दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

109 व्या डाक अदालतीचे 27 जून रोजी आयोजन

Posted On: 16 MAY 2019 4:10PM by PIB Mumbai

मुंबई, 16 मे 2019

 

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई द्वारे दिनांक 27 जून 2019 रोजी सकाळी 11  वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई 400001  यांच्या कार्यालयामध्ये 109  वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

देशामधील पोस्टाची-सेवा ही सामाजिक-आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देतांना, संभाषणामध्ये /पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या

तक्रारीचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/मनी ऑर्डर/बचत बँक खाते प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी.

संबधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार आर. एन. चेटुले, सहायक निदेशक डाकसेवा (ज.शि) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ.इमारत दुसरा माळा, मुंबई - 400001 यांचे नावे दोन प्रतीसह दिनांक 14.06.2019 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाइट - https://maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.

 

 

M.Chopade/P.Malandkar
 


(Release ID: 1572168)
Read this release in: English