उपराष्ट्रपती कार्यालय

जगाच्या विविध भागात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता


श्रीलंका सरकार आणि तिथल्या जनतेसोबत भारत भक्कमपणे उभा-उपराष्ट्रपतींची ग्वाही

Posted On: 22 APR 2019 5:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2019

 

जगाच्या विविध भागात सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांविषयी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थांनी या दहशतवादी हल्ल्यांविरोधात सर्वसमावेशक कार्यक्रम राबवायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांना गुन्हेगार म्हणून घोषित करणे, दहशतवाद्यांना आश्रय देणारे, अर्थसहाय्य करणारे आणि इतर कुठलीही मदत करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय समुदायांनी नाकारणे अशा उपाययोजना भारताने सुचवल्या असून त्याची अंमलबजावणी केली जावी, असे उपराष्ट्रपती म्हणाले. बंगळुरू विद्यापीठाच्या 54 व्या वार्षिक दिक्षांत समारंभात ते आज बोलत होते. दरवेळी दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यापलिकडे जात आता त्याविरोधात ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले. श्रीलंकेत झालेल्या भीषण दहशतवादी स्फोटांविषयी चिंता व्यक्त करत अशाच स्थितीत भारत, श्रीलंका सरकार आणि तिथल्या नागरिकांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असेही नायडू म्हणाले.

उच्च शिक्षणात जात, धर्म, स्त्री-पुरुष असे भेदभाव असायला नको, असे सांगत उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा सर्वांना समान मिळायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. उच्च शिक्षण संस्थांनी संवादात्मक अध्ययन पद्धती आणि वैविध्यपूर्ण अभ्यास शाखांवर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. नव्या भारताच्या निर्मितीसाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे, असे सांगत कौशल्य विकासावर लक्ष्य केंद्रीत करावे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1570990) Visitor Counter : 76


Read this release in: English