पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री

Posted On: 17 JUN 2019 4:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जून 2019

 

वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही जागतिक दबावामुळे नसून देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आम्ही स्वत:च त्या करत आहोत, असे ते म्हणाले. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘cop-14’ म्हणजेच संबंधित देशांच्या परिषदेच्या 14 व्या सत्राचे यजमानपद भारताला मिळाले असून 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2019 दरम्यान ही परिषद होणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

जमिनीची झपाट्याने धूप होत असून देशातल्या 30 टक्के जमिनीचे त्यामुळे नुकसान झाले आहे. हे थांबवण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. शेती आणि शेत जमीन सुधारण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. या योजनांमधून जमिनीची सकसता आणि सुपिकता वाढवली जात आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते ‘cop-14’ च्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह पर्यावरण विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

वन जमिनींवर वनीकरण वाढवण्यासाठीच्या पथदर्शी योजनेचे उद्‌घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झाले.

या ‘cop-14’ परिषदेसाठी 197 देशातले 5 हजार प्रतिनिधी सहभागी होतील. यात विज्ञान, संशोधन क्षेत्रातले तज्ज्ञ, सरकारी प्रतिनिधी, खासगी क्षेत्र, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित असतील. वाळवंटीकरण, जमीन नापिक होणे आणि दुष्काळ अशा संकटांवर या परिषदेत उपाययोजना शोधल्या जातील.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 



(Release ID: 1574789) Visitor Counter : 255


Read this release in: English