पंतप्रधान कार्यालय

नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

Posted On: 09 MAR 2019 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी  संवाद साधला.

पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. पुरस्कार विजेत्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे असे प्रशंसोद्गार काढून त्यांनी आपापल्या क्षेत्रात अधिक उत्तुंग कार्य करावे असे पंतप्रधान म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानाला महिलांनी महत्व दिले असे सांगून हे अभियान यशस्वी ठरण्याचे मोठे श्रेय, त्यांनी या गोष्टीला दिले. प्रयागराज इथे नुकत्याच सांगता झालेल्या कुंभ मेळ्याचा उल्लेख करत, यावेळी या मेळ्यात उच्च दर्जाची स्वच्छता राखण्यात आल्याची चर्चा सगळीकडे होती असे त्यांनी सांगितले. स्वच्छता आता जन चळवळ ठरली आहे असे ते म्हणाले.

स्वच्छतेच्या या आंदोलनातले पुढचे पाऊल म्हणजे टाकाऊचे संपत्तीत रुपांतर होय असे त्यांनी सांगितले.

कुपोषणावर मात करणे आणि इंद्रधनुष अभियानामार्फत बालकांचे लसीकरण या मुद्यानांही पंतप्रधानांनी स्पर्श केला. या दोनही बाबीत यशस्वी ठरण्यासाठी महिलांची  महत्वाची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यावेळी उपस्थित होत्या.

MC/NC/PM



(Release ID: 1568650) Visitor Counter : 87


Read this release in: English