षेत्रात एक देश एक ग्रीडया कार्याला देखील आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्याचप्रकारे एक देश एक मोबिलिटी कार्डही व्यवस्था देखील आम्ही विकसित केली आहे. आणि आज देशात एक देश एकत्र निवडणुकायावर व्यापक चर्चा होत आहे. ही चर्चा झाली पाहिजे. लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे आणि कधीनाकधी एक भारत श्रेष्ठ भारताचेस्वप्न साकार करण्यासाठी अजून अशा नवीन गोष्टी सुरु केल्या पाहिजेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

देशाला नव्या उंचीवर न्यायचे असेल, जागतिक स्तरावर आपल्याला स्थान प्रस्थापित करायचे असेल तर देशातली गरीबी दूर करण्यावर भर द्यावाच लागेल. हे कुणावरही उपकार नाहीत. भारताच्या उज्वल भविष्यासाठी देश गरीबीमुक्त होणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात गरिबी कमी करण्याच्या दिशेने गरिबांची संख्या कमी करण्यात, ते गरिबीतून बाहेर यावेत या दिशेने अनेक यशस्वी प्रयत्न झाले. पूर्वीच्या तुलनेत अधिक जलद गतीने आणि अधिक व्यापक प्रमाणावर यात यश मिळालेले आहे. मात्र तरीही गरीब व्यक्तीला स्वत:च्या सन्मानाने, आत्मविश्वासाने स्वाभिमान जागृत करण्याची संधी मिळाली तर तो गरीबी दूर होण्यासाठी सरकारची वाट पाहणार  नाही. तो आपल्या सामर्थ्याने गरीबी दूर करण्यासाठी पुढे येईल. आपल्यापेक्षा कुणाही पेक्षा विपरीत परिस्थितीशी झुंजण्याची अधिक ताकद जर कुणात आहे तर ती माझ्या गरीब बंधू भगिनींमध्ये आहे. कितीही थंडी असो, तो मुठी आवळून गुजराण करू शकतो. ज्याच्या आत हे सामर्थ्य आहे त्याच्या सामर्थ्याचे आपण पुजारी बनूया . आणि त्यासाठी त्याच्या दैनंदिन अडचणी दूर करायला हव्यात, काय कारण आहेगरीबाकडे शौचालय नाही, घरात वीज नाही, राह्यला घर नाही, पाण्याची सोय नाही, बँकेत खाते नाही, कर्ज घ्यायला सावकाराच्या घरी जाऊन एक प्रकारे सगळे काही गहाण ठेवावे लागते. या, गरीबाचा आत्मसन्मान, त्याचा आत्मविश्वास, त्याचा स्वाभिमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करूया. बंधू आणि भगिनींनो, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली. अनेक कामे सगळ्या सरकारांनी आपापल्या परीने केली.

सरकार कुठल्याही पक्षाचे असो, केंद्राचे असो किंवा राज्य सरकारचे असो, प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले, मात्र ही वस्तुस्थिती आहे की, भारतात आजही जवळपास अर्धी घरे अशी आहेत, ज्या घरांमध्ये प्यायचे पाणी उपलब्ध नाही. त्यांना प्यायचे पाणी आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. माता भगिनींना डोक्यावर घागरी घेऊन 5-7 किलोमीटर दूर वणवण करावी लागते. बहुतांश भागात पाण्याची समस्या असून वेळ खर्ची होतो. म्हणूनच आम्ही, या सरकरने एका विशेष कामावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. तो आहे प्रत्येक घरात पाणी कसे पोहचेल, प्रत्येक घराला प्यायचे शुद्ध पाणी कसे मिळेल, आणि यासाठी आज मी लाल किल्ल्यावरून जाहीर करतो की आम्ही आगामी काळात जल जीवन मिशनहाती घेणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार या मिशनवर एकत्रितपणे काम करतील. येणाऱ्या काळात साडेतीन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जल जीवनया मिशनसाठी खर्च करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.

जलसंधारण असो, जलसिंचन असो, पावसाचा प्रत्येक थांब वाचविण्याचे काम असेल, समुद्राचे पाणी असेल किंवा टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर करण्याचे काम असेल, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक थेंबामागे अधिक पीक असेल, सूक्ष्म सिंचनाचे काम असेल, पाणी वाचवण्याचे अभियान असेल, पाण्याप्रती सामान्य नागरिक सजग व्हावा, संवेदनशील व्हावा, पाण्याचे महत्व समजावे यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत लहान मुलांना लहानपणापासून जल संवर्धनाचे शिक्षण दिले जावे, जलसंचय करण्यासाठी पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी आपण निरंतर प्रयत्न करायला हवेत. आणि या विश्वासाने पुढे जायला हवे की पाण्याच्या क्षेत्रात गेल्या ७० वर्षात जी कामे झाली, आपण पाच वर्षात ती ४ पटीने वाढवावी लागतील, आपण आता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. या देशात अनेक महान संत झालेत. शेकडो वर्षपूर्वी संत थिरुवल्लूर यांनी त्या काळी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली होती, शेकडो वर्षांपूर्वी, तेव्हा कुणी पाण्याचे संकट जाणले नसेल, पाण्याच्या महत्वाबाबत विचार केला नसेल. तेव्हा संत थिरुवल्लूर म्हणाले होते की मेरे इंद्र, अमियाधुम्हणजे  पाणी संपते तेव्हा निसर्गाचे कार्य  थांबते, एक प्रकारे  विनाश सुरु होतो. माझा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये एक तीर्थक्षेत्र आहे महुदी म्हणून, उत्तर गुजरातमध्ये आहे, जैन समुदायाचे लोक जात असतात. आजपासून सुमारे शंभर वर्षांपूर्वी तिथे एक जैन मुनी होऊन गेले, ते शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मले होते, शेतीची कामे करायचे. मात्र जैन परंपरेशी जुळवत ते जैनमुनी झाले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवले आहे, ते म्हणतात, बुद्धीसागर महाराजांनी लिहिले आहे, एक दिवस असा येईल जेव्हा पाणी किराण्याच्या दुकानात विकले जाईल, तुम्ही कल्पना करू शकता शंभर वर्षांपूर्वी एक संत लिहून जातात कि पाणी किराण्याच्या दुकानात विकले जाईल, आज आपण किराण्याच्या दुकानातून पाणी विकत घेतो.

कुठून कुठे आपण पोहोचलो. माझ्या प्रिय देशबांधवानो, आपल्याला थांबायचे नाही, आपल्याला पुढे जाण्यापासून डगमगायचे नाही. हे अभियान सरकारी बनायला नको. जलसंवर्धनाचे हे अभियान स्वच्छता अभियानाप्रमाणे सामन्यांचे अभियान बनायला हवे, जनसामान्यांची अपेक्षा घेऊन, जनसामान्यांचे सामर्थ्य घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आपला देश आता अशा टप्प्यावर आहे, ज्यामध्ये अनेक गोष्टी आता लपवून ठेवायची गरज नाही. आपण आव्हाने समोरून स्वीकारण्याची वेळ आली आहे. राजकारणाच्या नफा नुकसानाचा विचार करून आपण निर्णय घेतो, मात्र त्यामुळे देशाच्या भावी पिढीचे खूप नुकसान होते. असाच एक विषय आहे, जो मी आज लाल किल्ल्यावरून स्पष्ट करू इच्छितो, तो विषय आहे लोकसंख्या. आपल्याकडे लोकसंख्येचा विस्फोट होत आहे, हा विस्फोट आपल्यासाठी, आपल्या भावी पिढीसाठी अनेकानेक संकटे निर्माण करत आहे. मात्र, हे कबूल करावे लागेल की आपल्या देशात  एक जागरूक वर्ग आहे जो ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो. ते आपल्या घरात मुलांना जन्माला घालण्यापूर्वी व्यवस्थित विचार  करतात की मी त्याच्यासोबत अन्याय तर करत नाही ना, त्याच्या ज्या मानवी गरजा  असतील, त्या मी भागवू शकेन की नाही, त्याची स्वप्ने पूर्ण करू शकेन कि नाही. या सर्व निकषांची पडताळणी करून आपल्या कुटुंबाचा लेखाजोखा मांडून आपल्या देशात आजही स्वयंप्रेरणेने एक छोटा वर्ग आपले कुटुंब मर्यादित ठेवून आपल्या कुटुंबाचे भले करतोच, देशाचे भले करण्यातही मोठे योगदान देतो. हे सर्व सन्मानाला पात्र आहेत, त्यांचा जितका सन्मान करू, छोटा परिवार ठेवून ते देशभक्ती प्रकट करतात.

माझी इच्छा आहे की आपण सर्व समाजातील लोकांनी यांच्या जीवनाकडे बारकाईने पाहावे, त्यांनी लोकसंख्या वाढवण्यापासून आपल्या कुटुंबाला वाचवून जितकी सेवा केली आहे, ते पाहता एक दोन पिढ्यामध्येच कुटुंब कसे पुढे गेले आहे, मुलांनी कसे शिक्षण मिळवले, ते कुटुंब आजारापासून कसे मुक्त आहे, ते कुटुंब आपल्या गरजा कशा उत्तम प्रकारे पूर्ण करतो, आपण त्यांच्याकडून शिकावे, आपल्या घरात कुठल्याही मुलाला जन्माला घालण्यापूर्वी आपण विचार करायला हवा की, जे मूल माझ्या घरी जन्माला येईल, त्याच्या गरजा आपण पूर्ण करू शकु का? त्यासाठी माझी तयारी झाली आहे का? त्याला मी समाजाच्या भरवशावर सोडून देईन का? मी त्याला त्याच्या नशिबावर सोडून देईन का? कुणीही मातापिता असा विचार करू शकत नाही, जे मातापिता तरीही मुलांना जन्माला घालतात, यासाठी एक सामाजिक जागरूकतेची गरज आहे. ज्यांनी यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत समाजातील अन्य घटकांनी, जे अजूनही त्यांच्यापासून दूर आहेत त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकसंख्येची चिंता करावी लागेल. सरकारांनी देखील विविध योजना आणायला हव्यात राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, प्रत्येकाने ही जबाबदारी खांद्याला खांदा भिडवून पार पाडायला हवी. आपण अस्वस्थ, अशिक्षित समाजाचा विचार करू शकत नाही. 21 व्या शतकातील भारत, स्वप्ने पूर्ण करण्याचे सामर्थ्य व्यक्तीपासून सुरु होते. कुटुंबापासून सुरु होते, जर लोकसंख्या शिक्षित नसेल, तंदुरुस्त नसेल, तर ते घर आणि तो देश सुखी होऊ शकत नाही. लोकसंख्या शिक्षित असेल, सामर्थ्यवान असेल, कुशल असेल, आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संसाधने उपलब्ध असतील तर मला वाटते की देश या गोष्टी पूर्ण करू शकतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

तुम्हाला चांगले ठाऊक आहे कि  भ्रष्टाचार, घराणेशाहीने आपल्या  देशाचे कल्पनेपलीकडे नुकसान केले आहे. वाळवीप्रमाणे आपल्या आयुष्यात घुसले आहेत, ते दूर करण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत आहोत. यश मिळत आहे. मात्र हा रोग इतका खोलवर पसरला आहे की आपल्याला अधिक प्रयत्न केवळ सरकारी स्तरावर नाही तर प्रत्येक स्तरावर करावे लागतील, निरंतर करावे लागतील. एकदा करून भागणार नाही कारण  वाईट सवयी, जुने आजार कधी कधी बरे होतात, मात्र संधी मिळताच पुन्हा डोके वर काढतात. तसेच हा असा रोग आहे ज्याचा बिमोड करण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक पावले उचलली आहेत. प्रत्येक स्तरावर इमानदारी आणि पारदर्शीपणाला बळ मिळावे यासाठी देखील अनेक प्रयत्न केले गेले आहेत. तुम्ही पाहिले असेल, गेल्या पाच वर्षात सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. आमच्या सुशासनात जे अडथळे बनत होते, त्यांना सांगितले, तुमच्या सेवेची देशाला गरज नाही. आणि मी स्पष्ट मानतो की व्यवस्थेत बदल व्हायला हवा. मात्र त्याचबरोबर समाजजीवनात बदल व्हायला हवा. तसेच व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात विचारात बदल व्हायला हवा. तेव्हा कुठे आपण इच्छित परिणाम साध्य करू शकतो.

बंधु भगिनींनो,

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर आज आपला देश परिपक्व झाला आहे. लवकरच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. तेव्हा या स्वातंत्र्याचे सहज संस्कार, सहज स्वभाव आणि सहज अनुभूतीही आवश्यक आहे. मी जेव्हा माझ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतो, तेव्हा नेहमीच एक गोष्ट बोलतो. याआधी याबद्दल मी कधीही सार्वजनिक चर्चा केलेली नाही, मात्र आज हा ही विषय बोलण्याची इच्छा आहे. मी माझ्या अधिकाऱ्यांशी वारंवार बोलतो की, स्वातंत्र्याला इतकी वर्ष होऊनही जनतेच्या दैनंदिन जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमी होऊ शकत नाही का? संपू शकत नाही का? माझ्यासाठी स्वतंत्र्य भारताचा अर्थ असाच आहे की हळूहळू सरकारने जनतेच्या आयुष्यातून बाहेर निघावे आणि नागरिकांना स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणे जगू द्यावे. त्यांच्यासाठी सगळे मार्ग खुले असले पाहिजेत, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता यावे, देशाच्या हितासाठी आणि स्वत:च्या प्रगतीसाठी ते पुढे वाटचाल करु शकतील, अशी व्यवस्था निर्माण करायलाच हवी. आणि म्हणूनच सरकारचा दबाव असायला नको. मात्र त्यासोबतच जेव्हा संकटांचा काळ असेल, तेव्हा सरकारची सोबत नक्कीच हवी, ना सरकारचा दबाव हवा, ना अभाव. मात्र आपण आपली स्वप्न घेऊन प्रगती करायला हवी. आणि या वाटचालीत सरकारने आपल्या साथीदाराच्या रुपात प्रत्येक ठिकाणी असायला हवे. गरज पडल्यास जनतेला वाटायला हवे की सरकार आपल्या सोबत आहे, आपल्याला काळजी करायची गरज नाही, अशी व्यवस्था आपण निर्माण करु शकणार नाही का?

आम्ही अनेक निरुपयोगी कायदे रद्द केले. गेल्या पाच वर्षात जवळपास रोज मी एक निरुपयोगी कायदा रद्द केला. देशातल्या लोकांपर्यंत कदाचित ही गोष्ट पोचलेली नाही. जवळजवळ रोज एक कायदा संपवला. 1450 कायदे आम्ही रद्द केले. सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यावरचा भार कमी केला. दुसऱ्यांदा सत्तेत आलो. केवळ 10 आठवडेच झाले आहेत, मात्र इतक्या कमी काळात आम्ही 60 कायदे रद्द केले. इज ऑफ लिव्हींगम्हणजेच जगणे सुकर करणेही स्वतंत्र भारताची गरज आहे आणि म्हणूनच इज ऑफ लिव्हींगवर आम्ही भर देत आहोत. आज इज ऑफ डुईंगम्हणजेच उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात पुष्कळ प्रगती केली आहे. या क्रमवारीत पहिल्या 50 देशांमधे स्थान मिळवण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यासाठी अनेक सुधारणांची गरज आहे. अनेक छोटे-मोठे अडथळे आहेत. एखाद्याला छोटासा उद्योग सुरु करायचा असेल, तर त्याला अनेक ठिकाणी फॉर्म भरत बसावे लागते, कार्यालयांचे खेटे घालावे लागतात. या सगळ्या अडथळ्यांना संपवतांना केंद्रासोबतच राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सोबत घेत आम्ही उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. आणि जगालाही विश्वास निर्माण झाला आहे की भारतासारखा इतका मोठा विकसनशील देश एवढी मोठी झेप घेऊ शकतो. इज ऑफ डुईंग बिझनेसहा केवळ टप्पा आहे. इज ऑफ लिव्हींगहे माझं लक्ष्य आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात त्याला सरकारी कामांसाठी काहीही त्रास व्हायला नको. त्याचे अधिकार त्याला सहज मिळावे, या दिशेने आपण काम करण्याची गरज आहे.

प्रिय देश बांधवांनो,

आपल्या देशाने प्रगती करावी, मात्र ठराविक टप्प्याने होणारी प्रगती आता पुरेशी नाही. अशी थांबून थांबून होणारी प्रगती आता आपल्याला परवडणारी नाही. आपल्याला उंच झेप घेण्याची गरज आहे. यासाठी आपल्याला आपली दृष्टी बदलायची गरज आहे. भारताला जागतिक मानांकनांच्या बरोबरीत आणण्यासाठी आपल्या आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. कोणी काहीही म्हटले, कोणी काहीही लिहिलं तरी सर्वसामान्य माणसाला नेहमीच उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात अशीच इच्छा असते. असेच त्यांचे स्वप्न असते. आणि म्हणूनच आम्ही असा निर्णय घेतला आहे की, या कालखंडात 100 लाख कोटी रुपये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी आम्ही खर्च करणार आहोत. त्यातून रोजगारही निर्माण होतील आणि सार्वजनिक जीवनात नव्या व्यवस्था निर्माण होतील, ज्यातून जनतेच्या गरजांची पूर्ती होईल. सागरमाला प्रकल्प असो किंवा मग भारतमाला प्रकल्प, आधुनिक रेल्वे स्थानके असो किंवा बस स्थानकांची निर्मिती, आधुनिक रुग्णालये असोत किंवा मग जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारायच्या असोत, या सगळ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आम्हाला निर्माण करायच्या आहेत. आज देशात सागरी बंदरांचीही आवश्यकता आहे.

समाज जीवनाचे मन आज बदललं आहे, तेही आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. पूर्वी एक काळ असा होता, ज्यावेळी कागदावर फक्त निर्णय झाला की अमूक रेल्वे स्टेशन, अमूक भागात बनणार आहे, तर कित्येक महिने, वर्षे लोकांमधे याविषयी आनंद आणि सकारात्मकतेची भावना असायची, की आता लवकरच आपल्याकडे नवे रेल्वे स्थानक बनणार आहे. मात्र आज काळ बदलला आहे. आज केवळ रेल्वे स्थानक मिळाले म्हणून सर्वसामान्य व्यक्तींना आनंद होत नाही, ते लगेच विचारतात, ‘वंदे भारत एक्सप्रेस आमच्याकडे कधी येणार?’ त्यांचा विचार बदलला आहे. जर आपण त्यांना उत्तम दर्जाचे बस स्थानक बांधून दिले किंवा पंचतारांकीत रेल्वे स्थानक बांधून दिले, तर तिथले नागरीक अस म्हणणार नाही की खुप उत्तम काम केले. उलट ते लगेच विचारतील, विमानतळ कधी येणार? म्हणजेच आता त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. कोणे एकेकाळी केवळ रेल्वेचा थांबा मिळाल्यावर समाधानी होणारा आपल्या देशातला नागरीक आज लगेच विचारतो की, विमानतळ आमच्याकडे कधी येणार? पूर्वी कोणत्याही नागरीकाला विचारले तर ते म्हणायचे आमच्याकडे पक्का रस्ता कधी होणार? आज जर कोणाला विचारले तर ते म्हणतात की चार पदरी रस्ता बनणार की सहा पदरी? आणि माझं असं मत आहे की, महत्वाकांक्षी भारतासाठी हा बदललेला दृष्टीकोन चांगला आहे. सुरुवातीला एखाद्या गावाबाहेर नुसताच विजेचा खांब आणून ठेवला तरी लोकांना वाटायचं की आपल्याकडे वीज आली. केवळ खांब आणून ठेवला तरी देखील ते खूष व्हायचे. आज मात्र, विजेच्या तारा लागल्या, घरात मीटर लागले तरीही ते विचारतात की 24 तास वीज कधी मिळणार? आता नागरिक केवळ खांब, तारा आणि मीटर यात समाधानी होत नाही तर पूर्णवेळ वीज त्याला हवी आहे. सुरुवातीला जेव्हा मोबाईल फोन आले तेव्हा लोकांना या फोनचाच आनंद होता. मात्र, आज नागरिक लगेच विचारतात डेटाचा वेग काय? हा बदललेला काळ आणि नागरिकांची बदललेली मनोवृत्ती आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या सोबतच जागतिक निकषांशी तुलना करत आपल्या देशातल्या पायाभूत सुविधा आधुनिक बनवायला हव्यात. स्वच्छ ऊर्जा असेल, वायू आधारित अर्थव्यवस्था असेल, गॅस ग्रीड असेल, दळणवळणाच्या सुविधा असतील अशा अनेक क्षेत्रात आपल्याला प्रगती करायची आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

साधारणपणे आपल्या देशात कायम सरकारांची ओळख अशी असायची की सरकारने अमूक प्रदेशासाठी काय केले? अमूक लोकांसाठी काय केले? अमूक समुहासाठी काय केले? साधारणपणे काय दिलं, किती दिलं, कोणाला दिलं, कोणाला मिळालं? याच वाक्यांभोवती ही चर्चा फिरत असते. याच वाक्यांवर सरकार आणि जनमानस विचार करत असते आणि हा विचार चांगलाही मानला गेला. कदाचित त्यावेळची ती गरजही असेल. मात्र, आता कोणाला काय मिळालं, कसं मिळालं, किती मिळालं या सगळ्या सोबतच आपण सगळे एकत्र येऊन देशाला काय देणार? देशाला कुठे घेऊन जाणार? देशासाठी काय मिळवणार? ही स्वप्न घेऊन जगणं, या स्वप्नांसाठी संघर्ष करणं आणि ही स्वप्नं साकार करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच पाच लाख अब्ज म्हणजेच पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न आम्ही पाहतो आहे. 130 कोटी देशबांधव जर छोट्या छोट्या गोष्टी घेऊन प्रगती करायला लागले तर पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होऊ शकेल. अनेकांना आज ते अशक्य वाटतं. ते कदाचित चूकत नसतीलही. हे कठीण आहेच, मात्र कठीण गोष्टी केल्या नाहीत तर देश पुढे कसा जाणार? कठीण आव्हाने पेलली नाहीत तर चालण्याची ताकद कशी येईल. मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातूनही आपण प्रगतीसाठी नियमित मोठी उद्दिष्ट समोर ठेवायला हवी आणि आम्ही ती ठेवली आहेत. मात्र, ती हवेत ठेवलेली नाहीत. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात आपण दोन ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलो. 70 वर्षांच्या आपल्या विकास यात्रेत आपण दोन ट्रिलियन डॉलर्सपर्यंतचा प्रवास केला. मात्र, 2014 ते 2019 या केवळ पाच वर्षांच्या काळात आपण दोन ट्रिलियन पासून तीन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलो. एक ट्रिलियन डॉलर्सची त्यात भर घातली. जर पाच वर्षात आपण एवढी मोठी उडी मारू शकतो तर येत्या पाच वर्षात आपण पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करू शकतो. आणि प्रत्येक भारतीयाचं हे स्वप्न असायला हवं. जेव्हा अर्थव्यवस्था प्रगती करते तेव्हा आयुष्य अधिक दर्जेदार होण्याच्या सुविधा वाढतात. छोट्यातल्या छोट्या व्यक्तीची स्वप्नं साकार होण्यासाठीच्या संधी निर्माण होतात आणि या संधी निर्माण करण्यासाठी आपल्याला आर्थिक क्षेत्राला गती द्यावी लागेल. देशाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावं असं स्वप्न आपण जेव्हा बघतो, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना गरीबातल्या गरीब व्यक्तीकडे त्याचं स्वत:चं घर असावं, असं स्वप्न आपण जेव्हा बघतो, देशाल्या प्रत्येक व्यक्तीकडे वीज असायला हवी असं स्वप्न आपण जेव्हा बघतो, देशातल्या प्रत्येक गावात ऑप्टीकल फायबर नेटवर्क असावं असं स्वप्न आपण जेव्हा बघतो, रस्ते, दळणवळण असावं, ब्रॉडबॅण्डची सुविधा असावी अशी सगळी स्वप्न जेव्हा आपण बघतो, आपली सागरी संपत्ती, आपली नील अर्थव्यवस्था मजबूत बनावी, आपल्या मच्छिमार बांधवांना आपण सक्षम करावं, आपले शेतकरी अन्नदाता आहेत त्यांना ऊर्जादाता बनवावं, त्यांना निर्यातदार बनवावं, आपल्या शेतकऱ्यांनी बनवलेल्या वस्तू जागतिक बाजारपेठेत पोहोचाव्या अशी स्वप्नं घेऊन आम्ही वाटचाल करू इच्छितो.

आपल्या देशाला निर्यातदार बनवावे लागेल. आज आपण जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत. जगातल्या अनेक छोट्या छोट्या देशांमधे जी ताकद आहे, ती आमच्या एकेका जिल्ह्यात आहे. हे सामर्थ्य आपण समजून घ्यायला हवे, जाणून घ्यायला हवे. आणि आपला प्रत्येक जिल्हा निर्यातीचं केंद्र बनेल या दिशेने आपण प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक जिल्ह्याच्या आपल्या हस्तकौशल्याच्या वस्तू आहेत, प्रत्येक जिल्ह्याची आपापली वैशिष्ट्ये आहेत. एखाद्या जिल्ह्याची ओळख तिथे निर्माण होणाऱ्या अत्तरांमुळे आहे, तर एखाद्या जिल्ह्याची ओळख तिथल्या साड्यांमुळे आहे. एखाद्या ठिकाणची भांडी प्रसिद्ध आहेत, तर एखादा जिल्हा मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्याचं आपापलं वैविध्य आहे, सामर्थ्य आहे. ‘झीरो डिफेक्ट, झीरो इफेक्ट’ या तत्वातून अचूक आणि पर्यावरणाचे काहीही नुकसान न करणाऱ्या वस्तुंची निर्मिती करायला हवी आणि जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी या उत्पादनांची निर्यात करायला हवी. या दिशेने आपण काम केले, तर देशातल्या तरुणांनाही रोजगार मिळेल. आपल्या छोट्या आणि लघु उद्योगांना यामुळे मोठी शक्ती मिळेल आणि ही शक्ती वाढवायची आहे.

पर्यटनासाठी आपला देश जगात एक आश्चर्य म्हणून नावाजला जाऊ शकतो. मात्र काही ना काही कारणाने आपल्या देशात पर्यटनाचा विकास म्हणावा तेवढा झाला नाही. चला, आपण सगळे देश बांधव मिळून निश्चय करु की आपण सगळे देशातल्या पर्यटनाला चालना देऊ. यामुळे देशातले पर्यटन वाढेल, कमीत कमी भांडवलात अनेकांना यामुळे रोजगार मिळेल, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि आज जगभरातले लोक भारत बघण्यासाठी उत्सुक आहेत. आपण याचा विचार करायला हवा की जग आपला देश बघायला कसे येऊ शकतील. पर्यटनाला कशी चालना मिळेल आणि त्यासाठी पर्यटन क्षेत्रांची व्यवस्था असेल किंवा सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न, उत्तम शिक्षण, उत्तम रोजगाराच्या संधी, चांगलं आयुष्य जगण्यासाठीच्या सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध व्हायला हव्यात. आमच्या शास्त्रज्ञांना संशोधनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. आपल्या सैन्य दलांपाशी उत्तम शस्त्र आणि सुविधा असाव्यात आणि हे सगळ आपल्या देशातच तयार झालेले असावे. अशी अनेक क्षेत्रे आहेत जी भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी बळ देऊ शकतात.

आज देशात आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. जेव्हा सरकार स्थिर असते आणि धोरणे निश्चित असतात, व्यवस्था स्थिर असते, तेव्हा एक विश्वास निर्माण होतो. देशातल्या जनतेने हे काम केले आहे. आज भारतात असलेल्या राजकीय स्थैर्याकडे सगळ जग आदर आणि कौतुकाने बघत आहे. ही संधी आपण वाया घालवता कामा नये. आज आपल्यासोबत व्यापार करण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक आहे. त्याला आपल्यासोबत व्यवहार करायचा आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ही महागाई नियंत्रणात ठेवत आपण विकास दर कायम वाढवत नेला आहे, हे समीकरण आम्ही कायम राखलं आहे. कधी विकास दर वाढतो, त्यावेळी महागाई नियंत्रणात नसते, तर कधी महागाई नियंत्रणात असली, तर विकास दर वाढत नाही. मात्र आमच्या सरकारने महागाईला नियंत्रणातही ठेवले आहे आणि विकास दरही सातत्याने वाढवत नेला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची मूलभूत रचना अत्यंत मजबूत आहे आणि या मजबूतीमुळेच प्रगती करण्याचा विश्वास आपल्यामधे निर्माण होतो. यातूनच जीएसटीसारखे कर रचना निर्माण करणे, दिवाळखोरी आणि नादारी संहितेसारख्या सुधारणा आणणे, यातून आपल्यामधे एक नवा विश्वास निर्माण झाला आहे. आपल्या देशाचं उत्पादन वाढावं, आपल्या नैसर्गिक संपत्तीचं मूल्यवर्धन व्हावे, जगात आपल्या उत्पादनांची निर्यात व्हावी, आपण असं स्वप्न का बघू नये की जगातल्या प्रत्येक देशात काही ना काही भारतीय उत्पादन निर्यात केले जाईल. भारतातला एकही जिल्हा असा नसेल, जिथून काही ना काही निर्यात होत नाही. ही दोन्ही स्वप्न घेऊन आपण वाटचाल केली, तर आपण उत्पन्न वाढवू शकतो. आपल्या देशातले छोटे-छोटे उद्योजकही जागतिक बाजारात जाण्याचे स्वप्न बघतात. जागतिक बाजारपेठेत जाऊन भारताची प्रतिष्ठा आणखी वाढवण्याची संधी त्यांना मिळावी. आपल्या गुंतवणूकदारांनी अधिक गुंतवणूक करावी, अधिक रोजगार निर्माण करावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. काही गैरसमजूतींनी आपल्या देशात पक्क स्थान निर्माण केले आहे, या गैरसमजूती दूर कराव्या लागतील. जे लोक देशात संपत्ती निर्माण करतात, जे लोक देशाच्या संपत्तीत भर घालतात ते देशाची सेवाच करत असतात. अशी संपत्ती निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण संशयाच्या नजरेने बघायला नको, त्यांच्या विषयी आपल्या मनात हीन भावना नसावी. देशात संपत्ती निर्माण करणाऱ्यांविषयीही आपल्या मनात आदराची भावना असली पाहिजे, त्यांचा सन्मान करायला हवा. जोपर्यंत संपत्ती निर्माण होणार नाही, तोपर्यंत तिचं वितरणंही होणार नाही. आणि वितरण झालं नाही, तर गरीबांपर्यंत ही संपत्ती पोहोचणार नाही. आणि म्हणूनच संपत्ती निर्माण करणं हे ही आपल्या सारख्या देशासाठी अत्यंत महत्वाचं काम आहे आणि हे काम आपण पुढे न्यायला हवं. जे लोक अशी संपत्ती निर्माण करत आहेत, ते स्वत: माझ्यासाठी देशाची संपत्तीच आहेत. त्यांचा गौरव आणि सन्मान, त्यांच्या कार्याला बळ देईल.

माझ्या प्रिय देश बांधवांनो,

आज आपण विकासासोबतच शांतता आणि सुरक्षिततेकडेही लक्ष द्यायला हवं, कारण तो विकासाचा अनिवार्य पैलू आहे. आज संपूर्ण जग असुरक्षिततेच्या विळख्यात सापडलं आहे. जगाच्या कुठल्या न कुठल्या भागात, कुठल्यातरी रुपात मृत्यूची सावली जाणवते. अशा पार्श्वभूमीवर विश्व शांती आणि समृद्धीसाठी भारताला आपली भूमिका पार पाडावीच लागेल. या जागतिक परिस्थितीत भारत केवळ मूक दर्शक बनून राहू शकत नाही आणि भारत दहशतवादाशी सातत्याने लढा देत आहे. जगाच्या कुठल्याही भागात होणारी दहशतवादी घटना म्हणजे मानवतेविरोधात पुकारलेले युद्धच आहे. आणि म्हणूनच जगभरातल्या मानवतावादी शक्तींनी एकत्र येत, दहशतवादाला संरक्षण देणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, दहशतवादाची निर्यात करणाऱ्या सर्वच शक्तींचं खरं रुप जगापुढे आणणं अत्यंत महत्वाचं आहे. जागतिक शक्ती एकत्र करत, दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आपली भूमिका बजावत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. काही लोकांनी केवळ भारतच नाही, तर आमच्या शेजारी राष्ट्रांनाही दहशतवादी कारवायांनी त्रस्त केले आहे. बांगलादेश दहशतवादाशी लढतो आहे. अफगाणिस्तान देखील दहशतवादाशी लढतो आहे. श्रीलंकेत तर चर्चमधे असलेल्या निरपराध नागरीकांचा बळी घेतला गेला. अशा अनेक दु:खद घटना आसपास घडत आहेत. जेव्हा आपण आतंकवादाविरोधात लढाई करतो, तेव्हा या संपूर्ण प्रदेशात शांतता आणि सुरक्षितता नांदावी, यासाठी सक्रिय भूमिका पार पाडत असतो. आपला शेजारी देश, एक चांगला मित्र असलेल्या अफगाणिस्तानात, येत्या 4 दिवसांनी स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. आणि हे त्यांच्या स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष आहे. आज या लाल किल्ल्यावरुन माझ्या अफगाणिस्तान मधल्या मित्रांना मी शंभराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. दहशतवाद आणि हिंसेचे वातावरण निर्माण करणारे, भयाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना समूळ नष्ट करणे हे सरकारचे धोरण आहे आणि याविषयी सरकारचा दृष्टीकोन पूर्णपणे स्पष्ट आहे, हे सांगतांना माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आपली सुरक्षा दले आणि सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत कौतुकास्पद काम केले आहे. संकटाच्या काळातही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गणवेशात उभे असलेल्या सर्व जवानांनी आपल्या आयुष्यातला वर्तमानकाळ देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अर्पण केला आहे. त्या सर्वांना मी सलाम करतो. मात्र त्याचबरोबर योग्य वेळेत सुधारणा करण्याचीही अतिशय गरज आहे. तुम्ही पाहिले असेल, आपल्या देशात सैन्य व्यवस्था आणि सैन्य दलं यांच्यातल्या सुधारणांबाबत दीर्घकाळापासून चर्चा सुरु आहे. अनेक पक्षांनी त्याविषयी चर्चा केली, अनेक आयोगं स्थापन झाले, समित्या झाल्या आणि त्या सर्वांनी दिलेल्या अहवालातून साधारणपणे एकच सुर आपल्याला दिसतो. आपल्या तिन्ही सैन्य दलांमधे म्हणजेच लष्कर, नौदल आणि वायू दल या तिन्हीमधे समन्वय निश्चितच आहे. आपल्याला अभिमान वाटावा, अशीच आपली सेना आहे. ते आपापल्या परीने आधुनिक बनण्यासाठी प्रयत्नही करत आहेत. मात्र आज जग जसं बदलत चालले आहे, युद्धाचं स्वरुप आणि क्षेत्र बदलत चाललं आहे, तंत्रज्ञान आधारीत व्यवस्था निर्माण होत आहेत, अशावेळी भारतालाही तुकड्या तुकड्यांमधे विचार करुन चालणार नाही. आपल्या संपूर्ण सैन्य शक्तीला एकत्रित येऊन एकाच दिशेने पुढे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जल, स्थल आणि नभ यापैकी एक पुढे असेल, आणि दुसरी शक्ती मागे असली, तर चालणार नाही. तिघांनाही एकत्र, एकाच उंचीवर जावे लागेल. मग ते सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षेनुसार असो किंवा मग जागतिक पातळीवर बदललेल्या युद्ध नीतिच्या स्वरुपाशी सुसंगत असो, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी आज लाल किल्ल्यावरुन एका महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करतो आहे. या विषयातले जाणकार दीर्घकाळापासून ही मागणी करत होते. त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही ‘चिफ ऑफ डिफेन्स’ म्हणजे संरक्षण प्रमुख या पदाची नवी व्यवस्था निर्माण करणार आहोत. आणि पदाची निर्मिती झाल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या शीर्षस्थानी एक प्रभावी नेतृत्व मिळेल. भारताच्या सामरीक सामर्थ्याच्या दृष्टीनं हे पद अत्यंत महत्वाचे ठरेल आणि संरक्षण दलांमधे ज्या सुधारणा आम्हाला करायच्या आहेत, त्यासाठी याची मदत होईल.

माझ्या देश बांधवांनो,

आपण भाग्यवान आहोत की आपण अशा एका कालखंडात जन्मलो आणि जगतो आहोत, जिथे आपल्याला काही ना काही करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. कधी कधी विचार करतो की ज्यावेळी स्वातंत्र्य लढा सुरु होता, त्यावेळी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यासारखे महापुरुष बलिदान देण्यासाठी स्पर्धा करत होते. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचे पाईक देशातल्या घराघरात जाऊन स्वातंत्र्याची ज्योत पेटवत होते. त्यावेळी आपण नव्हतो, त्यावेळी जन्म झाला नव्हता, त्यामुळे देशासाठी बलिदान देण्याची संधी आपल्याला मिळालेली नाही. मात्र देशासाठी जगण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आणि आपलं हे सौभाग्य आहे की आपण या कालखंडात जन्मलो, कारण पूज्य बापू महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे हे वर्ष आहे. आपल्याला आपल्या कालखंडात ही संधी मिळाली हे ही आपले भाग्यच आहे. आणि दुसरे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला लवकरच 75 वर्ष होणार आहेत, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशासाठी बलिदान दिलेल्यांच्या स्मरणातून आपल्याला प्रेरणा मिळते. ही संधी आपण वाया घालवायला नको. महात्मा गांधींची स्वप्न आणि देशासाठी बलिदान केलेल्यांची स्वप्न या अनुरुप देशातल्या नागरीकांनी प्रेरणा घेऊन कार्य करत आपल्याला प्रगती करायची आहे.

मी याच लाल किल्ल्यावरुन 2014 साली स्वच्छतेसाठी आवाहन केलं होतं. 2019 मधे आगामी काही काळातच भारत हगणदारीमुक्त घोषित करु असा मला विश्वास आहे. राज्य, गावे, नगरपालिका प्रसारमाध्यम सर्वांनीच जनआंदोलन सुरु केलं. सरकारने नव्हे तर लोकांनीच हा मुद्दा उचलून धरला आणि त्याचे परिणाम तुमच्या समोर आहे.

माझ्या प्रिय देश बांधवांनो,

एक छोटीशी अपेक्षा आपल्यासमोर व्यक्त करु इच्छितो या 2 ऑक्टोबरला आपण आपल्या देशाला प्लॅस्टिक मुक्त करु शकतो पूज्य बापूजींचे स्मरण करत आपण गटागटाने, शाळांमधून, महाविद्यालयांमधून एकत्र येऊया. घरातील प्लॅस्टिक असो, बाहेर रस्त्यावर पडलेले प्लॅस्टिक असो, सर्व एकत्र करा. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतींनी ते एकत्र जमा करण्याची व्यवस्था करावी. येत्या 2 ऑक्टोबरला देशाला प्लॅस्टिक मुक्त करण्याच्या दिशेने आपण एक पहिले ठोस पाऊल उचलू शकतो का? या, माझ्या देशबांधवांनो, आपण या दिशेने पुढे जाऊया. मी स्टार्टअप, तंत्रज्ञ, उद्योजकांना आवाहन करतो की, आपण या प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेसाठी काय करु शकतो? जसं महामार्ग बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा उपयोग होतोय, अशा विविध गोष्टी असू शकतात, मात्र ज्या कारणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत, त्याच्या मुक्तीसाठी आपल्यालाच मोहीम हाती घ्यावी लागेल, मात्र आपल्याला त्याबरोबरच पर्यायी व्यवस्थाही द्यावी लागेल. मी तर सर्व दुकानदारांना आवाहन करु इच्छितो की, तुम्ही तुमच्या दुकानांवर नेहमीच एक फलक लावता, या फलकाबरोबरच आपण आणखी एक फलकही आपल्या दुकानावर लावावा, ‘कृपया आमच्याकडून प्लॅस्टिकच्या पिशवीची अपेक्षा करु नये.  प्रत्येकाने आपल्या घरातूनच कापडी पिशवी आणावी किंवा आम्ही कापडी पिशवीची विक्री करु, घेऊन जा’.

आपल्याला एक वातावरणनिर्मिती करायला हवी. आपण दिवाळीत प्रत्येकाला भेटवस्तू देतो. मग यावर्षी आणि नेहमीच कापडाची पिशवीच भेटवस्तू म्हणून का देऊ नये आणि हीच पिशवी घेऊन लोक बोहर बाजारात गेले, तर तुमच्याच कंपनीची जाहिरात होईल. डायरी, कॅलेंडर भेटवस्तू म्हणून देता पण त्याने तुमची जाहिरात होत नाही, या कापडी पिशवीमुळे तुमच्या कंपनीची निदान जाहिरात तर होईल. ज्यूटची पिशवी असेल, त्यामुळे माझ्याच शेतकऱ्याला फायदा होईल. कापडाची पिशवी असेल, तर माझ्या शेतकऱ्याला फायदा होईल. छोटी छोटी शिलाईसारखी कामं असतील त्यामुळे एखाद्या गरीब विधवा आईला मदत होईल. म्हणजेच आपला एक छोटासा निर्णय सुद्धा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणू शकतो. आपण त्या दिशेने काम करुया.

माझ्या प्रिय देश बांधवांनो,

5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं स्वप्न असो, स्वावलंबी भारताचे स्वप्न असो, महात्मा गांधीजींच्या आदर्शांनुसार जगणं आजही लागू आहे. महात्मा गांधीजींचे विचार आजही स्तुत्य आहेत आणि म्हणूनच ‘मेक इन इंडियाचे’ जे अभियान आपण हाती घेतले आहे, त्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. ‘मेड इन इंडिया उत्पादन’ ही आपलं प्राधान्य का असू नये? आपण हे ठरवलं पाहिजे की मी माझ्या जीवनात माझ्या देशात जे बनलं जातं जे विकलं जातं ती माझ प्राधान्य असेल आणि आम्ही तर भाग्यशाली भविष्यासाठी स्थानिक उत्पादनांवर भर दिला पाहिजे. भाग्यशाली भविष्यासाठी स्थानिक, चांगल्या भविष्यासाठी स्थानिक उत्पादने, उज्ज्वल भविष्यासाठी स्थानिक उत्पादने, जे गावात बनतं, प्रथम त्याला प्राधान्य, तिथे नसेल, तर तालुक्यात, तालुक्याच्या बाहेर जावं लागलं तर जिल्ह्यात, जिल्ह्याच्या बाहेर जावं लागलं, तर राज्यात आणि मला वाटत नाही की आपल्या गरजांसाठी यापुढे आपल्याला जावं लागेल. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला किती मोठं बळ मिळेल. लघु उद्योजकांना किती बळ मिळेल, आपल्या पारंपरिक गोष्टींना किती महत्व मिळेल.

बंधू भगिनींनो, आपल्याला मोबाईल फोन आवडतो. व्हाट्सअप संदेश पाठवायला आवडतं, आपल्या फेसबुक ट्विटरही आवडतं, मग या माध्यमातून सुद्धा आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतो. तज्ज्ञांना जेवढा तंत्रज्ञानाचा उपयोग होतो, आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीही तंत्रज्ञानाचा उपयोग होतो आणि सामान्य नागरिकांनाही आपण डिजिटल पेमेंटच्या दिशेने का जाऊ नये? आज आम्हाला गर्व आहे की आमचं रुपे कार्ड सिंगापूरमधे चालत आहे. आपलं रुपे कार्ड येणाऱ्या काळात आणखी देशातही चालणार आहे. आपलं हे डिजिटल व्यासपीठ मोठ्या मजबूतीनं उभं रहात आहे. मात्र आपल्या गावातील छोट्या छोट्या दुकानांमधे शहरातल्या छोट्या छोट्या मॉलमधे सुद्धा आपण डिजिटल पेमेंटवर का जोर देऊ नये? या प्रामाणिकपणासाठी, पारदर्शकतेसाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आपण डिजिटल पेमेंटवर जोर देऊया. मी तर व्यापाऱ्यांना म्हणू इच्छितो की तुमच्या दुकानावर फलक असतो, ‘आज नकद, कल उधार’ मला तर वाटतं आता असा फलक लावायला हवा, ‘डिजिटल पेमेंटको हा......., नकद को ना......’. वातावरणनिर्मिती करायला हवी. मी बँकिंग क्षेत्राला आवाहन करतो, मी व्यापारी वर्गाला आवाहन करतो. या आपण सर्व या गोष्टींवर भर देऊया.

आपल्या देशात मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्ग वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. वर्षातून एक-दोनदा कुटुंबासोबत, मुलांसोबत जगाच्या विविध देशात पर्यटक म्हणून जात असतात, मुलांना बाहेरचं जग बघायला मिळतं. चांगली गोष्ट आहे. देशासाठी कित्येक महापुरुषांनी बलिदान दिलं आहे. आपलं आयुष्य वेचलं आहे, जेव्हा देश 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल, तेव्हा मी सर्व कुटुंबांना आवाहन करु इच्छितो, की तुम्ही तुमच्या मुलांना आपल्या देशाविषयी माहिती द्यावी. कोणत्या आईवडीलांना वाटणार नाही की आपली पुढची पिढी भावनिकरित्या या मातीशी जोडली जावी, तिच्या इतिहासाशी जोडली जावी, तिथल्या हवेतून पाण्यातून नवी ऊर्जा प्राप्त करावी, जाणीवपूर्वक आपण हा प्रयत्न केला पाहिजे. आपण कितीही प्रगती केली तरी मुलांशी आपली मुळं घट्ट धरुन ठेवली पाहिजेत, तरच आपली प्रगती होऊ शकते. आणि म्हणूनच जगात जे पर्यटक म्हणून जातात, त्यांच्याकडे मी एक गोष्ट मागू इच्छितो, लाल किल्ल्यावरुन देशातील युवांच्या रोजगारासाठी, जगात भारताची ओळख बनवण्यासाठी, भारताचे सामर्थ्य दाखवून देण्यासाठी, माझ्या प्रिय देश बांधवांनो मी आज एक छोटी गोष्ट आपल्याकडे मागू इच्छितो – 2022 म्हणजेच 75 व्या स्वातंत्र्य दिनापर्यंत तुम्ही आपल्या कुटुंबासोबत भारताच्या कमीत कमी 15 पर्यटन स्थळ फिरुन याल. तिथे चांगले हॉटेल नसेल, तरी जाल, कधी कधी कठिण प्रसंग पण आयुष्य जगताना उपयोगी पडतात. आपण मुलांमधे हे रुजवू या की हाच आपला देश आहे. एकदा की तिथे जायला सुरुवात केली तर तिथे सुविधांचा विकास करण्यासाठीही लोक येऊ लागतील. देशात 100 उत्कृष्ट पर्यटक स्थळ तर राज्यात 2 किंवा 5 किंवा 7 अतिउत्कृष्ट पर्यटक स्थळं विकसित करण्याचे लक्ष्य आपण निर्धारित करुया. आपल्या ईशान्य भारतात खूप नैसर्गिक समृद्धी आहे. मात्र किती विद्यापीठ ईशान्य भारताला आपले पर्यटन स्थळ ठरवतात? तुम्हाला फक्त 7 ते 10 दिवस राखून ठेवावे लागतील.

तुम्हाला दिसेल, तुम्ही जिथे जाल, तिथे नवं जग निर्माण कराल, नवे बीज रोवाल आणि तुम्हालाही जीवनात समाधान वाटेल. हिंदुस्थानातील लोक जायला लागले तर जागतिक लोकही तिथे यायला लागतील. आपण जगात फिरायला जाऊ आणि विचारु की तुम्ही हे ठिकाण पाहिलात का? कुणी पर्यटक आपल्याला विचारेल की तुम्ही भारतातून आला आहात का? तुम्ही तामिळनाडूचे ते मंदिर पाहिली आहे का? आणि तुम्हीच जर त्या ठिकाणी गेलेला नसाल तर ती व्यक्ती तुम्हाला म्हणेल की कमाल आहे दादा, मी तर तुमच्या देशातील तामिळनाडू मंदिर पहायला गेलो होतो आणि तुम्ही इथे भेट द्यायला आलात. आपण आपला देश बघितल्यावर जग फिरलं पाहिजे.

मी माझ्या शेतकरी बंधूंना, आवाहन करु इच्छितो. त्यांच्याकडे काही मागू इच्छितो, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या देशबांधवांसाठी ही धरणी आता आहे. ‘भारत माता की जय’चा घोष करताच आपल्यामधे उर्जेचा संचार होतो. वंदे मातरम्‌ बोलताच या भूमातेसाठी काही तरी करण्याची प्रेरणा मिळते. एक दीर्घकाळात इतिहास आमच्या समोर येतो. पण आपण या धरणी मातेच्या आरोग्याच्या कधी काळजी केली आहे का? आपण ज्या पद्धतीने रसायने, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा उपयोग करत आहोत, त्यानुसार आपण आपल्या या भूमातेची हाती करत आहोत. या मातेचे लेकरु म्हणून एक शेतकरी म्हणून मला माझ्या या मातेचे नुकसान करण्याचा काहीही अधिकार नाही. माझ्या भूमातेला दु:ख देण्याचा अधिकार नाही. माझ्या भूमातेला आजारी करण्याचा अधिकार नाही. चला, स्वातंत्र्यांची 75 वर्ष होत आहे. पूज्य बापूजींनी आपल्याला मार्ग दाखवला आहे. आपण आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर 10 टक्के, 20 टक्के, 25 टक्क्यांनी कमी करुया, जमलं तर रासायनिक खते मुक्त अभियानही सुरु करुया. तुम्ही बघाल देशाची खूप मोठी सेवा होईल. आपल्या भूमातेचे रक्षण करण्यात तुमचे खुप मोठे योगदान राहील. वंदे मातरम्‌ म्हणत जे फासावर लटकले, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी या भूमातेचं रक्षण करण्याच्या तुमच्या कार्याला, त्यांचेही आर्शिवाद मिळतील. म्हणूनच मी तुम्हाला आवाहन करतो आणि मला विश्वास आहे माझे शेतकरी बांधव हे करु शकतील.

माझ्या बंधू भगिनींनो,

आज संपूर्ण जगात आपल्या उद्योजकांचे नाव आहे, त्यांच्या सामर्थ्याची चर्चा आहे. मग ते अंतराळ क्षेत्र असो, तंत्रज्ञान असो, आपण नवी प्रगती साध्य केली आहे. आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जिथे आतापर्यंत कोणी गेले नाही, त्या दिशेने आपलं चंद्रयान जलद गतीनं मार्गक्रमण करत आहे. आपल्या वैज्ञानिकांचे हे मोठं यश आहे. आज जागतिक क्रीडा क्षेत्रात माझ्या देशातले युवा खेळाडू भारताचा तिरंगा फडकवत आहे, किती अभिमान वाटतो, देशाचे खेळाडू देशाचा नावलौकिक वाढवत आहेत.

माझ्या देश बांधवांनो, आपल्या देशाला पुढे न्यायच आहे, देशात बदल घडवायचा आहे, नवी उंची गाठायची आहे आणि हे सगळं एकत्रितपणे करायचं आहे. सरकार आणि जनतेनं मिळून करायचं आहे. 130 कोटी देशबांधवांनी करायचं आहे. देशाचा पंतप्रधानही तुमच्याप्रमाणेच देशाचा पुत्र आहे, या देशाचा एक नागरीक आहे. आपल्याला सर्वांना एकत्रपणे हे काम करायचं आहे.

येत्या काही दिवसात दीड लाख वेलनेस सेंटर बनवायची आहेत.  आरोग्य केंद्रे बनवायला लागतील. दर तीन   लोकसभा जागांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय काढून नवयुवकांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.  दोन कोटीहून अधिक गरीब लोकांसाठी घरे बनवायचे आहेत. 15 कोटी ग्रामीण घरांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचवायचे आहे, सव्वा लाख किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बनवायचे आहेत, प्रत्येक गावाला ब्रॉडबँड कनेक्शन, ऑप्टिकल फायबर नेटवर्कनी  जोडायचे आहे. पन्नास हजाराहून अधिक स्टार्टअप  चे जाळे विणायचे आहे आपल्या स्वप्नांना घेऊन पुढे जायचे आहे म्हणून बंधू-भगिनींनो ! आपण देशवासीयांनी मिळून स्वप्नांना घेऊन देशाला पुढे घेऊन जायचे आहे आणि स्वातंत्र्याची 75 वर्षे ही त्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे

मी जाणतो की लाल किल्ल्यालाही वेळेचे  एक बंधन आहे.  130 कोटी देशवासीयांची स्वप्ने आहेत, त्यांच्या स्वतःच्या समस्याही आहेत प्रत्येक स्वप्न प्रत्येक आव्हानाचे आपले महत्त्व आहे कोणी कमी महत्त्वपूर्ण तर कोणी जास्त महत्त्वपूर्ण असे नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत प्रत्येक विषयावर सविस्तरपणे बोलणे शक्य होणार नाही त्यामुळे प्रत्येक मुद्द्याचे आपले महत्त्व असूनही ज्या गोष्टी सांगू शकलो नाही त्या ही महत्त्वपूर्ण आहेत ह्या सर्व बाबींना घेऊन आपण पुढे चालायचे आहे देशाला प्रगतीपथावर नेण्याचे आहे.

स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे, महात्मा गांधींच्या जयंतीचे 150 वे वर्ष आणि भारताच्या संविधानाला 70 वर्षे झाली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आणि आणखी एका दृष्टीने हे वर्ष महत्वाचे आहे. गुरुनानक देव यांचे 550 वे जयंती वर्ष आहे. चला, बाबासाहेब आंबेडकर, गुरु नानक देव यांची शिकवण मनात धरून आपण सगळे प्रगती करुया आणि एका उत्तम समाजाची निर्मिती, उत्तम देशाची निर्मिती करू. जागतिक आशा आकांक्षा आणि अपेक्षांच्या अनुरूप अशा भारताची निर्मिती आपल्याला करायची आहे.

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला कल्पना आहे की आमचे ध्येय हिमालयाइतके उंच आहे, आमची स्वप्ने असंख्य तारकांपेक्षाही जास्त आहेत. मात्र आम्हाला हे ही माहित आहे की आमच्या निश्चयाच्या, आकांक्षांच्या झेपेपुढे गगन ठेंगणे आहे. आमचा हा संकल्प आहे, हे सामर्थ्य हिंद महासागराइतके अथांग आहे, आमचे प्रयत्न गंगेच्या प्रवाहाइतके पवित्र आहेत, निरंतर आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आमच्या मूल्यांच्या मागे हजारो वर्ष जुनी संस्कृती, ऋषी-मुनींची तपस्या, देशबांधवांचा त्याग आणि कठोर परिश्रम आहे आणि तीच आमची प्रेरणा आहे.

चला, आपल्या याच विचारांसह, हेच आदर्श घेऊन, याचा संकल्पासह सिद्धी मिळवण्याचे ध्येय घेऊन आपण वाटचाल करू, नवा भारत निर्माण करण्यासाठी. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, नवा आत्मविश्वास, नवा संकल्प या गोष्टी नवा भारत घडवण्याची  वनौषधी आहे. चला, आपण सगळे मिळून देशाला प्रगतीपथावर नेऊया. याच अपेक्षेने, मी पुन्हा एकदा देशासाठी जगणाऱ्या, देशासाठी लढणाऱ्या, देशासाठी प्राण देणाऱ्या, देशासाठी काहितरी करणाऱ्या प्रत्येकाला वंदन करत माझ्यासोबत म्हणा-

जय हिन्‍द

जय हिन्‍द

भारत माता की जय,

भारत माता की जय,

वन्‍दे मातरम ।

वन्‍दे मातरम ।

खूप खूप  धन्‍यवाद ।

 

 

 

BG/SB/SM/SK/RA/ST/MC/PK/DR

 


(Release ID: 1582095) Visitor Counter : 1226


Read this release in: English , English