युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

समाजसेवा आणि विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कारानं सन्मान

Posted On: 12 AUG 2019 3:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2019

 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवतींचा क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात आरोग्य, मानवाधिकारांचे संरक्षण आणि प्रोत्साहन, सजग नागरिकत्व आणि समुदाय सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या 15 ते 29 वर्ष या वयोगटातल्या युवकांचा समावेश होता.

राष्ट्रीय विकास आणि समाजसेवेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या कामाची दखल घेतली जावी या हेतूने हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांमुळे युवकांमध्ये समाजाविषयीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होते. ज्यातून उत्तम नागरिक घडण्यास मदत होईल.

या कार्यक्रमादरम्यान किरेन रिजीजू यांनी ‘भारतीय युवकांच्या नजरेतून चीन-2019’ या विषयावरच्या छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्‌घाटन केले. चीनमध्ये अलिकडेच गेलेल्या भारतीय युवकांच्या प्रतिनिधी मंडळाने हे छायाचित्रे काढले आहेत.

वर्ष 2016-17 साठीचे राष्ट्रीय युवा पुरस्कार 20 व्यक्ती आणि तीन संस्थांना देण्यात आले. त्यात महाराष्ट्रातल्या विनीत मालपूरे, ओमकार नवलीहलकर या दोन युवकांचा समावेश आहे. तर चंद्रपूरच्या इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेचीही पुरस्कारासाठी निवड झाली. वैयक्तीक पुरस्कारात पदक, प्रमाणपत्र आणि 50 हजार रुपये रक्कम असा समावेश आहे. तर संस्थेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप पदक, प्रमाणपत्र आणि दोन लाख रुपये रक्कम असा आहे.

 

S.Tupe/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1581824) Visitor Counter : 120


Read this release in: English