माहिती आणि प्रसारण मंत्रालय

नविन मतदारांना आपण मतदानाच्या या महापर्वात मतदानासाठी प्रवृत्त करावयाचे आहे – आर. एन. मिश्रा


केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरिच ब्यूरो, पुणे तर्फे महा मतदार जागृती अभियानाचे आयोजन

Posted On: 18 APR 2019 5:09PM by PIB Mumbai

औरंगाबाद, 18 एप्रिल 2019

 

महाराष्ट्रात 1 कोटी 19 लाख नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे आणि या नवीन मतदारांना आपण मतदानाच्या या महापर्वात मतदानासाठी प्रवृत्त करावयाचे आहे, असे आवाहन भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्राचे महासंचालक आर एन मिश्रा यांनी केले. ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रिजनल आउटरिच ब्यूरो, पुणे तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महा मतदार जागृती अभियानाच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.

 

निवडणूक निरीक्षक, जे. के. चंदनानी व जिल्हाधिकारी उदय चौधरी हे ही उद्‌घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी हे म्हणाले कि,नव मतदारांना नुसते नाव नोंदवून भागणार नाही तर त्यांनी मतदान करणेही अपेक्षित आहे आणि मतदान कोणाच्याही दबावाला, प्रलोभनला बळी न पडता केले पाहिजे. या दृष्टीने आपण ही महा मतदार जनजागृती व्हॅन गावा-गावात, शहराच्या विविध भागात फिरवणार आहोत.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमाद्वारे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दिनांक 18 ते 22 एप्रिल 2019 दरम्यान महा मतदार जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये फिरते प्रदर्शन वाहन व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 2014 साली कमी मतदान झालेल्या मतदारसंघातील 75 ते 80 प्रभागांना हे फिरते प्रदर्शन वाहन भेट देईल.

  

या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनित कौर, पोलीस उपायुक्त राहुल खाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, आकाशवाणी औरंगाबादच्या वृत्त विभागाचे सहा.संचालक रमेश जायभाये, फिल्ड आउटरिच ब्यूरो-औरंगाबादचे सहा. संचालक निखिल देशमुख, प्रबंधक संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

 

 

M.Chopade/ND/D.Rane

 



(Release ID: 1570888) Visitor Counter : 294


Read this release in: English