पंतप्रधान कार्यालय
व्याघ्र गणना अहवाल 2018 च्या प्रकाशनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
29 JUL 2019 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2019
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री प्रकाश जावडेकर, श्रीयुत बाबुल सु्प्रियो, येथे उपस्थित इतर सर्व मान्यवर, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक व्याघ्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
या वर्षीच्या जागतिक व्याघ्र दिनाचे विशेष महत्त्व आहे कारण भारताने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी मी तुम्हा सर्वांना, जगभरातील वन्यजीव प्रेमींना, या मोहिमेशी संबंधित असलेला प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी आणि विशेषतः वन क्षेत्रात राहणाऱ्या आपल्या आदिवासी बंधू भगिनींना अगदी मनापासून शुभेच्छा देत आहे.
मित्रांनो, आज जागतिक व्याघ्र दिन आहे. वाघाचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करत आहोत. व्याघ्र गणनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालातील निष्कर्ष प्रत्येक भारतीयाच्या मनात, प्रत्येक निसर्गप्रेमीच्या मनात आनंदाची भावना निर्माण करेल. नऊ वर्षांपूर्वी सेंट पीटर्सबर्ग येथे असे ठरवण्यात आले की वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी 2022 हे वर्ष निर्धारित करावे. आपण भारतात हे लक्ष्य चार वर्षे आधीच गाठले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व संबंधितांनी ज्या गतीने आणि निष्ठेने काम केले ते खरोखरच उल्लेखनीय आहे. “संकल्प से सिद्धि” चे हे सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक आहे. एकदा भारतीय जनतेने काही करायचे ठरवले की त्यांना अपेक्षित यश मिळवण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकत नाही.
मित्रांनो, 14-15 वर्षांपूर्वी जेव्हा ही आकडेवारी जाहीर झाली होती ज्यात केवळ 1400 वाघ शिल्लक असल्याचे म्हटले होते, त्यावेळी मला आठवते की हा अतिशय वादाचा विषय बनला होता, चिंतेचे कारण बनला होता. टायगर प्रोजेक्टशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक मोठे आव्हान होते. वाघासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करण्यापासून मानवी लोकसंख्येशी त्यांचे संतुलन साधण्यापर्यंत एक अतिशय कठीण कार्य त्यांच्यासमोर होते. पण ज्या संवेदनशीलतेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या मोहिमेला ज्या प्रकारे चालना देण्यात आली ते खरोखरच प्रशंसनीय आहे.
आज आम्ही हे अभिमानाने सांगू शकतो की भारत सुमारे तीन हजार वाघांसह जगातील सर्वात मोठे आणि सर्वात सुरक्षित अधिवासांपैकी एक बनला आहे. जगातील वाघांच्या संख्येपैकी तीन चतुर्थांश संख्येचा अधिवास आमच्या भारतात आहे.
येथे उपस्थित तुमच्यापैकी अनेकांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की वन्यजीवांचे पर्यावरण समृद्ध करण्याची ही मोहीम केवळ वाघांपर्यंत मर्यादित नाही. गुजरातच्या गीरच्या जंगलात सापडणारे आशियायी सिंह आणि हिम बिबट्यांच्या संरक्षणाच्या योजनेवर देखील अतिशय झपाट्याने काम होत आहे. खरेतर गीरमध्ये जे काम पहिल्यापासून सुरू आहे, त्याचे सुखद परिणाम आता अगदी स्पष्ट दिसू लागले आहेत. तेथील सिंहाच्या संख्येत सुमारे 27 टक्के वाढ झाली आहे. भारताच्या सर्वोत्तम कार्यपद्धतीचा लाभ व्याघ्र परिमंडळातल्या दुसऱ्या मित्र देशांनाही मिळू लागला आहे.
आज राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने चीन, रशिया सह पाच देशांशी करार करण्यात आला आहे आणि लवकरच इतर देशांशी देखील करार करण्याचे निश्चित केले आहे. ग्वाटेमाला देखील त्यांच्याकडे जग्वार संवर्धनासाठी देखील आपल्याकडून तांत्रिक मदत घेत आहे. ही बाब देखील अतिशय रोचक आहे की वाघ हा केवळ भारतासाठीच नाही तर इतर अनेक देशांमध्येही श्रद्धेचे प्रतीक आहे. भारताव्यतिरिक्त मलेशिया आणि बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी सुद्धा वाघ आहे. चिनी संस्कृतीमध्ये तर व्याघ्र वर्ष साजरे करण्यात येते. म्हणजे एका प्रकारे पाहिले तर वाघाशी संबंधित काही ना काही उपक्रम अनेक देशांमध्ये, तिथल्या लोकांवर अनेक प्रकारे प्रभाव टाकत आहेत.
मित्रांनो,
चांगल्या पर्यावरणाशिवाय मानवी सक्षमीकरण अपूर्ण आहे आणि म्हणूनच यापुढील मार्ग निवडकपणाचा नसून एकत्रितपणाचा आहे. पर्यावरण संवर्धनाकडे आपण एक व्यापक आणि समग्र दृष्टिकोनाने पाहिले पाहिजे.
अनेक वनस्पती आणि प्राणी आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मग त्यांच्यासाठी आपण काय केले पाहिजे. एकतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा मानवी कृतीद्वारे त्यांना नवजीवन दिले पाहिजे जेणेकरून आपल्या या ग्रहाला ते सौंदर्य आणि विविधता प्रदान करतील. त्याचबरोबर आपल्याकडे बऱ्याच काळापासून एक वाद सुरू आहे..... विकास की पर्यावरण आणि दोन्ही बाजू आपापले दृष्टिकोन मांडत असतात जणू काही ते स्वतःच पूरक आणि समावेशक आहेत.
पण आपल्याला या सह-अस्तित्वाला देखील स्वीकारले पाहिजे आणि सह-यात्रेचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. विकास आणि पर्यावरण यांचे संतुलन साधणे शक्य आहे, असे मला वाटते आणि आपला देश तर असा आहे जिथे आपल्याला हजारो वर्षांपासून सह-अस्तित्वाची शिकवण देण्यात आली. आपल्या पूर्वजांनी देवाची जी कल्पना केली होती आणि त्यात सह-अस्तित्वाचे उदाहरण त्यात जाणवते, हा श्रावण महिना आहे, सोमवार आहे, भगवान शंकराच्या गळ्यात साप आहे आणि त्याच कुटुंबातील गणरायाचे वाहन उंदीर आहे. साप हा उंदराचा भक्षक आहे, पण भगवान शंकर आपल्या कुटुंबात सह-अस्तित्वाचा संदेश देतात. आपल्याकडे कोणत्याही परमात्म्याची कल्पना पशु, पक्षी, झाड यांच्याशिवाय करण्यात आलेली नाही. त्यांच्याशी त्यांचा संबंध जोडण्यात आला आहे.
आपल्या धोरणांमध्ये, आपल्या अर्थकारणामध्ये आपल्याला संवर्धनाबाबतची चर्चा बदलली पाहिजे. आपल्याला हुषार आणि संवेदनशील असे दोन्ही असले पाहिजे आणि पर्यावरणीय शाश्वती आणि आर्थिक विकास यांचे निकोप संतुलन साधले पाहिजे.
भारताची आर्थिक आणि पर्यावरणीय या दोन्ही क्षेत्रात भरभराट होणार आहे. भारत आणखी जास्त रस्ते बांधणार आहे आणि भारतात स्वच्छ नद्या देखील असणार आहेत. भारतात रेल्वेचे चांगल्या प्रकारचे जाळे असेल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वृक्षांचे आच्छादन असेल. आपल्या नागरिकांसाठी भारत आणखी घरे बांधेल आणि त्याच वेळी प्राण्यांसाठी दर्जेदार अधिवास निर्माण करेल.
भारताची एक सचेतन सागरी अर्थव्यवस्था असेल आणि एक निकोप सागरी परिसंस्था असेल. हे संतुलन भक्कम आणि समावेशक भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देईल.
मित्रांनो, गेल्या पाच वर्षात जिथे देशात अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी झपाट्याने काम झाले आहे त्याच वेळी देशात वन आच्छादन देखील वाढू लागले आहे. याशिवाय देशातील संरक्षित क्षेत्रांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 2014 मध्ये देशातील संरक्षित क्षेत्रांची संख्या 692 होती जी आता 2019 मध्ये 860 पेक्षा जास्त झाली आहे. त्याचबरोबर सामुदायिक अधिवासांची संख्या देखील 2014 मधील 43 वरून वाढून आता जवळ जवळ 100च्या पुढे गेली आहे.
वाघांची वाढलेली संख्या, संरक्षित क्षेत्रांची वाढलेली संख्या ही केवळ एक आकडेवारी नाही. याचा खूप मोठा परिणाम पर्यटन आणि रोजगारांच्या साधनावरही होत असतो. मी कुठेतरी असे वाचले होते की रणथंबोर मध्ये जी सुप्रसिद्ध टायग्रेस मासळी आहे, केवळ ती पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो पर्यटक तळ ठोकून असायचे. म्हणूनच वाघांच्या संरक्षणाबरोबरच पर्यावरणपूरक शाश्वत निसर्ग-पर्यटन पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर देखील भर दिला जात आहे.
मित्रांनो, पर्यावरण रक्षणासाठी भारताने उचललेल्या अनेक पावलांमुळे आपल्याला हवामानविषयक उपाययोजना करणारा जागतिक पातळीवरचा आघाडीचा देश बनवले आहे. सन 2020 पूर्वीच सकल देशांतर्गत उत्पादनाच्या प्रमाणात उत्सर्जन तीव्रतेचे जे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे ती भारताने आधीच साध्य केली आहेत. भारत आज जगातील त्या अव्वल देशांपैकी एक आहे जे देश आपल्या अर्थव्यवस्थेला स्वच्छ इंधनावर आधारित आणि अपारंपरिक उर्जा आधारित बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. टाकाऊ घटक आणि जैव-अवशेष यांना आपल्या उर्जा सुरक्षेचा एक व्यापक भाग आपण बनवत आहोत.
त्याशिवाय सध्या विजेवर चालणाऱ्या वाहनांवर जो भर दिला जात आहे, जैवइंधनांवर जे काम होत आहे, स्मार्ट सिटीवर काम होत आहे, त्यांचा देखील पर्यावरण रक्षणाशी संबंध आहे. अपारंपरिक उर्जा क्षेत्रात तर आपण अतिशय वेगाने आपल्या लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करत आहोत. 2022 पर्यंत आपण 175 गिगावॅट अपारंपरिक उर्जानिर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले आहे ते साध्य करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करत आहोत.
त्याच वेळी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे आयएसए च्या माध्यमातून आपण जगातील अनेक देशांना सौर उर्जेद्वारे जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहोत. आता आपले लक्ष्य असले पाहिजेः एक जग, एक सूर्य, एक ग्रिड
उज्वला आणि उजाला सारख्या योजना देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन तर सुकर बनवत आहेतच, पण त्याने पर्यावरणाची देखील सेवा होत आहे. देशाच्या प्रत्येक कुटुंबाला एलपीजी कनेक्शन देण्यामुळेच आपण खूप मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि त्यांची हानी वाचवण्यामध्ये यशस्वी होत आहोत. देशातील प्रत्येक घरात, प्रत्येक इमारतीत, प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्लीत एलईडी बल्ब बसवण्याची जी मोहीम सुरू आहे, त्याने विजेची तर बचत होत आहेच, त्याबरोबरच कार्बनच्या निर्मितीमध्ये कपात होऊ लागली आहे. तसंच मध्यमवर्गीयांच्या घरातील वीजेच्या बिलांचा खर्चही कमी होऊ लागला आहे. त्यांना आर्थिक दृष्ट्या फायदा होऊ लागला आहे.
मित्रांनो, आज भारताची ओळख जगातील त्या देशांपैकी एक बनली आहे जे आपल्या आणि जगाच्या हितासाठी जो काही संकल्प करतात ते संकल्प वेळेत पूर्ण करतात.दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात देखील भारत जगात आघाडीवर राहणार आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या प्रयत्नांमुळे आज भारताची ओळख जगातील त्या देशांपैकी एक बनली आहे जे आपल्या आणि जगाच्या हितासाठी जो काही संकल्प करतात ते संकल्प वेळेत पूर्ण करतात.
वाघांच्या वाढलेल्या संख्येचा आनंद आपण साजरा करत असताना, या अतिशय राजबिंड्या प्राण्याच्या अस्तित्वासमोर सातत्याने कमी होत जाणारे आणि हस्तक्षेप असलेले अधिवास आणि अवैध व्यापार आणि तस्करी यांमुळे गंभीर आव्हाने आहेत. प्राणी संरक्षण आणि संवर्धनासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
आशियामध्ये अवैध व्यापार आणि वन्य प्राणी तस्करीला खंबीरपणे आळा घाला आणि त्यांची मागणी नष्ट करा अशी मी व्याघ्र परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या देशांच्या प्रमुखांना विनंती करत आहे आणि त्यांना जागतिक नेत्यांच्या आघाडीत एकत्र येण्याचे आवाहन करत आहे.
आपण सर्वांनी हरित आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत राष्ट्र निर्माण करण्याची प्रतिज्ञा करूया. या शाश्वतीचे वाघ हे प्रतीक बनवूया.
या क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांना मी हेच सांगेन की एक जी कथा ‘एक था टायगर’ पासून सुरू झाली ती आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचली आहे. ती येथेच थांबून चालणार नाही केवळ टायगर जिंदा है म्हणून काम चालणार नाही आणि कधी काळी चित्रपटातील मंडळी ‘बागो मे बहार है’ असे गाणे गायचे ते गाणे आता बाबुल सुप्रियोजी म्हणतील की ‘बाघो मे बहार है’. व्याघ्र संवर्धनाचे जे प्रयत्न होत आहेत, त्यांचा विस्तार झाला पाहिजे आणि त्यांची गती आणखी जलद झाली पाहिजे.
हीच आशा, याच विश्वासाने पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो
धन्यवाद
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1580821)
Visitor Counter : 156