आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
सरकारने वैभववाडी- कोल्हापूर (आताचे श्री छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस) यांच्या दरम्यान नवीन लाईन (108 किलोमीटर लांबीच्या)च्या कामाला दिली मान्यता
या प्रकल्पामुळे पश्चिम भागातल्या बंदरांसाठी लहान मार्ग बनवणे शक्य, तसेच बेळगाव, बेल्लारी, गुलबर्गा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, बीड आणि सोलापूरला लाभ होईल, अशी आशा
या प्रकल्पासाठी अंदाजे 3,439 कोटी रूपये एकूण खर्च अपेक्षित आणि ही योजना 2023-24 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा
Posted On:
05 AUG 2019 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2019
रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या वैभववाडी- कोल्हापूर (आताचे श्री छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस) यांच्या दरम्यान नवीन लाईन (108 किलोमीटर लांबीच्या)च्या कामाला सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी अंदाजे 3,439 कोटी रूपये एकूण खर्च अपेक्षित आणि ही योजना 2023- 24 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
वैभववाडी ते कोल्हापूर (आताचे श्री छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस) पर्यंतची ही प्रस्तावित लाइन महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाणार आहे. ही प्रस्तावित लाईन मध्य रेल्वेच्या विद्यमान पुणे, कोल्हापूर विभागातल्या कोल्हापूर (आताचे श्री छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस) रेल्वे स्थानकाला कोंकण रेल्वेच्या विद्यमान रोहा-मडगाव विभागामधल्या वैभववाडी रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित लाईनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक विद्युत संयंत्रांना कोळसा पुरवठा करण्यासाठी ज्या मार्गाने वाहतूक करावी लागते, ते अंतर कमी होवू शकणार आहे.
वैभववाडी ते कोल्हापूर (आताचे श्री छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस) पर्यंतच्या या प्रस्तावित लाइनमुळे बेळगाव, विजापूर, बेल्लारी, गुलबर्गा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांना लाभ होईल, अशी आशा आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातल्या बंदरांसाठी लहान मार्ग बनवणे शक्य होणार आहे. सध्या मध्य आणि कोंकण क्षेत्रामध्ये रेल्वेच्या माध्यमातून संपर्क व्यवस्थेचा अभाव आहे. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या विद्युत प्रकल्पांना साधन सामुग्री पोहोचवण्यासाठी जास्त अंतर कापावे लागते, ते या प्रकल्पामुळे कमी होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या बंदरावर करण्यात येणारी मालाची ने-आण अधिक सुकर ठरणार आहे. मुंबई, जेएनपीटी, कृष्णापटणम् आणि न्यू मेंगलोर इथून येणाऱ्या मालाच्या वाहतुकीपुढे अनेक समस्या होत्या. याचे कारण म्हणजे रत्नागिरी-पनवेल-पुणे हा रेल मार्ग तुलनेने जास्त लांबीचा, अंतराचा आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या विशिष्ट भागामध्ये कोल्हापूर ‘क्लस्टर’ ही खूप मोठी उलाढाल होणारी औद्योगिक वसाहत आहे. यामध्ये निर्मिती, उत्पादन, स्वयंचलित वाहनांना लागणारे सुटे भाग आणि पूरक यंत्रसामुग्री, साखर निर्मिती, वस्त्र, खाद्यतेलावर प्रक्रिया करणे, असे अनेक उद्योग आहेत. याचबरोबर आजूबाजूच्या पश्चिम क्षेत्रामध्ये नजीकच्या भविष्यात औद्योगिक विकास वेगाने होत आहे. यामध्ये जयगड, विजयदुर्ग याभागात जागतिक पातळीवरच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्यास इथल्या औद्योगिक क्षेत्राला त्याचा चांगला लाभ होईल. वैभववाडी ते कोल्हापूर (आताचे श्री छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस) पर्यंतच्या या रेल लाईनमुळे विजयदुर्ग बंदर, गुलबर्गा, आदिलाबाद आणि जवळपासच्या औद्योगिक वसाहतींना पश्चिमी किनारा जवळ होईल आणि त्याचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
इतकेच नाही तर, या नवीन रेलमार्गामुळे सध्याच्या वैभववाडी-रोहा-पुणे मार्गावर आणि मिरज-पुणे-पनवेल-पेण मार्गावर धावणाऱ्या मालगाड्यांच्या अंतरामध्येही मोठी घट होवू शकणार आहे.
या प्रकल्पाच्या निर्माण कार्याच्या काळामध्ये जवळपास 26 लाख कार्यदिवस प्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, असा अंदाज आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
(Release ID: 1581519)
Visitor Counter : 160