माहिती आणि प्रसारण मंत्रालय

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

गुजराती चित्रपट ‘हेलारो’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

‘भोंगा’ ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार

मराठी चित्रपट ‘पाणी’ ला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

Posted On: 09 AUG 2019 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2019

 

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. चित्रपट निवड समितीने आज नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.

‘हेलारो’  या गुजराती चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तर ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘बधाई हो’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. हिंदी चित्रपट ‘पॅड मॅन’ ला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले. ‘अंधाधुन’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला.  ‘ओंदला एर्दला’ या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गीस दत्त पुरस्कार जाहीर झाला. ‘पाणी’ या मराठी चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्यात आले तसेच ‘नाळ’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरवण्यात आले. ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. ‘आई शप्पथ’ साठी दिग्दर्शक गौतम वझे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘ आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना ‘अंधाधुन’ आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातल्या भूमिकांबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा संयुक्त पुरस्कार जाहीर झाला. तेलगू चित्रपट ‘महानती’ मधील भूमिकेसाठी किर्ती सुरेश या अभिनेत्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला तर ‘उरी’ या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1581701) Visitor Counter : 241


Read this release in: English