माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माध्यम क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी रशियन प्रतिनिधी मंडळाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला भेट दिली
Posted On:
04 APR 2019 5:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2019
रशियाच्या डिजिटल विकास, संवाद आणि माध्यम विभागाचे उपमंत्री अलेक्सी वोलिन यांच्या नेतृत्वाखाली रशियन प्रतिनिधी मंडळाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली.
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सहकार्य प्रक्रिया सुरु करण्यासाठी वार्षिक भारत-रशिया मंचाची बैठक आयोजित करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. दूरचित्रवाणी, वृत्तसंस्था, डिजिटल वितरण व्यवस्था, नवीन माध्यमे, कार्यक्रमांची सहनिर्मिती, व्यवसायिकांचे आदान-प्रदान, आदी संभाव्य क्षेत्रांची सहकार्यासाठी निवड करण्यात आली. दोन्ही देशांच्या तरुण पत्रकारांमध्ये दृढ संबंध निर्माण होण्याची गरज या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
भारतात वर्षअखेरीस होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात विविध देशांनी त्यांची सर्जनशीलता आणि चित्रपट निर्मितीतील सर्वोत्कृष्टतेचे दर्शन घडवण्याची संधी मिळणार असल्याचे खरे यांनी यावेळी सांगितले. या महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी रशियन प्रतिनिधी मंडळाला दिले.
रशियामधे भारतीय चित्रपट अतिशय लोकप्रिय असून, पूर्णपणे भारतीय चित्रपटाला समर्पित 24 तास चालणारी वाहिनी रशियामधे सुरु करण्यात आल्याचे वोलिन यांनी सांगितले.
या बैठकीला प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती, पत्र सूचना कार्यालयाचे मुख्य महासंचालक सितांशु कार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय, दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू, आकाशवाणीचे महासंचालक एफ. शहरीयार, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
N.Sapre/S.Kane/D.Rane
(Release ID: 1570061)
Visitor Counter : 102