गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे उद्‌घाटन -जानेवारी 2020 मध्ये सर्वेक्षण सुरू होणार

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2019 2:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2019

 

केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत स्वच्छ सर्वेक्षण 2020चे उद्‌घाटन झाले. या मंत्रालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्ष आहे. या उद्‌घाटनासोबतच पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020-साधने, स्वच्छ भारत अभियान वॉटर प्लस प्रोटोकॉल आणि टूल किट, ‘स्वच्छ नगर’ या घनकचरा व्यवस्थापन ॲपचे उद्‌घाटनही केले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण संकल्पनेविषयीचे एक गीतही प्रसारीत करण्यात आले.

यावेळी बोलताना हरदीपसिंग पुरी म्हणाले की, याआधी स्वच्छ सर्वेक्षण करताना देशभरातल्या शहरांमधल्या स्वच्छताविषयक उपक्रमांचे मूल्यमापन केले जात होते. आता 2020 च्या सर्वेक्षणाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात होणार आहे, ही स्वच्छता मोहिम म्हणजे स्वच्छ, कचरामुक्त आणि निरोगी नव्या भारताच्या निर्मितीसाठी आपल्याला मिळालेली आणखी एक संधी तर आहेच त्याशिवाय स्वच्छतेची सवय जनमानसात रुजवण्यासाठी एक आराखडाही यातून मिळणार आहे. यावेळी उद्‌घाटन करण्यात आलेल्या टूल किटमुळे सर्वेक्षणाची पद्धत आणि त्याच्या निकषांविषयीची माहिती दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाला मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

 

S.Tupe/R.Aghor/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1581833) आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English