कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

मुंबईत भारतीय कौशल्य संस्था उभारण्यात येणार-केंद्रीय कौशल्यविकास मंत्री

Posted On: 14 AUG 2019 5:15PM by PIB Mumbai

 

मुंबई, 14 ऑगस्ट 2019

 

भारतात जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण संस्था उभारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय यांनी म्हटले आहे. मुंबईत आज राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबवला जाणार असून भारतीय कौशल्य संस्थेचे बांधकाम टाटा एज्युकेशनल ॲण्ड डेव्हलपमेंट ट्रस्ट करणार आहे असे ते म्हणाले. टाटा समूह सुमारे 300 कोटी रुपये गुंतवणार असून सरकार या प्रकल्पासाठी 4-5 एकर जमीन देणार आहे. सप्टेंबर 2019 मध्ये या संस्थेची पायाभरणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 10 हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची या संस्थेची क्षमता असेल. पारंपरिक क्षेत्राबरोबरच सुरक्षा, अंतराळ, पोलाद आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातही ही संस्था कौशल्य प्रशिक्षण पुरवणार आहे. भविष्यात अहमदाबाद आणि कानपूर येथेही अशा प्रकारच्या संस्था उभारल्या जाणार आहेत. मुंबईतल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पांडे यांनी केली.

कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे देशातल्या कौशल्य विकास चळवळीला चालना मिळाली असून त्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे असे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

पांडे यांनी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेला भेट दिली आणि तिथल्या प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला. तसेच या संस्थेच्या आवारातील प्रस्तावित कौशल्य संस्थेच्या जागेला ही भेट दिली.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor


(Release ID: 1581981) Visitor Counter : 153
Read this release in: English