पंतप्रधान कार्यालय

वाराणसी येथे राष्ट्रीय महिला उपजिविका मेळाव्याला पंतप्रधानांची उपस्थिती

Posted On: 08 MAR 2019 4:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 मार्च 2019

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी येथील दीनदयाळ हस्तकला संकुलात झालेल्या राष्ट्रीय महिला उपजिविका मेळा 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

उत्तर प्रदेश ग्रामीण उपजिविका अभियानाअंतर्गत मदत करण्यात येत असलेल्या स्वयं सहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली. इलेक्ट्रीक चक्र, सौर चक्र यांचे वाटप पंतप्रधानांनी केले. यावेळी पाच महिला बचत गटांना प्रशस्तीपत्रही प्रदान करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना, एनआरएलएम-उत्तर प्रदेश यांचे सहाय्य लाभलेल्या विविध महिला बचत गटांनी ‘भारत के वीर’ निधीसाठी योगदान म्हणून 21 लाख रुपयांचा धनादेश पंतप्रधानांकडे सुपूर्द केला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांप्रती आदरभावना व्यक्त करत नव भारताच्या निर्मितीत महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 75 हजार ठिकाणांहून 65 लाख महिला, व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे यात सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. वाराणसी हे महिला सशक्तीकरणाचे झळाळले उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

महिला सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे. आरोग्य, पोषण, स्वच्छता, शिक्षण, कौशल्य विकास, स्वयं रोजगार, नव्या गॅस जोडण्या यासह महिला आणि मुली यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला. सहा महिन्यांची प्रसूती रजा हे आपल्या सरकारने केलेले उत्तम काम असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या योजनांत महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. आतापर्यंत 15 कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज देण्यात आले असून त्यापैकी 11 कोटी रुपये महिलांना देण्यात आले आहेत.

महिला बचत गटांनी केलेल्या उत्तम कार्याची प्रशंसा करतानाच त्यांचे कार्य केवळ त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीच नव्हे तर देशाच्या विकासासाठीही मोलाचे ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. उत्तम बँक कर्ज आणि सहकार्य करणारी यंत्रणा या दृष्टीने केंद्र सरकार, महिला बचत गटांना नवं चैतन्य देत असल्याचे ते म्हणाले. देशात सध्या सुमारे 50 लाख महिला बचत गट असून यात सहा कोटी महिलांचा सहभाग आहे. प्रत्येक कुटुंबातील किमान एक महिला सदस्य तरी बचत गटाशी जोडली जावो असे सरकारचे उद्दिष्ट आहे. महिला बचत गटांनी नाविन्यतेला वाव द्यावे आणि बाजारपेठेविषयी जाणून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. या बचत गटांनी त्यांच्या उत्पादनाची सरकारला विक्री करण्यासाठी जीईएम पोर्टलचा वापर करावा असे ते म्हणाले. बचत गटांनी त्यांना वाव असणाऱ्या नवनव्या क्षेत्रात प्रवेश करावा असे पंतप्रधानांनी सांगितले.

वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि आयुष्मान भारत योजनेचे लाभ त्यांनी उपस्थितांना सांगितले.

वाराणसी येथे महिला बचत गटाच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1568272) Visitor Counter : 70


Read this release in: English