पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते कन्याकुमारी येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ

Posted On: 01 MAR 2019 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मदुराई ते चेन्नई दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. कन्याकुमारी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी रामेश्वरम ते धनुषकोडीला जोडणारी रेल्वे पुनर्स्थापित करणाऱ्या प्रकल्पाचे तसेच पम्बन पुलाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजन केले. यावेळी पंतप्रधानांनी काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्‌घाटन केले.

तामिळनाडूतील धाडसी विंग कमांडर अभिनंदन याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, असे पंतप्रधानांनी जाहीर सभेला संबोधित करतांना सांगितले.

काही दिवसापूर्वी गांधी शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी विवेकानंद केंद्राचे अभिनंदनही केले.

तेजस एक्स्प्रेसही अत्याधुनिक रेल्वे गाड्यांपैकी एक असून, मेक इन इंडियाचे गौरवशाली उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

1964 च्या आपत्तीनंतर रामेश्वरम-धनुषकोडी रेल्वे मार्गाचे नुकसान झाले होते, मात्र 50 वर्षांहून अधिक काळ या रेल्वे मार्गाकडे कोणतेही लक्ष पुरवण्यात आले नाही. उशिरा का होईना यावर काम सुरु झाले आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान किसान सम्मान निधीचा एक भाग म्हणून 1.1 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. असे त्यांनी सांगितले. 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेली ही योजना त्याच महिन्यात प्रत्यक्षात उतरली, असे ते म्हणाले. ही योजना सुरु व्हावी म्हणून 24 दिवसात आम्ही अथक 24 तास काम केले, असे त्यांनी सांगितले. श्रमयोगी शेतकऱ्यांना 10 वर्षात साडेसात लाख कोटी रुपये मिळायला हवे होते, असेही ते म्हणाले.

लोकांना सरकारकडून प्रामाणिकपणा, विकास, प्रगती, संधी आणि सुरक्षितता हवी आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

संरक्षण आणि सुरक्षेबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारत अनेक वर्ष दहशतवादाच्या संकटाशी सामना करत आहे. मात्र आता भारत दहशतवादासंदर्भात असहाय्य नाही आणि हा मोठा बदल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा नवा भारत, दहशतवाद्यांनी केलेले नुकसान व्याजासहित परत करेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा यासंदर्भात आपण प्रथम भारतीय आणि भारतीयच आहोत, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराविरोधात केंद्र सरकारने उचललेल्या पावलांविषयी पंतप्रधानांनी विस्तृत माहिती दिली.

 

 

B.Gokhale/J.Patankar/D. Rane

 



(Release ID: 1567069) Visitor Counter : 167


Read this release in: English