मंत्रिमंडळ

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त

Posted On: 18 MAR 2019 2:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 मार्च 2019

 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक व्यक्त करण्यात आला. पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी निधीन झाले. मंत्रिमंडळाने दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सर्व राज्ये, गोवा, दिल्लीसह सर्व केंद्रशासित प्रदेशात 18 मार्चला एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्याला आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यासाठीही केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

पर्रिकर यांच्या निधनाने देशाने जाणता नेता गमावल्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाने संमत केलेल्या शोक संदेशात म्हटले आहे. पर्रिकर यांना सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात असे.

13 डिसेंबर 1955 मध्ये गोव्यातल्या म्हापसा येथे जन्मलेले पर्रिकर यांचे मडगाव इथल्या लोयोला विद्यालयात शालेय शिक्षण झाले. 1978 मध्ये मुंबईतल्या आयआयटीमधून त्यांनी धातू शास्त्रांतून अभियांत्रिकी पदवी घेतली. युवावस्थेत त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू करून शालेय शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यातच ते मुख्य शिक्षक बनले. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी म्हापसा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू केले आणि 26 व्या वर्षी ते संघचालक बनले.

1994 मध्ये गोवा विधानसभेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले. 24 ऑक्टोबर 2000 ला ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. 27 फेब्रुवारी 2002 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 3 जून 2002 ला मुख्यमंत्रीपदी त्यांची पुन्हा निवड झाली आणि 2 फेब्रुवारी 2005 पर्यंत ते या पदावर होते.  9 मार्च 2012 ला ते तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. 8 नोव्हेंबर 2014 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले. 9 नोव्हेंबर 2014 ला त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून धुरा हाती घेतली. 13 मार्च 2017 पर्यंत त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून कारभार पाहिला. त्यानंतर 14 मार्च 2017 ला गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा त्यांचा शपथविधी झाला.

साधेपणा आणि उत्तम प्रशासक म्हणून पर्रिकर सदैव स्मरणात राहतील असे मंत्रिमंडळाच्या शोकसंदेशात म्हटले आहे. आधुनिक गोवा निर्माण करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि माजी सैनिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पर्रिकर यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

पर्रिकर यांना गोव्यातल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने 2018 मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान केली, 2018 मध्ये त्यांना डॉ. एस.पी.मुखर्जी पारितोषिकाने गौरवण्यात आले.

पर्रिकर यांना दोन पुत्र असून त्यांचे कुटुंबिय आणि गोव्यातल्या जनतेच्या दु:खात संपूर्ण राष्ट्राच्या वतीने आपण सहभागी असल्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1569049) Visitor Counter : 78


Read this release in: English