पंतप्रधान कार्यालय

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 50 व्या स्थापना दिनाला पंतप्रधानांची उपस्थिती

Posted On: 10 MAR 2019 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2019

 

उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद मधल्या इंदिरापुरम इथे सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा  50 वा स्थापना दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज साजरा झाला.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या परेडची पंतप्रधानांनी पाहणी केली. प्रशंसनीय सेवेबद्दल सेवापदके यावेळी  पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. हुतात्मा स्मारकावर त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि अतिथी पुस्तिकेत स्वाक्षरी केली.

सीआयएसएफच्या सुवर्ण जयंतीनिमित्त त्यांनी दलाचे अभिनंदन केले. देशाच्या प्रमुख संस्थांचे संरक्षण करण्यामध्ये सीआयएसएफच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. नवभारतासाठी निर्माण करण्यात आलेल्या आधुनिक संरचनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सीआयएसएफच्या सुरक्षित हाती असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सुरक्षा दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. व्हीआयपी  संस्कृती ही सुरक्षा संरचनेत अडथळा निर्माण करते. म्हणूनच नागरिकांनी सुरक्षा जवानांना सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. सीआयएसएफची भूमिका आणि कार्य याविषयी जन जागृती करण्यासाठी, त्यांचे कार्य दर्शवणारी, डिजिटल संग्रहालये, विमानतळ, मेट्रो यासारख्या ठिकाणी सुरु करण्याची सूचना त्यांनी केली.

देशाच्या महत्वाच्या पायाभूत ढाच्याच्या संरक्षणात सीआयएसएफच्या भूमिकेची प्रशंसा करत, आपत्ती प्रतिसाद,महिला सुरक्षा आणि इतर बाबीतही हे दल कार्यरत असल्याचे ते म्हणाले. केरळ मधला पूर आणि नेपाळ आणि हैती इथला भूकंप या आपत्तीच्या वेळी सीआयएसएफच्या जवानांनी बजावलेल्या मदत आणि बचाव कार्याबद्दलही त्यांनी सांगितले.

आपल्या सुरक्षा दलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटीबद्ध आहे. यासंदर्भात सुरक्षा दलांचे आधुनिकीकरण आणि त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने उचललेल्या पाऊलांचा त्यांनी उल्लेख केला.

कर्तव्य म्हणजे सशस्त्र दलासाठी उत्सव आहे असे सांगून दहशतवादामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमुळे सीआयएसएफची भूमिका विस्तारली आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपले सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय पोलीस स्मारक, आपले पोलीस आणि अर्ध सैनिक बलाचे शौर्य आणि बलिदान यांना समर्पित असल्याचे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय युध्द स्मारक आणि  राष्ट्रीय पोलीस स्मारक यामुळे सुरक्षा दलांच्या योगदानाविषयी जनतेत जागृती निर्माण होईल.सीआयएसएफमधे अनेक महिला सैनिकांची भरती करण्याच्या सीआयएसएफच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

भारताची प्रगती आणि आगेकूच सुरु राहील त्यानुसार सीआयएसएफची भूमिका आणि त्यांची जबाबदारीही वृद्धींगत होत राहील असे पंतप्रधान म्हणाले.

 

MC/NC/PM

 

 

 



(Release ID: 1568534) Visitor Counter : 183


Read this release in: English