गृह मंत्रालय

आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा-2019 आंतरराष्ट्रीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

Posted On: 20 MAR 2019 3:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 मार्च 2019

 

दोन दिवसांच्या आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा-2019 ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आज नवी दिल्लीत यशस्‍वीरित्या संपन्न झाली.  33 देशातील तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित होते. या तज्ज्ञांमध्ये विकास आणि आपत्ती व्यवस्थापन, विकास बँका, संयुक्त राष्ट्र, खासगी क्षेत्र, धोरण आखणीकर्ते आणि इतर संबंधितांचा समावेश होता.

आपत्ती स्थितीस्थापक सोयी सुविधांसाठी एकत्रित कार्य करण्याची गरज 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंग यांनी व्यक्त केली. यामुळे लोक केंद्रीत उपाय शोधता येतील, असेही ते म्हणाले.

आगामी काळात लाखो लोक शहरांकडे येणे सुरूच राहील आणि त्यामुळे शहरी स्थितीस्थापकत्व ही शाश्वततेची गुरूकिल्ली असेल, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात संबंधितांनी राज्य सरकारांसोबत काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शाश्वत आपत्ती स्थितीस्थापक क्षेत्रासाठी गरीबांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून सर्व संबंधितांनी सर्वंकष कार्य करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेत वाहतूक, ऊर्जा, दूरसंचार आणि जल यांसारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. हवामान बदलासंदर्भात नवीन तंत्रज्ञान तसेच निसर्गावर आधारित शोध याविषयावरही चर्चा झाली.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1569169) Visitor Counter : 177


Read this release in: English