अर्थ मंत्रालय

कारवाईसाठी विश्वासार्ह माहिती महत्वाची, माहिती देणाऱ्याला वैयक्तिक तपशील उघड करण्याची गरज नाही- के.के.व्यवहारे


काळा पैसा आणि पैशाच्या प्रलोभनाला आळा घालण्यासाठी प्राप्तीकर विभाग सज्ज-के.के.व्यवहारे

अहारोत्र नियंत्रण कक्ष, जलद प्रतिसाद पथके तैनात

Posted On: 18 MAR 2019 5:45AM by PIB Mumbai

 

मुंबई, 18 मार्च 2019

 

सार्वत्रिक निवडणुका, मुक्त आणि नि:पक्ष व्हाव्यात यासाठीच्या प्रक्रियेत मुंबईकर नागरिकांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई प्राप्तीकर विभागाने अहोरात्र नियंत्रण कक्ष उभारले आहेत. निवडणुकीसाठी पैसा अथवा मौल्यवान वस्तुंची ने-आण होत असल्याचा संशय असल्यास त्याविषयी माहिती देण्यासाठी मुंबईतले रहिवासी 1800221510 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात. मिळालेली माहिती विश्वासार्ह आणि कारवाई करता येण्याजोगी असणे महत्वाचे आहे असे प्राप्तीकर (तपास) महासंचालक के. के. व्यवहारे यांनी सांगितले. सार्वत्रिक निवडणुका 2019 च्या तयारी संदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

नियंत्रण कक्षाला अशी माहिती देणाऱ्याने आपले नाव किंवा इतर तपशील उघड करण्याची गरज नाही असे त्यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. नि:शुल्क क्रमांकाशिवाय, नागरिक यासंदर्भात 022 22820562 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 9372727823/24 या मोबाईल/व्हॉटस ॲप क्रमांकावर अथवा cleanmumbaielection@incometax.gov.in या ईमेलवरही माहिती देऊ शकतात. निवडणुका मुक्त आणि नि:पक्ष वातावरणात व्हाव्यात यासाठी प्राप्तीकर विभागाने अनेक उपाययोजना हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत काळ्या पैशाचा अथवा मौल्यवान गोष्टींचा वापर होऊ नये यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.

एखादी गुप्त/कारवाई योग्य माहिती मिळाल्यास त्वरेने प्रतिसाद देण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघांसाठी एक, अशी सहा जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी चौकशीकरीता सुमारे 200 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. मनुष्यबळ अपूरे पडणार नाही असे सांगून मिळालेल्या माहितीच्या आवाक्यानुसार आवश्यकता भासल्यास अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येतील असे ते म्हणाले.

याशिवाय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई देशांतर्गत विमानतळासह जुहू विमानतळ आणि वाकोला येथे हवाई गुप्तचर युनिट स्थापन करण्यात आले आहे. निवडणुका मुक्त आणि नि:पक्ष व्हाव्यात यासाठी मुंबई प्राप्तीकर विभाग, इतर राज्यातल्या आणि केंद्रीय एजन्सीच्या संपर्कात आहे.

निवडणुकीसाठी पैसा अथवा इतर मौल्यवान वस्तूची ने-आण करण्यासंदर्भात माहिती असल्यास त्यांनी प्राप्तीकर विभागाच्या संबंधित सुविधांचा उपयोग करत माहिती देऊन लोकसभा निवडणूक 2019 मुक्त आणि नि:पक्ष वातावरणात होण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन महासंचालकांनी नागरिकांना केले आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1569052) Visitor Counter : 109


Read this release in: English