माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाला प्रतिष्ठीत बंगाली चित्रपटातील दुर्मिळ पोशाख आणि सामान भेट


चित्रपट प्रभागाला ऐतिहासिक वस्तू भेट देण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज-प्रशांत पाठराबे

प्रविष्टि तिथि: 19 MAR 2019 7:40PM by PIB Mumbai

 

मुंबई, 19 मार्च 2019

 

महाराष्ट्र शासनात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि हौशी छायाचित्रकार दिवंगत कहान चंद्र नय्यर यांची कन्या शोभा नय्यर यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मूळ मॅजिक लॅटर्नसह अनेक दुर्मिळ वस्तू भेट दिल्या. या वस्तूंमध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग यांनी वापरलेल्या टेलिस्कोपची प्रतिकृती, पुरातन फ्लॅश गन, पोलोराईड कॅमेरे तसेच 1950 मध्ये निर्मित फोल्डिंग कॅमेरा आदींचा समावेश आहे.

चित्रपटांशी संबंधित दुर्मिळ वस्तू विशेषत: माझ्या वडिलांचे कॅमेरे भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासारख्या संस्थांकडे जावेत, अशी माझी इच्छा होती. ज्यामुळे या दुर्मिळ वस्तूंचे जतन होईल तसेच त्या सर्वसामान्यांना पाहता येतील, असे शोभा नय्यर यांनी यावेळी सांगितले. या वस्तू संग्रहालयाकडे सोपवण्याचा प्रवास केवळ 47 दिवसात पूर्ण झाल्याचे त्या म्हणाल्या.

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला कोलकात्यातील सर्वात जुन्या चित्रपट निर्मिती आणि वितरण संस्था असलेल्या अरोरा फिल्म कॉर्पोरेशनकडे असलेले प्रतिष्ठीत बंगाली चित्रपटांत वापरलेले कपडे, सामान तसेच पोस्टर्स आदी मिळाले आहेत. यामध्ये ‘जलसा घर’, ‘भगिनी निवेदिता’, ‘राजा राममोहन’ ‘दुरंतो जॉय’ आदी गाजलेल्या बंगाली चित्रपटातील मूळ कपडे आणि सामानाचा समावेश आहे.

या संग्रहाचे ऐतिहासिक मूल्य लक्षात घेता चित्रपट प्रभागाने हा ठेवा भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासाठी मिळवला आहे. या वस्तूंमध्ये भारतीय चित्रपटातील मनोरंजनाच्या नवा आयामाचे प्रतिबिंब दिसून येतेच शिवाय चित्रपटांप्रती संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या लोकांचे समर्पणही दिसून येते. चित्रपट उद्योगाने ऐतिहासिक मूल्य असलेल्या वस्तू संग्रहालयाला दान कराव्या ज्यामुळे संपूर्ण समाजाला या वस्तू पाहता येतील, असे आवाहन चित्रपट प्रभागाचे महासंचालक प्रशांत पाठराबे यांनी यावेळी केले. चित्रपटसृष्टीतील बुजुर्गांना केलेल्या आवाहनाला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि मुंबईत त्याचीच पुनरावृत्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. चित्रपट प्रभागाकडे असलेले चित्रपट आणि माहितीपट यांची सध्या अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जानुसार पुन्हा पाहणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांनी या वस्तू संग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन करताना पाठराबे म्हणाले की, या संग्रहालयासाठी प्रौढांना 20 रुपये प्रवेश मूल्य असून विद्यार्थी आणि मुलांसाठी मोफत प्रवेश आहे. चित्रपट संग्रहालयाने विविध शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटविषयक जुनी मासिके तसेच चित्रपटांशी संबंधित पुस्तकांचे वाचनालय सुरू करण्याची योजना असल्याचेही ते म्हणाले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1569131) आगंतुक पटल : 281
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English