कोळसा मंत्रालय

जगातील सर्वात मोठ्या निवृत्ती वेतन योजनेचा आज भारतात झाला प्रारंभ-केंद्रीय मंत्री पियूष गोयल


असंघटीत क्षेत्रातील सुमारे 42 कोटी कामगारांचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत समावेश-पियूष गोयल

प्रविष्टि तिथि: 05 MAR 2019 5:35PM by PIB Mumbai

 

मुंबई, 5 मार्च 2019

 

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही जगातील सर्वात मोठी निवृत्ती वेतन योजना असल्याचे रेल्वे आणि खाण मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. असंघटीत क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पादनात मोठे योगदान असले तरी हे क्षेत्र दुर्लक्षित राहिले असल्याचे गोयल म्हणाले. या क्षेत्रातील लोकांची व्यथा जाणून घेतल्यानेच सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केल्याचे ते म्हणाले.

या योजनेच्या मुंबईतील शुभारंभप्रसंगी ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला.

ज्या तत्परतेने ही योजना कार्यान्वित करण्यात आली त्यावरुन असंघटीत क्षेत्रातल्या गरजूंपर्यंत पोहोचण्याची सरकारची तयारी दिसून येते असे गोयल म्हणाले. 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आणि 15 फेब्रुवारी 2019 एवढ्या कमी कालावधीत या योजनेसाठी नोंदणी सुरू झाल्याची गोयल म्हणाले.

असंघटीत क्षेत्रात सुमारे 42 कोटी कामगार असून त्यातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त कामगारांपर्यंत ही योजना पोहोचवावी, असे आवाहन करून गोयल म्हणाले की, यामुळे या योजनेचा अधिकाधिक लाभार्थींना लाभ घेता येईल.

नागरिकांनी आपल्या घरात किंवा आसपास काम करणाऱ्यांची या योजनेत नोंदणी करावी आणि त्यांचे या योजनेतील वर्गणी भरावी, असे आवाहन गोयल यांनी केले. आपल्याकडे काम करणाऱ्यांची वर्गणी आपण भरणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या योजनेचे कौतुक केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले.

महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाख 86 हजार 487 लोकांनी या योजनेत नाव नोंदणी केली असून महाराष्ट्र याबाबत प्रथम क्रमांकावर असल्याचे राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. असंघटीत क्षेत्राचा निवृत्ती वेतन योजनेत समावेश करावा ही अनेक वर्ष प्रलंबित मागणी या योजनेमुळे पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातल्या 25 लाभार्थ्यांना या योजनेचे कार्ड देण्यात आले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1567533) आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English