पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Posted On: 26 MAY 2019 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2019

 

लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातल्या नेत्यांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद, नेपाळचे माजी पंतप्रधान माधव नेपाळ यांनी मोदी यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छांबद्दल धन्यवाद दिले. शेजारी प्रथम हे सरकारचे धोरण यापुढेही सुरु राहील असे त्यांनी सांगितले. आशियातील गरीबीचा संयुक्तपणे सामना करण्यासाठी यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिलेल्या प्रस्तावाचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. या प्रदेशात शांतता, प्रगती आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी हा भाग दहशतवाद आणि हिंसेच्या सावटातून दूर होत विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनीही या ऐतिहासिक जनादेशाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. अलिकडच्या काळात भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. कट्टरतावाद आणि दहशतवादाशी लढा देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानत दोन्ही देशांदरम्यान मजबूत, परस्पर हितसंबंधांचे आणि सर्वंकष भागीदारीचे सहकार्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे मोदी म्हणाले.

नेपाळचे माजी पंतप्रधान माधव नेपाळ यांनीही मोदी आणि त्यांच्या सर्व पक्षाचे अभिनंदन केले आहे. या देशाच्या विकासासाठी भारतात बहुमताने आलेले सरकार महत्वाचे कार्य करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.

 

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1572676) Visitor Counter : 72


Read this release in: English