वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

किंबर्ले प्रक्रिया आंतरसत्रीय बैठक 2019 मध्ये कारागिरांचे कल्याण आणि क्षमता बांधणीविषयी मंच

Posted On: 19 JUN 2019 7:00PM by PIB Mumbai

 

मुंबई, 19 जून 2019

 

मुंबईत सुरू असलेल्या पाच दिवसीय किंबर्ले प्रक्रिया आंतरसत्रीय बैठक 2019 च्या दुसऱ्या दिवशी आज कारागिरांच्या कल्याणासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात हिरे उद्योग क्षेत्रासमोरच्या अडचणी आणि आव्हाने यावर चर्चा करण्यात आली. तसेच त्यावर उपाययोजनाही शोधण्यात आल्या.

रत्न आणि जवाहिरे क्षेत्राला सरकारच्या सामायिक सुविधा केंद्रांच्या द्वारे सहाय्य केले जाते. या क्षेत्राला कारागिरांचा पुरवठा करून त्याद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग क्षेत्राला चालना देण्याचे काम केले जाते. त्यामुळे हिरे उद्योगाने सामायिक सेवा केंद्रांना तंत्रसहाय्य आणि क्षमता बांधणीसाठी मदत केल्यास याचा लाभ या क्षेत्रातल्या 1.2 दशलक्ष कारागिरांना होऊ शकेल, असे मत वरिष्ठ आर्थिक सल्लागार दत्ता यांनी व्यक्त केले.

मुंबईच्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके या परिषदेला उपस्थित होते. त्यांच्या वतीने रितेश आंग्रे यांनी आपले मत व्यक्त केले. डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये अंतर्गत व्यवस्थापन उत्तम असल्यामुळे त्याचा लाभ संघटनेच्या कार्यपद्धतीमध्ये दिसून येतो. आमच्यासाठी ग्राहक देव आहे आणि या तत्वज्ञानाचा लाभ व्यवसायात होतो, असे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय अंगाडिया संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पटेल यांनीही यावेळी अंगाडिया यांच्या कार्यपद्धतीविषयी तसेच रत्न आणि हिरे उद्योगातल्या त्यांच्या भूमिकेविषयी सादरीकरण केले. हिऱ्यांना पैलू आणि पॉलिश उद्योगात अंगाडियांचे काम महत्वाचे आहे तसेच आजकाल अंगाडिया यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या मंचावर आपली मते नोंदवली.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1574996) Visitor Counter : 99
Read this release in: English