अर्थ मंत्रालय
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत 9.5 कोटी शौचालयांची निर्मिती
5.5 लाख कोटी गावे हागणदारी मुक्त, 93.1 टक्के घरांमध्ये शौचालय
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2019 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2019
केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2018-19 सादर केला. सर्वेक्षणानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जगातल्या सर्वात मोठ्या स्वच्छता कार्यक्रम हाती घेऊन वर्तणूक बदलाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. याअंतर्गत 99.2 टक्के ग्रामीण शौचालये बांधण्यात आली आहेत. ऑक्टोबर 2016 पासून देशभरात 9.5 कोटी शौचालये बांधण्यात आली. ज्यामुळे 5 लाख 64 हजार 658 गावे हागणदारी मुक्त झाली.
स्वच्छ भारत मिशनमुळे पाच वर्षांहून लहान बालकांमध्ये अतिसार आणि मलेरिया, अर्भक मृत्यू दर, जन्मावेळी वजन कमी असणे या समस्यांमध्ये घट झाली आहे. हा जगातला सर्वात मोठा स्वच्छता कार्यक्रम असून यामुळे नागरिकांच्या वर्तणूकीत बदल झाला आहे. त्यातून अप्रत्यक्षपणे आर्थिक विकासाला चालना मिळत आहे.
- शौचालय बांधणी तसेच त्यांचा नियमित वापर यासाठी लोकांचा सहभाग
- शौचालय बांधणीसाठी लोकांना वैयक्तिक पर्याय
- तळागाळातील लोकांमध्ये बदल घडवण्यासाठी जिल्ह्यांची क्षमता विकसित करणे.
- राज्य स्तरावर संस्थांना मदत देऊन वर्तणूक बदलासाठी प्रेरित करणे.
- कंपनी, उद्योग समूह याद्वारे मदतीसाठी स्वच्छ भारत कोषाची निर्मिती
- शौचालयांची निर्मिती आणि उपलब्धता तपासण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधलेल्या शौचालयांपैकी 90 टक्के शौचालये जीओ टॅगिंगद्वारे जोडली गेली आहेत.
- या अंतर्गत वैयक्तिक शौचालयांसाठी 12 हजार रुपयांचा निधी देण्यात येतो. त्यापैकी 60 टक्के केंद्र सरकारद्वारे तर 40 टक्के राज्य सरकारद्वारे देण्यात येतो. ईशान्येकडील राज्ये आणि जम्मू-काश्मीरसाठी हे प्रमाण 90:10 असे आहे. यासाठी 51 हजार 314 कोटी रुपयांचा निधी तर 15 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- 2014-18 या कालावधीत या योजनेत भरीव कामगिरी झाली. प्रतिवर्षी 3 कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली. याच्या निकषांमध्ये गाव परिसरात मानवी विष्ठा न आढळणे तसेच मैल्याची तंत्रज्ञानाद्वारे विल्हेवाट यांचा समावेश होतो.
घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन
घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन हे स्वच्छ भारत मिशनचा महत्वाचा हिस्सा आहे. याअंतर्गत राज्यांनी कचरा गोळा करणारी केंद्रे, रजोधर्म स्वच्छता व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प निर्मिती, कंपोस्ट खड्डे, कचरापेटी, कचऱ्याची वर्गवारी, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी बाबींवर काम केले आहे. युनिसेफच्या अहवालानुसार स्वच्छ भारत मिशनमुळे पाणी, जमीन आणि अन्न प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
पुढील वाटचाल
या योजनेमुळे महिलांच्या सन्मानात भर पडली आहे. ज्यातून स्त्री-पुरुष समानता, मुलींचे शिक्षण आदी क्षेत्रात लक्षणीय विकास होईल. भारताची स्वच्छतेकडील वाटचाल ही सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे देईल. ज्यातून शाश्वत विकास उद्दिष्टे गाठणे सोपे होईल.
G.Chippalkatti/M.Chopade /P.Kor
(रिलीज़ आईडी: 1577251)
आगंतुक पटल : 116
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English