पंतप्रधान कार्यालय

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमधे पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

Posted On: 02 MAR 2019 11:51PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मार्च 2019

 

नव भारत, स्मार्ट इंडियाचा संकल्प सिध्द करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपणा सर्व युवा मित्रांचे खूप-खूप अभिनंदन !

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्वांशी संवाद साधण्याची ही तिसरी वेळ आहे.2017 मधे आम्ही हे अभियान सुरु केल्यापासून त्याचा सतत विस्तार होत आहे.

मित्रहो, नाविन्यतेविषयी राष्ट्रीय स्तरावर होणारे सर्वात खुले मॉंडेल म्हणून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन पुढे येत आहे ज्या मंचावर उद्योग,शिक्षण संस्था,सरकारी एजन्सी, व्यावसायिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येऊन एकमेकांसमवेत काम करत आहेत.30 हजार विद्यार्थ्यांपासून सुरु झालेले हे हॅकेथॉन आता 2 लाखा पर्यंत पोहोचले आहे.आमचे प्रयत्न योग्य आहेत आणि योग्य दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत हे मी आज म्हणू शकतो.    

मित्रहो, आतापर्यंत जी दोन हॅकेथॉन झाली होती, त्यातून अनेक नाविन्यपूर्ण कल्पना समोर आल्या.यात पहिल्यांदा केवळ सरकारशी संबंधित, सरकारी संस्थांशी संबंधित समस्यांचा समावेश करण्यात आला मात्र या वेळी उद्योग क्षेत्रानेही आपल्या समस्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत. 

 यामुळे आपल्या प्रयत्नांना निश्चितच व्यापक रूप प्राप्त होणार आहे आणि एक कल्पक आणि नाविन्यतापूर्ण  कल्पनांचा धनी म्हणून आपणाला बाजारपेठेत अधिक ओळख मिळेल.मित्रहो, आपली अर्थव्यवस्था एका नव्या मार्गावरून घोडदौड करत आहे.ज्या नव भारताच्या उभारणीसाठी आपण  सर्व प्रयत्न करत आहोत तो,नाविन्यता आणि स्टार्ट अप मधे आपला झेंडा फडकावत आहे.

जागतिक नाविन्यता निर्देशांकात आपण आज 57 व्या स्थानावर आहोत,2014 मधे आपला क्रमांक 81 होता.म्हणजेच चार वर्षात 24 स्थानांची झेप.आपल्याला इथेच थांबायचे नाही तर लवकरच आपल्याला सर्वोच्च 25 मधे पोहोचायचे आहे.भारत आज जगातले तिसरे स्टार्ट अप राष्ट्र आहे.गेल्या तीन-चार वर्षात 15 हजार पेक्षा जास्त स्टार्ट अपना मान्यता देण्यात आली आहे.हे केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित नाही तर साधारणतः देशातल्या  प्रत्येक जिल्ह्यात हे स्टार्ट अप आहेत.महत्वाची गोष्ट म्हणजे जे नवे स्टार्ट अप सुरु झाले आहेत त्यापैकी निम्मे,देशातल्या छोट्या-छोट्या शहरातले आहेत.

याच प्रमाणे देशातल्या सुमारे दीडशे तंत्रज्ञान व्यापार इनक्युबेटर मधे तीन वर्षापूर्वी स्टार्ट अप ची संख्या 1600 होती  ती या वर्षात 3 हजार पर्यंत पोहोचली आहे.म्हणजे दुप्पट वाढ.मित्रहो,नाविन्यता आणि स्टार्ट अप साठी जे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे त्यामागे,काही ठोस प्रयत्न आहेत.

अटल इनक्युबेशन अभियानाचा आपणा सर्वाना चांगला परिचय आहेच.देशातल्या 5 हजारपेक्षा जास्त शाळात,अटल टिंकरिंग प्र्योगशाळा काम करत आहेत,जिथे सहाव्या इयत्तेतले विद्यार्थी भावी तंत्रज्ञानाशी थेट परिचित होत आहेत.

मित्रहो,प्रशासन आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित जी आव्हाने आपणा समोर ठेवण्यात आली आहेत त्याच्या बरोबरीने मी माझ्याकडूनही एक दोन मुद्दे उपस्थित करू इच्छितो.

बालकांशी संबंधित अपराध, महिलांशी संबंधित अपराध हे मोठे आव्हान आहे.एका उत्तम समाजाच्या निर्मितीसाठी याचा निपटारा आवश्यक आहे.आपण अशा तांत्रिक तोडग्यासाठी विचार करू शकता का ज्याद्वारे घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत मुलावर लक्ष ठेवणारी एक एकात्मिक यंत्रणा निर्माण करता येईल. ज्यामध्ये घर आणि शाळा याबरोबरच स्थानिक पोलीस ठाणे आणि गस्ती वाहनही वेळ पडल्यास सतर्क होऊ शकेल.सर्वसामान्य कुटुंबेही वापर  करू शकतील अशी एकात्मिक आणि स्मार्ट यंत्रणा, देश आणि समाजासाठी उपयुक्त ठरेल.

याच प्रकारे रस्त्यावर किंवा गल्लीत भाजी-फळे विकणाऱ्यासाठी असा तांत्रिक तोडगा किंवा ई बाजारपेठ सारखे स्थान विकसित करता येईल का ?.. ज्यामध्ये अगदी स्थानिक स्तरावर वस्तू घरपोच करणारी यंत्रणा निर्माण करता येईल.

मित्रहो,

स्मार्ट हॅकेथॉनकडे केवळ वर्षातून होणारा एक कार्यक्रम या दृष्टीने पाहण्याऐवजी एक निरंतर प्रक्रिया म्हणून पाहावे लागेल.हे पूर्ण वर्षभर सुरु राहावे, ज्यामुळे कोणताही उद्योग किंवा विभाग आपली समस्या पोस्ट करेल,त्यावर एखादा पुरस्कार जाहीर करेल.आपल्या सारखे अनेक युवा मित्र या समस्येबाबत विचार करून त्यावर उत्तरही शोधतील असा मला विश्वास आहे.   

आपणा सर्वांवर,देशाच्या माझ्या एक-एक युवा मित्रावर माझा पूर्ण विश्वास आहे.आपण सर्व नव भारताच्या नव्या आत्मविश्वासाचे आधारस्तंभ आहात.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1567504) Visitor Counter : 52


Read this release in: English