पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री श्रम योगी योजनेचा शुभारंभ

Posted On: 05 MAR 2019 6:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या वस्त्राल येथे प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा शुभारंभ केला. यावेळी निवडक लाभार्थींना पंतप्रधानांनी या योजनेतील निवृत्ती वेतन कार्डाचे वितरण केले. देशभरातल्या 3 लाख सामान्य सेवा केंद्रात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे 2 कोटी कामगारांनी हा शुभारंभाचा कार्यक्रम पाहिला.

आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून पंतप्रधानांनी ही योजना देशातल्या असंघटीत क्षेत्रातल्या 42 कोटी कामगारांना समर्पित केली. या योजनेमुळे असंघटीत क्षेत्रातल्या नोंदणी केलेल्या कामगारांना वृद्धापकाळात 3000 रुपये निश्चित निवृत्ती वेतन मिळेल असे पंतप्रधान म्हणाले. असंघटीत क्षेत्रातल्या करोडो कामगारांसाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशी योजना आखण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेच्या फायद्यांची विस्तृत माहिती दिली. लाभधारकाने दिलेल्या योगदानाएवढीच रक्कम केंद्र सरकार भरणार असल्याचे ते म्हणाले. असंघटीत क्षेत्रातल्या दरमहा 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कामगारांनी नजीकच्या सामान्य सेवा केंद्रात लाभार्थी म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, अशी खात्री देत, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती देऊन केवळ एक अर्ज भरावयाचा आहे, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले. सामान्य सेवा केंद्रात नोंदणीसाठी लागणारा खर्च केंद्र सरकार करणार असून हा डिजिटल इंडियाचा चमत्कार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

नागरिकांनी त्यांच्या घरात किंवा परिसरातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची या योजनेत नोंदणी व्हावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. समाजाच्या सधन वर्गातील लोकांच्या या कृतीचा गरीबांना मोठा फायदा होईल असेही ते म्हणाले. श्रमाच्या प्रतिष्ठेला मान देणे देशाला प्रगती पथावर नेईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, पीएम आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना आणि स्वच्छ भारत योजना यांसारख्या विविध योजना असंघटीत क्षेत्रातील कामगारांना विशेष लक्ष्य करून सुरू केल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशातल्या महिला आणि मुलींच्या सबलीकरणासाठी सरकारने उचललेल्या पावलांचाही त्यांनी उल्लेख केला.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना तसेच आयुष्मान भारत अंतर्गत पुरवण्यात आलेल्या आरोग्य कवच तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांमुळे असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात सर्वंकष सुरक्षा कवच मिळाले आहे.

भ्रष्टाचाराविरुद्धच्या कठोर धोरणाचा पुनरूच्चार करून पंतप्रधान म्हणाले की, दलाल आणि भ्रष्टाचार यांचे उच्चाटन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पंतप्रधान नेहमीच दक्ष असतात असेही ते म्हणाले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1567542) Visitor Counter : 143


Read this release in: English