पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशात अमेठी येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 03 MAR 2019 1:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2019

 

मी सर्वप्रथम तुमच्याकडून तीन वेळा जयघोष म्हणवून घेईन आणि माझी विनंती आहे की दोन्ही मुठी बंद करून, हात वर करून जयजयकार करायचा आहे. आणि मी तीन वेगवेगळे जयजयकार म्हणेन.

भारत माता की जय चा जयघोष करायचा आहे. पराक्रमी भारतासाठी --

भारत माता की – जय

जरा पूर्ण ताकदीनिशी बोला-- पराक्रमी भारतासाठी--

भारत माता की – जय

विजयी भारतासाठी 

भारत माता की – जय

वीर जवानांसाठी -

भारत माता की – जय

खूप-खूप धन्‍यवाद.

उत्‍तर प्रदेशचे लोकप्रिय आणि यशस्‍वी मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाच्या संरक्षण मनातरी निर्मला सीतारामनजी,  मंत्रिमंडळातील सहकारी  स्‍मृति इराणीजी , राज्य सरकारमधील मंत्री  मोहसिन रजाजी, सुरेश पासीजी,  आमदार मयंकेश्‍वर शरण सिंह, गरिमा‍ सिंह , दल बहादुर कोरी ,उत्‍तर प्रदेशच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, जय राम जी की.  कसे आहात तुम्ही सगळे. ठीक ना.

तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने जमला आहात, तुम्हा सर्वाना माझा नमस्कार. ही भूमी टीकरमाभीच्या महाराजांची  तपोभूमि आहे. ही भूमी जैमिना महापुराणचे रचनाकार  बाबा पुरुषोत्‍तम दास यांची भूमि आहे. मलिक मोहम्‍मद जयसी, आर्यसमाजचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आणि जनसंघाचे आमदार असलेल्या  राजा रमण जयसी यांची भूमी आहे. मी या भूमीला वंदन करतो.

गेल्या साडेचार वर्षात उत्‍तर प्रदेश आणि अमेठीच्या विकासासाठी आमच्या सरकारने जी विकासकामे केली आहेत, आज त्यांचा आणखी विस्‍तार करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. आणि मी पाहिले की आजही माझे स्वागत करण्यासाठी  मेघराजाने देखील कृपा केली आहे. आणि मला चांगले आठवतंय की, 98 मध्ये अटलजी यांच्याबरोबर इथे मी जाहीर सभा घेण्यासाठी आलो होतो आणि त्यादिवशी देखील खूप पाऊस पडला होता, सगळी व्यवस्था कोलमडली होती आणि तेव्हापासून मी नियमितपणे कुठल्या ना कुठल्या संघटनेच्या कामासाठी अमेठीला येत होतो. पंतप्रधान बनल्यानंतर आज पुन्हा एकदा तुमच्याकडे यायची संधी मिळाली आहे.

2014 मध्ये निवडणुकीच्या वेळी आम्ही म्हटले होते-- सबका साथ-सबका विकास. अमेठीच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आमच्या सबका साथ-सबका विकास मंत्राचे अमेठी एक उत्‍तम उदाहरण आहे. जेव्हा आम्ही सबका साथ-सबका विकास बद्दल बोलतो तेव्हाही मी म्हणायचो, आजही म्हणतो ज्यांनी आम्हाला मत दिले ते देखील आमचे आहेत आणि ज्यांनी मत दिले नाही ते देखील आमचे आहेत. ज्यांनी आम्हाला जागा दिली ते क्षेत्र देखील आमचे आहे आणि ज्यांनी आम्हाला जागा दिली नाही ते क्षेत्र देखील आमचे आहे.

आज पाच वर्षानंतर मी अमेठीच्या नागरिकांसमोर नतमस्‍तक होऊन मोठ्या गौरवाने सांगू शकतो की स्‍मृति ईरानी उमेदवार म्हणून तुमच्यासमोर आल्या होत्या, तुमच्यासाठी नवा चेहरा होता, नवीन ओळख होती, मात्र तुम्ही खूप आशीर्वाद दिलेत. भले, तेव्हा आम्ही निवडणूक जिंकू शकलो नव्हतो, मात्र तुमची मने जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो. तुम्ही एवढे प्रेम दिलंत की  गेली पाच वर्षे स्‍मृतिजीनी या क्षेत्रासाठी एवढी मेहनत घेतली आहे की कधी तुम्हाला असे वाटू दिले नाही की तुम्ही त्यांना हरवले आहे का जिंकवले आहे , जिंकलेल्यांपेक्षा अधिक काम करून दाखवले आहे. मी जरा अमेठीच्या लोकांना विचारू इच्छितो - तुम्ही आमच्या कामाबाबत समाधानी आहात का ? आम्ही तुमची चिंता केली आहे का? आम्ही तुमचे भले करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. कुठेही किंचित जरी आम्ही अन्याय केला आहे का ? पूर्ण न्याय दिला आहे हाच आमचा सबका साथ-सबका विकास मंत्र आहे.

थोड्या वेळापूर्वी अमेठीच्या विकासाशी संबधित शेकडो कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे लोकर्पण आणि पायाभरणी करण्यात आली. यामध्ये शाळा, रस्ते,  तपासणी केंद्र , गोशाळा आहेत, वीज आहे, शेतीशी संबंधित अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

बंधू आणि भगिनीनो, या प्रकल्पांबरोबरच आज मी एक अतिशय महत्‍वपूर्ण घोषणा करणार आहे. ही घोषणा अमेठीच्या नवीन ओळख, नवीन शानशी संबंधित आहे. कितीतरी मोठे नेते इथे आले असतील, आता भविष्यात अमेठी त्यांच्या नावाने नाही तर आज मी जी योजना आणली आहे, तिच्या नावांने ओळखले जाईल.

बंधू आणि भगिनींनो, आता कोरबाच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत जगातील सर्वात आधुनिक , जगातील सर्वात आधुनिक बंदुकांपैकी एक - AK203म्हणजे कलाश्निकोव्ह रायफलींच्या मालिकेतील  कलाश्निकोव्ह मालिकेतील सर्वात नवीन शस्त्रास्त्र आता आपल्या अमेठीत तयार केले जाईल, हया रायफली रशिया आणि भारताची एक संयुक्त कंपनी मिळून करणार आहे. थोड्या वेळापूर्वी आपण देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री निर्मलाजी यांनी रशियाच्या अध्यक्षांचा संदेश इथे वाचून दाखवला. मी माझे आणि भारताचे जिवलग मित्र अध्यक्ष पुतिन यांचे या भागीदारीबद्दल खूप-खूप आभार मानतो. ही संयुक्त कंपनी अतिशय कमी वेळेत त्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाली आहे. त्यांचा मैत्रीपूर्ण संदेश आणि शुभेच्छांसाठी देखील मी अध्यक्ष पुतिन यांचा खूप-खूप आभारी आहे. त्याचबरोबर या संयुक्त कंपनीशी संबंधित रशियन मित्रांना देखील मी धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो, याच्या यशासाठी शुभेच्छा देतो.

मित्रांनो, काही लोक जगभरात फिरताना सांगत असतात, प्रत्येक गावात सांगत असतात - मेड इन उज्‍जेन, मेड इन जयपुर, मेड इन जेसलमेर, मेड इन बड़ोदा- भाषण करत असतात. त्यांचे भाषण, भाषणच राहते. हे मोदी आहेत, आता मेड इन अमेठी, हे मेड इन अमेठी, मेड इन अमेठी AK203 रायफलींमुळे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांबरोवर होणाऱ्या चकमकीत आपल्या जवानांना नक्कीच फायदा होईल. अमेठीच्या कारखान्यात आता लाखोंच्या संख्येने या रायफली तयार केल्या जातील. यापुढे इथे ज्या रायफली बनतील, त्या जगभरातील अन्य देशात देखील निर्यात केल्या जातील. म्हणूनच हा कारखाना अमेठीच्या युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी घेऊन येत आहे आणि देशाच्या विकास आणि सुरक्षेसाठी देखील एक नवीन मार्ग खुला करत आहे.

बंधू आणि भगिनींनो, आजपासून इथे जे काम सुरु होत आहे, हे काम 8-9 वर्षांपूर्वी सुरु व्हायला हवे होते. कोरबाचा हा कारखाना आधुनिक रायफली बनवण्यासाठीच उभारण्यात आला होता, मात्र याचा पूर्ण क्षमतेने कधी वापर केला गेला नाही.  कशा प्रकारे यापूर्वी आपल्या सुरक्षा दलांच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते याचा अमेठीचा हा कारखाना साक्षीदार आहे.

मित्रांनो, देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या सुरक्षा दलांनी 2005 मध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांची आपली गरज तत्कालीन सरकारला सांगितली होती. त्यासाठीच अमेठीमध्ये या कारखान्याचे काम सुरु झाले होते.  तुमच्या इथले खासदार, जेव्हा 2007 मध्ये याची पायाभरणी करण्यात आली होती तेव्हा हे सांगण्यात आले होते की वर्ष 2010 मध्ये याचे काम सुरु होईल. काय झाले? त्यांनी म्हटले होते की नाही? त्यांचे सरकार होते की नव्हते? ते जे म्हणाले होते, ते व्हायला हवे होते की नाही? काय झाले? अहो, जे एवढे देखील करू शकत नाहीत, त्यांच्यावर विश्वास का ठेवता? मात्र मित्रानो, काम सुरु होणे तर दूर , पायाभरणींनंतर तीन वर्षे यापूर्वीचे सरकार हेच ठरवू शकली नाही की  इथल्या ऑर्डनन्स कारखान्यात कशा प्रकारची शस्त्रास्त्रे बनवायची. एवढेच नाही-हा कारखाना कुठे उभारायचा , यासाठी जमीन देखील उपलब्ध करून दिली गेली नाही.

मित्रांनो, विचार करा- ज्या कारखान्यात 2010 मध्ये काम सुरु व्हायला हवे होते, त्याची इमारत 2013 पर्यंत बनली नव्हती. इमारत उभी राहिल्यांनंतर थोडेफार काम सुरु झाले , कारण निवडणुका समोर होत्या. काहीतरी दाखवणे आवश्यक होते , मात्र आधुनिक रायफल तेव्हाही बनली नव्हती. आणि हे देखील विसरू नका की कारखान्यात त्यांनी आश्वासन दिले होते-हे म्हणतात ना आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करतो, आम्ही कधी खोटे बोलत नाही-ते देखील खूप मोठे खोटे बोलतात.  आणि हे देखील विसरू नका - ते म्हणाले होते कि 1500 युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या  अमेठीबद्दलच बोलतो आहे, देशाबद्दल नाही. मात्र एवढ्या मोठं-मोठ्या गोष्टी करणाऱ्यांनी अमेठीच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आहे, आणि केवळ 200 लोकांना काम मिळाले आणि आज देशभरात  रोजगाराबाबत भाषण देत फिरत आहेत.

अमेठीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आता इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमेठीच्या ऑर्डनन्स कारखान्यात जगातील सर्वात आधुनिक रायफलींपैकी एकाचे उत्पादन सुरु होणार आहे. 

मित्रांनो, मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की आधुनिक रायफली न बनवल्यामुळे आपल्या वीर जवानांबरोबर अन्‍याय झाला की नाही? ऑर्डनन्स कारखान्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर न करून इथल्या संसाधनांवर अन्याय झाला की नाही? रोजगार न दिल्यामुळे अमेठीच्या युवकांवर अन्याय झाला की नाही?

मित्रांनो, यापूर्वी जे सरकार होते, त्यांनी सुरक्षादलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. आपल्या वीर जवानांना बुलेटप्रूफ जैकेटसाठी किती थांबवून ठेवण्यात आले, त्याची देशाला वारंवार आठवण करून देणे आवश्‍यक आहे. 2009 मध्ये सुरक्षा दलांनी  एक लाख 88 हजार बुलेट प्रूफ जैकेटची मागणी केली होती. बुलेट प्रूफ जैकेटविना आपला जवान शत्रूच्या गोळ्या आणि दहशतवाद्यांची छापेमारी कारवाईला सामोरे जात होते.आपल्या जीवाची बाजी लावत दहशतवाद्यांबरोबर जीवघेण्या चकमकी करत होते. 2009 पासून  2014 पर्यंत पाच वर्षे -पाच वर्षे हा काही कमी काळ नाही, मात्र जवानांसाठी बुलेट प्रूफ जैकेट खरेदी केले गेले नाहीत. हे आमचेच सरकार आहे ज्याने गेल्या साडेचार वर्षात  दोन  लाख 30 हजार पेक्षा अधिक बुलेट प्रूफ जैकेट खरेदीसाठी ऑर्डर दिली.

मी आज अमेठीमध्ये आलो आहे तर तुम्हा लोकांकडून जाणून घ्यायचे आहे की देशाच्या वीर जवानाना रायफलीची प्रतीक्षा करायला लावणारे , बुलेट प्रूफ जैकेटची वाट पाहायला लावणारे हे लोक कोण होते? कोण होते? मी कुणाचे नाव घेणार नाही, मात्र तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे की हे लोक कोण होते.आणि म्हणूनच बंधू आणि भगिनींनो- भारत माता की जय. आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, तुम्हाला माहित आहे मला कुणाचे नाव घेण्याची गरज नाही.

बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशाला आधुनिक रायफलीचं नव्हे, आधुनिक बुलेट प्रूफ जैकेटच नव्हे, आधुनिक तोफांसाठी देखील या लोकांनी वाट पाहायला लावली. हे आमचेच सरकार आहे ज्याने आधुनिक तोफांचा सौदा केला आणि आता तर भारतातच त्या बनवल्या जात आहेत. मित्रांनो, आधुनिक तोफांप्रमाणेच आधुनिक लढाऊ विमानांसाठी आपल्या वायुदलाची. अनेक वर्षे मागणी होती, मात्र ज्यांची वृत्तीच खराब असेल, त्यांना वायुदलाचा आवाज कसा ऐकू येणार? हे लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांचा करार अडवून बसले आणि जेव्हा सरकार जायची वेळ आली तेव्हा ते बंद बासनात गुंडाळून ठेवले. पुढील काही महिन्यात पहिले राफेल विमान आकाशात उडेल यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. मात्र हे लोक, अजूनही हे लोक राफेल विमानांच्या कराराचा आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या हितासाठी, तो होऊ न देण्यासाठी काही ना काही कारस्थाने करत आहेत.

बंधू आणि भगिनींनो, सर्वोच्च न्यायालयापासून कॅग पर्यंत, प्रत्येक संस्था म्हणत आहे की भारत सरकारने योग्य निर्णय घेतला आहे, योग्य वेळी घेतला आहे, योग्य करार केला आहे आणि देशाच्या हितासाठी केला आहे. मात्र हे लोक एकापाठोपाठ एक खोटे बोलत आहेत. संरक्षण करारात कमीशन न‍ मिळाल्यामुळे संताप कसा होतो ते काही लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

मित्रांनो, जसे या लोकांनी देशाच्या सुरक्षेची पर्वा केली नाही तसेच वर्तन या लोकांनी अमेठीच्या लोकांबरोबर केले आहे. अमेठीसाठी काय-काय म्हणाले होते, मात्र आज अमेठीची स्थिति काय आहे हे तुमच्यापेक्षा चांगले कुणाला माहित आहे?

बंधू आणि भगिनींनो, जर मनातच  नसेल, गरीबांचे कल्याण करण्याची इच्छाच नसेल, जर लोकांशी फक्त आणि फक्त खोटेच बोलायचे असेल तर असेच होते. तुम्ही आठवून पहा, इथे उभारण्यात आलेला पोलाद कारखाना देखील यामुळेच बाहेर गेला कारण त्यासाठी गॅसची व्यवस्था केली गेली नव्हती. इथल्या मेघापुर फूडपार्कबरोबर देखील असेच झाले. आम्ही पोलाद कारखान्यासाठी  गैस पाइप लाइनची व्यवस्था केली. आता हा पोलाद कारखाना अमेठीला रोजगार देण्यासाठी आणि देशात पोलाद उत्पादनाला गती देण्यासाठी तयार आहे.

बंधू आणि भगिनींनो, गोलीगंज इथे सायकलचा कारखाना उभारण्यात येणार होता, त्याचीही हीच स्थिती झाली. शेतकऱ्यांकडून जमीन घेतली गेली, कारखाना मात्र उभारला नाही आणि जमीन मागच्या दरवाजाने आपल्या नावावर केली गेली. अमेठीच्या विकासाच्या नावाखाली तुमच्या भावनांशी अशा प्रकारे खेळण्यात आले.

मित्रांनो, जेव्हा सत्ता स्‍वार्थ बनते, तेव्हा वारसा विस्तारणे हे एकमेव उद्दिष्ट बनते तेव्हा सामान्‍य मनुष्याच्या कल्याणाची भावना नष्ट होते. दुर्दैवाने अमेठी बरोबर देखील असेच झाले.

मी एक टीव्ही रिपोर्ट पाहत होतो. त्यात इथल्या एका  दलित वस्तीचा रिपोर्ट दाखवण्यात आला. सांगण्यात आले की 2008 मध्ये दलितांना जी घरे देण्यात आली, ती दहा वर्षातच पडण्याच्या मार्गावर आहेत. त्या वस्तीतील लोक सांगत होते  की इथल्या खासदारांनी वस्त्यांना आपले नाव तर दिलेच मात्र त्यानंतर त्या लोकांना नामानिराळे ठेवण्यात आले.

मित्रांनो, अमेठीच्या लोकांबरोबर कशा प्रकारचे वर्तन केले गेले तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आणि आज तुम्ही हे देखील पाहत आहात की आमच्या सरकारने  इथे कशा प्रकारे विकासकामे केली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमेठीमध्ये अशी 9 हजारहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी देऊन, सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीज जोडणी देऊन, शौचालये बांधून इथल्या लोकांचे जगणे सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बंधू आणि भगिनींनो, मत घेऊन जनतेला विसरणे काही कुटुंबांची प्रवृत्ति आहे. ते गरीबांना गरीब ठेवू इच्छितात, जेणेकरून पिढ्यानपिढ्या गरीबी हटाओच्या घोषणा देता येतील. आम्ही गरीबाना  सशक्‍त करून त्यांना दारिद्र्यातून बाहेर पडण्याचे बळ देत आहोत. हेच कारण आहे की आज भारत अशा देशांमध्ये गणला जातो जिथे अतिशय वेगाने गरीबी कमी होत आहे. गरीबां प्रति, त्यांच्या गरजांप्रती काही लोकांमध्ये संवेदनशीलता उरलेली नाही.

मित्रांनो, गरीबांबरोबर जे केले गेले, तेच देशाच्या शेतकऱ्यांबरोबर देखील झाले. या लोकांनी शेतकऱ्यांच्या सबलीकरणाचा कधी प्रयत्नच केला नाही. त्यांच्या छोट्या-मोठ्या अडचणींकडे ते दुर्लक्ष करत गेले. जेव्हा शेतकरी त्यांच्या योजनांमुळे कंटाळून जायचा तेव्हा ते कर्जमाफीच्या भ्रमात त्यांना अडकवायचे. गेल्यावेळी  2008 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांवर 6 लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना  52 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले.

एवढेच नाही, जेवढी कर्ज माफी केली, त्याचा लाभ देखील सरासरी तीन-साडे तीन कोटी म्हणजे तुमच्या गावात 100 शेतकरी असतील, तर मुश्किलीने 20 किंवा  25 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. बाकी कर्ज माफीचा लाभ तर त्यांचे सर्व हितधारक,.ठेकेदार, दलाल, मध्यस्थ घेऊन गेले. आमचे सरकार जी प्रधानमंत्री किसान सम्‍मान निधि योजना घेऊन आले आहे त्याचा लाभ देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना मिळणे सुनिश्चित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्यांनाही लवकरच याचा लाभ मिळणार आहे.

मित्रांनो, ही योजना एवढी मोठी आहे की आगामी दहा वर्षात साडेसात लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील. विचार करा, देशातील गावांना, शेतकऱ्यांना, ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यातून किती मोठी ताकद मिळणार आहे. यातून अमेठीच्या हजारो शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. खत खरेदी असेल, बियाणे खरेदी असेल, विजेचे बिल भरायचे असेल, कीटकनाशके खरेदी करायची असतील, अशी अनेक कामे ते या पैशातून करू शकतील.

बंधू आणि भगिनींनो, शेतकरी असेल, जवान असेल किंवा आपल्या देशातील तरुण मुले-मुली असतील, तुमचा हा प्रधान सेवक आज काम करू शकत आहे त्यामागे तुमची शक्ति आहे, तुमचा आशीर्वाद आहे. तुमचा हा उत्साह पाहून मी म्हणू शकतो की अमेठी आणि अमेठीचे लोक नवीन इतिहास रुचणार आहेत.  एक असा इतिहास, ज्याचा आवाज संपूर्ण देशात ऐकू येईल.

मित्रांनो, मी अमेठीच्या विकासाची अनेक कामे करणाऱ्या स्मृतीजींना विशेष धन्‍यवाद देतो. तसेच पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष पुतिन ज्यांचा संदेश संरक्षणमंत्री निर्मलाजी यांनी वाचून दाखवला, त्यांचेही आभार मानतो. आणि जगाला  भारताची नारी शक्ति काय असते ते चांगले समजले आहे. ज्या देशाच्या संरक्षणमंत्री स्त्री आहे त्याने जगाला दाखवून दिले की देशाच्या संरक्षणासाठी कशी पावले उचलायची असतात.

पुन्हा एकदा अमेठीतील एवढा मोठा विराट जनसागर मी इथे पाहतो आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या, मी तुमचे मनापासून खूप-खूप आभार व्यक्त करतो. माझ्याबरोबर म्हणा- 

भारत माता की – जय

भारत माता की – जय

खूप-खूप धन्‍यवाद.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1568521) Visitor Counter : 88


Read this release in: English