माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रकाशन विभागाच्या अनेक ई-प्रकल्पांचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
लोकांमध्ये वाचन संस्कृती पुनरुज्जीवित करण्याची गरज: जावडेकर
Posted On:
31 JUL 2019 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2019
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सूचना भवन येथे प्रकाशन विभागाच्या अनेक ई-प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यात प्रकाशन विभागाची नवी वेबसाईट, ‘डिजिटल डीपीडी’ हे ॲप रोजगार समाचारची ई-आवृत्ती आणि सत्याग्रह गीता या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचा समावेश आहे.
यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात वाचनाची सवय लावण्याविषयी जनतेला आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत देशातली बंद पडू पाहणारी वाचन संस्कृती पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. त्यासाठी जवळपास वाचन कट्टे तयार केले जावेत अशी सूचना त्यांनी केली. ‘रोजगार समाचार’ या सरकारच्या रोजगार विषयक मासिकात खाजगी नोकऱ्यांचीही माहिती समाविष्ट केली तर त्याचा तरुणांना जास्त उपयोग होऊ शकेल असा सल्लाही त्यांनी दिला. ‘रोजगार समाचार’ हे सर्व महाविद्यालयांमध्ये पुरवले जावे जेणे करुन शिक्षण घेतानांच विद्यार्थ्यांना व्यवसायातील संधी कळतील आणि त्यानुसार ते आपली कौशल्ये विकसित करतील असेही जावडेकर म्हणाले. प्रकाशन विभागाची नवी वेबसाईट अत्याधुनिक, गतीमान आणि आकर्षक दिसत असून वेबसाईटला लोक वारंवार भेट देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रकाशन विभागाने सुरु केलेल्या नव्या ॲपमुळे ई-बुक आणि किंडलच्या काळात लोकांमध्ये वाचनाच्या सवयी वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच प्रकाशन विभागाची पुस्तकं लोकांपर्यंत सहज पोहचतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. क्षमा राव यांनी लिहिलेल्या, ‘सत्याग्रह गीता’ या पुस्तकाची ई-आवृत्तीही यावेळी प्रकाशित करण्यात आली. राव यांनी महात्मा गांधी यांचे आयुष्य आणि कार्य यांचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक या पुस्तकात लिहिले असून 1930 साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली होती.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1580818)
Visitor Counter : 227