पंतप्रधान कार्यालय

‘बांधकाम तंत्रज्ञान इंडिया 2019’ चे नवी दिल्लीत उद्‌घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 02 MAR 2019 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2019

 

इथे उपस्थित सर्वांचे स्वागत.प्रत्येक भारतीयाला घर देण्याच्या ऐतिहासिक प्रयत्नातले तुम्ही महत्वाचे भागीदार आहात.

गृहनिर्माण क्षेत्राशी एका महिन्यात, दुसऱ्यांदा संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे. मध्यम वर्गाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची कटीबद्धता यातून प्रतीत होत आहे.यातले अनेकजण क्रेडाईच्या कार्यक्रमातही उपस्थित होते.

मित्रहो, तालकटोरा स्टेडीयममधे,माझ्या देशाच्या गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित युवा मित्रांना सांगितले होते की, नव भारताची उर्जा आणि आवश्यकता या दृष्टीने गृहनिर्माण क्षेत्राला गती द्या.यासाठी गृहनिर्माण,बांधकाम क्षेत्राशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करा असे आवाहन मी केले होते.आपल्या मदतीसाठी, सरकार,आपल्याला सहकार्य करायला सदैव आपल्या समवेत आहे,दोन पावले पुढे जायलाही तयार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे बांधकाम क्षेत्राशी संबंधीत आजची ही परिषद आहे.

देशातल्या गरिबांसाठी लाभदायक ठरू शकेल अशा मजबूत गृहनिर्माण क्षेत्रासाठी तुमची कटीबद्धताही यातून प्रतीत होत आहे.या परिषदेत सहभागी झालेले सदस्य नाविन्यक्षम गृहनिर्माण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन घडवतील किंवा इथे दर्शवण्यात आलेले नवे तंत्रज्ञान आत्मसात करतील आणि हेही अतिशय महत्वाचे आहे.

मित्रहो,देशात शहरांचा वेगाने विस्तार आणि विकास होत आहे अशा पार्श्वभूमीवर ही परिषद किंवा जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान याबाबची आवश्यकता भासत आहे.झपाट्याने नागरीकरण होणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे.वाढत्या शहरीकरणामुळे घरांचीआवश्यकताही तेवढ्याच वेगाने भासत आहे.

मित्रहो, आमच्या सरकारने,गृहनिर्माण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सात सूत्रांचा समावेश असणारे अभियान हाती घेऊन काम केले आहे. स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, अमृत यासारख्या महत्वाच्या योजना लागू केल्या.याच बरोबरीने शहरांच्या वाहतूक क्षेत्रात बदल आणि स्मार्ट सिटी यासारख्या योजनाही सुरु आहेत. हे लक्षात घेऊन वेग-वेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार घरे बांधण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.

मित्रहो, ही आव्हाने लक्षात घेऊन आमच्या सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी एक सर्वंकष दृष्टीकोन घेऊन काम केले.गृह  निर्माण आणि घर खरेदी करणारे अशा दोनही वर्गाला कोणत्या अडचणी येतात हे ध्यानात घेऊनआम्ही काम केले आहे.परवडणाऱ्या  दरातली घरे यावर आम्ही सर्वात जास्त भर दिला.दुसरे स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित कायदे सुधारले.तिसरे म्हणजे आम्ही कौशल्य विकासावर भर दिला आणि चौथे म्हणजे या सर्वांसह आम्ही गृह निर्माण क्षेत्रात तंत्रज्ञान सुधारण्यावरही भर दिला.आजचा हा कार्यक्रम म्हणजे त्याचाच भाग आहे.मला आठवते आहे, प्रगतीच्या एका बैठकीत, आपल्याला माहित असेल प्रगती बैठक म्हणजे काय म्हणून त्याबाबत विस्ताराने सांगत नाही.प्रगतीच्या एका बैठकीत मी मंत्रालयाना जागतिक आव्हाने प्रक्रिया आत्मसात करण्याची सूचना केली होती.मला आनंद आहे की आज जागतिक गृह निर्माण तंत्रज्ञान आव्हान,इंडियाच्या माध्यमातून आपण इथे आला आहात.

मित्रहो, घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत. घर म्हणजे जिथे स्वप्नांना बळ मिळते आणिआकांक्षांची पूर्तता होते.घर म्हणजे ज्याप्रमाणे निवारा आहे तसेच ते प्रतिष्ठा आणि सुरक्षेशी जोडले गेले आहे.आपल्या देशात अनेक लोकांकडे स्वतःचे घर नाही हे पाहून मला दुःख झाले आणि धक्काही बसला. प्रधान मंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या पारीस्थितीवर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे पक्के घर असावे हे माझे स्वप्न आहे.या दिशेने आमचे काम सुरु आहे. आमच्या सत्ताकाळात 1.3 कोटी घरे निर्माण झाली आहेत. तुम्हाला  कल्पना यावी म्हणून सांगतो,

आधीच्या सरकारने केवळ 25 लाख घरे बांधली.हा आकडा स्वतः निदर्शक आहे.केवळ चार भिंती बांधून आमचे काम थांबले नाही.पाणी, वीज जोडणी,उज्वला जोडणी आणि याप्रमाणे इतर सुविधा युक्त घरे आम्ही पुरवत आहोत.घरांचा दर्जा आणि जागा यातही गेल्या साडेचार वर्षात सुधारणा झाली आहे.मात्र अद्यापही बरेच काही करायचे बाकी आहे म्हणून  मी खाजगी क्षेत्राची मदत घेत आहे.  हे करण्यासाठी जागतिक गृह निर्माण आव्हाने यापेक्षा चांगले काय असू शकते. चला एकत्र काम करू या,आपल्या  क्षमतांचा विस्तार करू या आणि गरिबांच्या मदतीसाठी कार्य करू या.

मित्रहो,आपल्या देशात गरीब आणि मध्यम वर्गाचे स्वतःच्या घराचे स्वप्न दूर होत चालले आहे  ही स्थिती योग्य नाही.ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही एकाच वेळी  अनेक स्तरावर काम केले. गरीब आणि सामान्य मध्यम वर्गाला घर खरेदी करण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या एक एक करून सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहिला. आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे गृह कर्ज दर आधीच्या तुलनेत कमी झाले आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सरकार ज्या सवलती देत आहे त्यामुळे लोकांची 5 ते 6 लाख रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे.कोणी 19-20 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षासाठी घेतले असेल तर सरकारच्या योजनेमुळे त्याचे 5 ते 6 लाख रुपये थेट वाचतील हे नक्की. याजनेची माहिती संबंधित मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मित्रहो,

आमच्या सरकारने प्राप्ती कराशी संबंधित नियमात बदल केले जेणेकरून गरीब आणि मध्यम वर्गाकडे घर खरेदीसाठी जास्त पैसे वाचतील आणि घराच्या किमतीही कमी होतील.सरकार आणि वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकतेच हे दोन मोठे निर्णय घेतले. प्राप्ती कराबाबत म्हणाल तर 5 लाख रुपयांपर्यंतच्या  कर पात्र उत्पन्नावर कर शून्य करण्यात आला.याशिवाय दोन घरे असतील तर अनुमानित घरभाड्यावर आता प्राप्ती कर द्यावा लागणार नाही.याशिवाय भांडवली करातून सूट,आता एका ऐवजी दोन घरांसाठी मिळणार आहे.हे सर्व प्रयत्न,मध्यम वर्गाला नवे घर घेण्यासाठी प्रोत्साहन देणारे आहेत.ज्याचा थेट लाभ आपल्या व्यवसायासाठी नक्कीच होणार आहे.त्यासाठी तर टाळ्या मिळू शकतात.

मित्रहो, वस्तू आणि सेवा करानेही स्थावर मालमत्ता कारभारासाठी,विकासक आणि ग्राहक दोन्हींसाठी काम  सोपे केले आहे.बांधकाम क्षेत्रावरचा वस्तू आणि सेवा कर नुकताच खूप कमी करण्यात आला आहे.परवडणाऱ्या घरांवरचा वस्तू आणि सेवा कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.मध्यम वर्गासाठी निर्माण होणाऱ्या घरांना निधीचा तुटवडा भासू नये यासाठी परवडणाऱ्या गृहनिर्मितीसाठी  निधीही निर्माण करण्यात आला आहे.

मित्रहो,घरांची अधिक निर्मिती करण्यासाठी आणि उत्तम घरांसाठी गृह निर्माण क्षेत्राच्या सूचनांची दखल  घेतली गेली पाहिजे.आम्ही हे करत आहोत.गृहनिर्मिती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि हे क्षेत्र  बळकट करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.रेरा ते व्यवसाय सुलभता आम्ही सातत्याने पद्धतशीर सुधारणांवर लक्ष केंद्रित केले आहे.रेरामुळे ग्राहकांचा,विकासकावरचा विश्वास वाढला त्याचबरोबर स्थावर मालमत्ता क्षेत्रात पारदर्शकताही आणली.व्यवसाय सुलभतेत भारताने 181 व्या क्रमांकावरून 52 व्या स्थानापर्यंत झेप घेतली.

मित्रहो,सरकारच्या धोरणामुळे आपणाला आणखी एक मदत मिळणार आहे. विशेष करून ग्रामीण भागात मनुष्य संसाधन मोठ्या  प्रमाणात  विकसित होऊन एकत्र आले आहे ज्याला गृह निर्मितीच्या तंत्राबाबत माहिती आहे प्रशिक्षित आहे.आमच्या सरकारने महिलांच्या प्रशिक्षणासाठीही एक अभियान चालवले आहे.या प्रशिक्षणानंतर हजारो महिला मिस्त्री म्हणून काम करत आहेत.

या क्षेत्रात युवा वर्गाचे तांत्रिक कौशल्य विकसित करून त्यांना तयार करण्यात यावे ज्यामुळे आपल्यासारख्या उद्योजकांनाही लाभ व्हावा आणि युवा वर्गालाही रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आमचा प्रयत्न आहे.याशिवाय,वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयक पाठ्यक्रमात बदल व्हावा या दिशेनेही काम करण्यात येत आहे. याशिवाय स्टार्ट अप्स आणि युवा उद्योजकासाठीही  हे क्षेत्र नवा पर्याय म्हणून पुढे येत आहे.    

मित्रहो,भारतात बांधकाम  क्षेत्राच्या दृष्टीकोनात आम्ही एक बदल केला आहे.रस्ते असू देत,निवासी इमारती असु देत,वाणिज्यिक इमारती असू देत या सर्वांसाठी पर्यावरण स्नेही,आपत्तीला तोंड देण्याची क्षमता असणाऱ्या आणि उर्जा बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या बांधकामासाठी  प्रोत्साहन दिले जात आहे.यासाठी स्थानिक कल्पकतेची आवश्यकता आहे ज्यामध्ये आमचे युवा मित्र काम करत आहेत.

मित्रहो, आपल्याला ऐकून आनंद होईल की आशा इंडिया म्हणजे अफोर्डेबल सस्टेनेबल हाउसिंग अक्सिलेटर अशा प्रकारच्या  कल्पकता  बाजारपेठेच्या हिशेबात बसवू लागले आहे.आशा, जीएचटीसी-इंडियाचा भाग आहे.यात मुंबई,मद्रास,खडकपूर,रुरकी आयआयटी  चार इनक्युबेशन केंद्रावर काम करत आहेत.युवा उद्योजक आणि इको सिस्टीम कल्पनांना बाजाराच्या दृष्टीने उपयोगी बनवण्याच्या दिशेने वेगाने काम सुरु आहे.

मित्रहो,अशा प्रकारची नाविन्यता,तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या बाबत काम करणारे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत हे जाणून मला आनंद झाला.इथे होणारी चर्चा राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क वर उपलब्ध करून दिली जाईल ज्याचा शिक्षण संस्थाना लाभ होऊ शकेल.इथे ज्या आव्हानांवर चर्चा होईल त्यावर तोडगा काढण्यासाठी या नेटवर्कच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थानांही संधी दिली जाईल.

आपण सर्व जण गृह निर्माण  तंत्रज्ञान विषयक भारतात होणाऱ्या या अद्‌भूत प्रयोगाचा भाग  व्हावे यासाठी लाईट हाउस प्रोजेक्ट सुरु करण्यात येत आहे. गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश मधे सुरु होत असलेल्या या प्रकल्पात बांधकामाच्या नव्या तंत्राचे दर्शन घडवू शकतो.आपल्यासाठी ही साक्षात प्रयोगशाळा आहे.इथे आपण वेबकास्ट प्रात्यक्षिक यासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या युवा व्यावसायिकासमवेत संवाद साधू शकतो.  

मित्रहो,जीएचटीसी-इंडिया एक असा मंच आहे ज्याच्या माध्यमातून भारताचे बांधकाम क्षेत्र इको सिस्टम, आंतरराष्ट्रीय दर्जाची होऊ शकते.या माध्यमातून आपल्या समस्यांवर जागतिक उपाय आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

आपला उत्साह पाहून मी सांगू शकतो की ही बांधकाम क्षेत्राच्या क्रांतीची सुरवात आहे,आपल्या शहरांचे बांधकाम क्षेत्र जागतिक तोडीचे बनवण्याच्या दिशेने आपण आगेकूच करणार आहोत.

मित्रहो, या परिषदेमुळे भारताचा लाभ तर होईलच त्याच बरोबर जगभरातले बांधकाम व्यावसायिक,वस्तू रचनाकार आणि जागतिक सिव्हील इंजिनियरींग फर्म यानाही  याचा फायदा होणार आहे.आपण एकमेकांकडून खूप काही शिकणार आहोत.

मित्रहो, नव भारताच्या नव्या व्यवसाय वातावरणात आपल्या क्षेत्रासाठी अनेक संधी आहेत.देशात नव मध्यम वर्ग वेगाने वाढत आहे.घरांची मागणी वेगाने वाढत आहे अशा मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

आपल्याला ही मागणी पूर्ण करता यावी बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी एप्रिल 2019 ते मार्च 2020 हे वर्ष बांधकाम तंत्रज्ञान वर्ष म्हणून जाहीर करतो.

मित्रहो, इथे एका नकाशा पुस्तिकेचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली.परिस्थती कशी बदलते पहा,आपल्याला आश्चर्य वाटेल,आपल्या देशात आपत्तीशी संबंधित विषय कृषीखात्यात येत असत.अनेक वर्षे हा विषय कृषी विभागाचा भाग होता कारण आपल्या इथे आपत्ती म्हणजे पूर आणि दुष्काळ एवढ्यावरच सीमित होती आणि म्हणूनच कृषी विभागाचे लोक याकडे लक्ष देत असत गुजरातमध्ये 2001 मधे  भूकंप आल्यानंतर लक्षात आले की, हे मोठे आव्हान आहे,त्यानंतर हा महत्वाचा विभाग तिथून काढून गृहमंत्रालयाकडे आणण्यात आला जे राज्यांशी समन्वय राखते. हे मोठे स्थित्यंतर होते जे अटलजी सरकारच्या काळात केले गेले. गुजरातमध्ये 2001 मधे भूकंप आला तेव्हा, या गोष्टी घडल्यानंतर आपण काही कृती करणार त्याऐवजी त्या घडण्यापूर्वीच आपण देशाला यासाठी सज्ज ठेवले पाहिजे.

गुजरातमध्ये प्रथम जिल्हा स्तरावर अशा आपत्ती येण्याची शक्यता असणारे भाग,त्याचे वेग-वेगळे प्रकार.असे वेग-वेगळे नकाशे जिल्हा निहाय आणि ग्राम नकाशे तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.भारत सरकारने हा विषय, विभागवार केला,हिंदुस्तानच्या प्रत्येक भागात, केवळ बांधकाम क्षेत्राशी संबंधित इमारतीच नव्हे तर अगदी पाईप लाईन टाकतानाही हा नकाशा लक्षात घेऊनच  हे काम करावे  असे मला वाटते. सरकारनेही निविदा प्रक्रियेत याचा संदर्भ आणायला हवा की  आपण या नकाशाचा अभ्यास केला आहे.जिथे आपण काम करणार आहात, या नकाशात ज्या गोष्टी दर्शवल्या आहेत त्यांची दखल आपण कशी घेणार आहात.याच प्रकारे या आधारावर त्या त्या भागात जी विद्यापीठे असतील,नियोजन केले असेल तरअभियांत्रिकी असो,वास्तुरचना असो त्या भागात या विषयांच्या अभ्यासक्रमात या भागाची आपत्ती प्रवणता लक्षात घेऊन तो तयार करावा त्यामुळे तिथे जे मनुष्य बळ विकसित होईल, जे मुख्यतः त्याच भागात काम करेल,त्यांना माहित होईल की माझ्या या भागात ही आव्हाने आहेत,तर हे लक्षात घेऊन बांधकाम जगात  मला काम करावे लागेल.

म्हणूनच माझी सूचना आहे की,  आपण सर्व आपापल्या कंपनीचे आपण सर्व तज्ञ आहात,एका नकाशावर दोन-दोन दिवसाच्या कार्यशाळा करायला हव्यात. नकाशा समजून घेणे, त्याच्याशी सबंधित काय बाबी आहेत हे पाहणे,कारण या बाबी लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे,मग भारताची काय ताकद आहे ते पहा. अनेक बाबी आहेत ज्याकडे आपल्या देशाचे कमी लक्ष जाते. आपण बांधकाम क्षेत्रातले लोक आहात,दीर्घ काळासाठी उत्तम बांधकाम कसे करावे यात निपुण आहात,मात्र ज्यांनी या वेळेचा कुंभ पहिला असेल त्यांना माहित असेल की मेक शिफ्ट व्यवस्था किती उत्तम केली जाते,किती तंत्रज्ञान आधारित केली जाऊ शकते, या देशाने हे सिध्द करून दाखवले.

गंगा नदीच्या किनारी 40 दिवसात 22 कोटीपेक्षा जास्त लोक जमले होते. प्रत्येक दिवशी गंगा किनारी युरोप मधल्या एका देशा इतके लोक एकत्र येत होते, तिथे स्वच्छता इतकी उत्तम असू शकते हे आपल्या देशाने दाखवून दिले.एवढेच नव्हे तर स्मार्ट सिटीची जी संकल्पना आहे, स्मार्ट सिटीद्वारे, तंत्रज्ञानाद्वारे,मध्यवर्ती नियंत्रण यंत्रणा कशी काम करते हे संपूर्ण कुंभ मेळ्यात आपल्या युवा वर्गाने दाखवून दिले आहे. म्हणजे आपल्या देशात ही क्षमता आहे, आपण त्याकडे लक्ष दिले,आपले लोक कोणत्या प्रकारची व्यवस्था विकसित करू शकतात हे पाहिले.जर मेक शिफ्ट व्यवस्था इतकी उत्तम असेल तर कायमस्वरूपी व्यवस्था तर कदाचित जगभरात एक मॉडेल ठरू शकते. दोन दिवसांचे हे मंथन अशा गोष्टी पुढे आणेल ज्या आपल्या कंपनीची स्थिती सुधारतील,याचा मला आनंदच आहे. मात्र या क्षेत्राचीही स्थिती सुधारावी, त्यात नवी ताकद यावी,नवी गती यावी,नाविन्यता यावी हे ही आवश्यक आहे. आपण  हे लक्षात घ्या की हिंदुस्तान जे काही करेल , त्याकडे जग लक्षपूर्वक पाहत आहे.या देशाची ताकद आहे, जी शब्दकोशातल्या शब्दांचे अर्थ बदलते.अभिनंदन याचा इंग्रजीमधे अर्थ होता कॉन्ग्रेच्युलेशन आता अभिनंदनचा अर्थ बदलेल.ही ताकद या देशात आहे.

चला या हातांवर विश्वास करत एक पराक्रमी राष्ट्र या रूपाने आगेकूच करायची आहे आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध,वेळेच्या मर्यादेत एकामागोमाग एक पाऊले उचलायची आहेत,सरकार आपल्या समवेत आहे.

या परिषदेसाठी आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा.

खूप-खूप धन्यवाद !

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1568516) Visitor Counter : 164


Read this release in: English