मंत्रिमंडळ

रशियात मॉस्को येथे इस्रोचे तंत्रज्ञान संवाद केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 31 JUL 2019 4:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2019

 

रशियात मॉस्को येथे इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे संवाद केंद्र सुरु करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या केंद्रासाठी दरवर्षी दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संवाद केंद्रामुळे इस्रोच्या विविध कार्यक्रमांच्या वेळी रशिया तसेच रशियाच्या आसपासच्या देशांशी तंत्रज्ञानाच्या आधारे उत्तम संवाद साधता येईल. या केंद्रात असलेला संवाद अधिकारी इस्रोनेच नियुक्त केलेला असेल तसेच त्याला इस्रोकडून सर्व संशोधनाची तंत्रज्ञानविषयक माहिती दिली जाईल. हा संवाद अधिकारी विविध देशातले संशोधक, सरकारी संस्था आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय साधेल तसेच या केंद्रांमुळे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातल्या द्विपक्षीय कार्यक्रमात सहकार्य वाढवणे शक्य होईल. हा विभाग इस्रोच्या वतीने विविध देशांशी संवाद साधेल.

लाभ:-

या केंद्रामुळे इस्रोला रशिया आणि आसपासच्या देशातल्या अवकाश संस्था तसेच उद्योगांशी समन्वय साधून एकत्र मोहिमा आखणे शक्य होईल.

इस्रोच्या आगामी गगनयान मोहिमेसाठी काही महत्वाच्या तंत्रज्ञानाची आणि सुविधांची भारताला गरज आहे. या विभागामुळे अवकाश क्षेत्रातल्या परदेशी संस्थांकडून ही मदत भारताला मिळू शकेल. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे गगनयान हे पहिले मानव असलेले यान अवकाशात झेपावणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी भारताला रशियाची मदत घेणे सोपे जावे या दृष्टीने या विभागाची नियुक्ती करण्यात आली आहे.  

अंमलबजावणी विषयक धोरण :-

या संवाद केंद्रात असलेल्या अधिकाऱ्याची निवड इस्रोचे शास्त्रज्ञ करतील. या पदाला मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ही नियुक्ती होणे अपेक्षित आहे.

परिणाम:-

अशा संवाद केंद्रातल्या अधिकाऱ्यांमार्फत संबंधित देशांमधले संशोधक, सरकारी संस्था आणि उद्योग क्षेत्राशी संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेळोवेळी होणाऱ्या घडामोडींची अद्ययावत माहिती घेता येते तसेच इस्रोच्या विविध देशांसोबत होणाऱ्या द्विपक्षीय मोहिमांमध्येही या विभागांचे सहकार्य मिळू शकते.  इस्रोची अमेरिकेत वॉशिंग्टन तर फ्रान्समधे पॅरिस येथेही अशी संवाद केंद्रे आहेत.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1580872) Visitor Counter : 276


Read this release in: English