पंतप्रधान कार्यालय

किर्गिझस्थान दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य

Posted On: 14 JUN 2019 11:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2019

 

आदरणीय महोदय,

किर्गिझ प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती आणि माझे मित्र श्री सुरोन्बाय जीन्बेकोव,

सभ्य स्त्री-पुरुष हो,

माझे आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचे मनापासून स्वागत आणि सत्कार केल्याबद्दल मी राष्ट्रपती जीन्बेकोव यांचे आभार मानतो. गेल्या तीस वर्षांतील अभूतपूर्व अशा कामगिरीबद्दल मी किर्गिझस्थानचे अभिनंदन करतो. नैसर्गिक सौंदर्य, सक्षम लोकशाही आणि प्रतिभासंपन्न नागरिकांमुळे या देशाचे भविष्य उज्वल आहे. भारतीय नागरिकांप्रति किर्गिझ नागरिकांच्या मनातील मैत्री आणि प्रेमाची भावना हृदयाला स्पर्श करणारी आहे. माझ्या यापूर्वीच्या प्रवासात आणि यावेळी सुद्धा मला येथे अगदी घरच्यासारखे आपुलकीचे वातावरण अनुभवता आले.

आदरणीय महोदय,

एस सी ओ संमेलनाच्या यशस्वी अध्यक्षतेबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आपल्या अध्यक्षतेखाली क्षेत्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एस सी ओ ने अनेक पावले उचलली आहेत. गेल्या महिन्यात नवी दिल्लीमध्ये माझ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून आपण सोहळ्याची शोभा वाढवली होती, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आज आपल्याबरोबर द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची संधी मला मिळाली, याचा मला मनापासून आनंद वाटतो. भारत आणि किर्गिझ प्रजासत्ताक, या दोन्ही देशांसाठी परस्पर संबंध फारच महत्त्वाचे आहेत.

मित्रहो,

राष्ट्रपती जीन्बेकोव यांच्यासह आज अनेक मुद्यांवर मी व्यापक चर्चा केली. आमच्यातील सहकार्य आणखी वाढण्याच्या अनेक शक्यता असल्याचे आम्हा दोघांना वाटते. आज आम्ही आपसातील द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे आम्हाला आमच्या प्रत्येक सामाईक क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्यात सहाय्य मिळू शकेल.

मित्रहो,

दोन प्राचीन आणि गौरवशाली संस्कृतींच्या रूपात आम्ही परस्परांशी नैसर्गिकपणे जोडले गेलेले आहोत. भारत आणि मध्य आशियादरम्यान अतिशय दृढ असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. भारत आणि प्रजासत्ताक महाकाव्याची भूमी आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर भारतात महाभारत आणि रामचरित मानस तर किर्गिझ  प्रजासत्ताकामध्ये मानस. आमचे हे दोन्ही देश लोकशाहीप्रधान असून वैविध्याने परिपूर्ण आहेत.

आमच्यातील प्राचीन संबंध आणि शांतता वृद्धिंगत करण्याच्या आमच्या मनातील समान भावनेने आम्हाला आमच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची प्रेरणा दिली आहे. यामुळे आमच्यातील राजनैतिक संबंध सुद्धा विस्तारले आहेत. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांच्या विविध क्षेत्रांच्या बाबत भारत आणि किर्गिझ प्रजासत्ताक नियमितपणे परस्परांशी सल्लामसलत करत असतात. अनेक आंतरराष्ट्रीय विषयांबाबत आमचा दृष्टिकोण सारखा आहे. संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय आघाड्यांवर आमचे सहकार्य दृढ असे आहे. सैन्य प्रशिक्षण, संयुक्त युद्धाभ्यास, संशोधन कार्य आणि लष्करी तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये आमच्यातील सहकार्य वाढले आहे. दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्यासंदर्भात संयुक्त कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यामध्ये आर्थिक सहकार्याच्या अनेक शक्यता आहेत. दोन्ही देश एकत्रितपणे याचा लाभ घेऊ शकतात.

मित्रहो,

आज आमच्यामध्ये द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि दुहेरी कररचना प्रतिबंध अर्थात Double Taxation Avoidance करार झाले आहेत. दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या क्षेत्रात पाच वर्षांत आराखडा बनवण्याबाबत सहमती झाली आहे. राष्ट्रपती आणि मी, आम्ही दोघांनी, B2B सहकार्य वाढवण्यासाठी आज भारत किर्गिझ उद्योग मंचाचा संयुक्तपणे शुभारंभ केला आहे. यावर्षी बिश्केक मध्ये ‘नमस्कार युरेशिया’ या भारतीय व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय कंपन्यांनी किर्गिझ प्रजासत्ताकामध्ये निर्मिती, रेल्वे, जलऊर्जा, खाणकाम आणि अशा अनेक क्षेत्रातील संधींचा अभ्यास करावा, असे मी सांगू इच्छितो.

मित्रहो,

किर्गिझ प्रजासत्ताकाच्या विकासाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आज 200 दशलक्ष डॉलर्सच्या  पतपुरवठ्याची घोषणा करतांना मला मनापासून आनंद होतो आहे. भारताच्या सहकार्याने किर्गिझ प्रजासत्ताकामध्ये अनेक संयुक्त आर्थिक उपक्रम सुरू करण्यास हातभार लागेल, अशी आशा मला वाटते. भारत आणि  किर्गिझ प्रजासत्ताक तसेच मध्य आशियातील मोठ्या क्षेत्रातील अधिक चांगल्या जोडणीमुळे दोन्हीकडच्या नागरिकांदरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि परस्परांशी संपर्क वाढीला लागतील.

मित्रहो,

भारत आणि किर्गिझ प्रजासत्ताकाने जानेवारी महिन्यात उज्बेकिस्तानमध्ये समरकंद येथे आयोजित परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरीय पहिल्या भारत - मध्य आशिया संवादात सक्रिय भागीदारी नोंदवली आहे. आमच्या सामाईक क्षेत्रात समृद्धी, शांतता आणि स्थैर्य अबाधित ठेवण्यासाठी आमचा दृष्टिकोन सुद्धा समान आहे.

आदरणीय महोदय,

भारत आणि किर्गिझ प्रजासत्ताकासारख्या लोकशाहीप्रधान आणि वैविध्याने समृद्ध अशा समाजासमोर आज दहशतवाद हे फार मोठे संकट उभे आहे. दहशतवाद आणि कट्टरवाद नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही परस्परांच्या सोबत आहोत. दहशतवादाच्या प्रायोजकांना जबाबदार ठरवावे लागेल. दहशतवाद कोणत्याही स्वरूपात योग्य मानला जाणार नाही, हा संदेश संपूर्ण जगाला देण्याची आवश्यकता आहे.

मित्रहो,

बिश्केकमध्ये भारत किर्गिझ संयुक्त वस्त्रोद्योग प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी उत्साहाने येणाऱ्या लोकांना, भारत आणि किर्गिझ या दोन्ही देशांमधील वस्त्रोद्योग परंपरेत कितीतरी साम्य आहे, हे बघून निश्चितच आश्चर्य वाटेल, भारत आणि किर्गिझ प्रजासत्ताक, पर्वतीय जीव संस्था, हरित पर्यटन आणि बर्फाळ प्रदेशातील चित्त्यांच्या संरक्षणासारख्या विषयांबाबतही आमच्यात सहकार्य राहील. आमच्या नागरिकांमधील परस्परांशी मैत्री आणि सांस्कृतिक संबंध ही सर्वात मोठी संपदा आहे. ती जोपासली जावी, असे मला वाटते. त्यासाठी सुद्धा अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

2021 हे वर्ष किर्गिझ प्रजासत्ताक आणि भारत यांच्यातील संस्कृतीचे आणि मैत्रीचे वर्ष म्हणून साजरा करण्याबाबत आमच्यात सहमती झाल्याचे घोषित करताना मला अतिशय आनंद होतो आहे. मी पुन्हा एकदा राष्ट्रपतीजी आपले आभार मानतो. याप्रसंगी मी आपणाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो. भारतात आपले स्वागत करणे, ही आमच्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असेल.

धन्यवाद!!!‌

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar

 


(Release ID: 1580236) अभ्यागत कक्ष : 122
Read this releasein: English