संरक्षण मंत्रालय

सध्याच्या सुरक्षा परिस्थितीविषयी भारतीय सशस्त्र दलांचे निवेदन

Posted On: 28 FEB 2019 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

भारतीय हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल रवी कपूर, भारतीय लष्कराचे मेजर जनरल सुरींदर महल आणि भारतीय नौदलाचे रिअर ॲडमिरल डी.एस.गुजराल यांनी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीविषयी भारतीय सशस्त्र दलाने जारी केलेली निवेदने –

भारतीय हवाई दल

27 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला भारतीय हवाई दलाच्या रडारनी पाकिस्तानी हवाई दलाची मोठी तुकडी भारतीय हद्दीतल्या झांगरकडे येतांना टिपली. या विमानांनी सुंदरबनी भागात राजौरीच्या पश्चिमेला भारतीय हवाई क्षेत्राचा भंग केला.

विमाने विविध स्तरावर दिसून आले. भारतीय हवाई दलाच्या मिग-21 बायसन, एसओ-30 एमकेआय, मिराज-2000 विमानांवर पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानाला अडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

लष्करी ठिकाणांचा लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विमानांना भारतीय हवाई दलाच्या विमानांनी रोखल्याने त्यांच्या योजना अयशस्वी ठरल्या. पाकिस्तानी हवाई दलाचे बॉम्ब भारतीय लष्कराच्या कम्पाऊंडमध्ये पडले, तरी आपल्या लष्करी ठिकाणांचे कोणतेही नुकसान हे बॉम्ब करु शकले नाहीत.

यानंतर झालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानी हवाईदलाचे एक एफ-16 विमान भारताच्या मिग-21 बायसन विमानाने लक्ष्य बनवले. हे एफ-16 विमान नियंत्रण रेषेच्या पलिकडे पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये कोसळले.

या कारवाईत भारताने एक मिग-21 विमान गमावले. या विमानाचा वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने सुखरुप विमानाबाहेर पडला, तरी त्याचे पॅराशूट पाक व्याप्त काश्मीरमध्ये भरकटले आणि तिथे त्याला पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले.

पाकिस्तानने केलेल्या निवेदनात अनेक विधाने वस्तुस्थितीला धरुन नसलेली आहेत.

  1. भारतीय हवाई दलाची 2 विमाने पाकिस्तानाने पाडली आणि 3 वैमानिक ही पडले अशी पहिली चुकीची माहिती पाकिस्तानने सर्वप्रथम दिली. त्यानंतर हा आकडा 2 विमाने आणि 2 वैमानिक असा केला. मात्र सत्य असे आहे की, भारतीय लष्कराच्या दलांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये 2 पॅराशूट पडतांना पाहिली होती, जी भारताच्या मिग-21 बायसन विमानाने पाडलेल्या एफ-16 विमानातील दोन वैमानिकांची होती. पाकिस्तानने संध्याकाळी विधान बदलत सांगितले की एक भारतीय वैमानिक त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच संध्याकाळी उशिरा पाकिस्तानने हे सत्य स्वीकारले.
  2. जिथे मानवी वस्ती किंवा लष्करी ठिकाणे नाहीत, अशा मोकळ्या जागेत जाणून-बुजून हत्यारे टाकल्याचा दुसरा दावा पाकिस्तानने केला. मात्र पाकिस्तानी विमानांनी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले हे सत्य आहे. भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी विमानांना रोखून त्यांची योजना धुळीला मिळवली. जरी पाकिस्तानी बॉम्ब भारतीय लष्करी ठिकाणांच्या आवारात पडले, तरी हवाई दलाच्या त्वरील उत्तरामुळे कोणतही लक्षणीय नुकसान झाले नाही.
  3. या कारवाईत एफ-16 विमानाचा वापर न केल्याचे तसेच भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे कोणतही विमान पाडले नसल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. पण या कारवाईत एफ-16 विमानाचा वापर केला होता आणि पाकिस्तान हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हवेतून हवेत मारा करणाऱ्या ॲमरॅम क्षेपणास्त्राचा काही भाग भारताच्या हद्दीत राजौरी जवळ हाती लागला आहे. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-16 विमानातच तैनात असते. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या मिग-21 बायसन विमानाने पाकिस्तानचे एक एफ-16 विमान पाडले हे सत्य कायम राहते.
  4. विंग कमांडर अभिनंदन यांना उद्या भारताच्या हवाली करण्यात येईल, अशी घोषणा पाकिस्तानने केल्याचे वृत्त नुकतच भारतीय हवाई दलाला समजले आहे. हवाई दल अभिनंदन यांच्या परत येण्याची वाट पहात आहे.

 

भारतीय लष्कर

भारतीय हवाई दलाच्या दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईचे पडसाद म्हणून पाकिस्तानी सैन्याने सुंदरबनी, भिमबर गली, नौशेरा आणि कृष्णा घाटी भागात 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता आणि परत रात्रीच्या वेळी शस्त्रसंधीचे जाणून-बुजून उल्लंघन केले. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितल्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने जम्मू-काश्मीर मधल्या सैन्यदलाच्या तळांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण रेषेजवळ असलेली उच्च दर्जाची सज्जता आणि भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचे मनसुबे धुळीला मिळाले.

नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषा भागात आम्ही सतर्क आहोत, काही ठिकाणी रणगाडेही सिद्ध ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानने आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पुर्णत: सिद्ध आहोत. सध्याच्या परिस्थितीतही या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी भारतीय लष्कर कटिबद्ध असून, भारत आणि आमच्या देशवासियांविरुद्धचे कोणतेही मनसुबे हाणून पाडण्यासाठी आम्ही कार्य करत राहू.

भारतीय नौदल

सागरी क्षेत्रात पाकिस्तानचे मनसुब्यांचा पराभव करण्यासाठी सागरी पृष्ठभाग, समुद्राच्या पाण्याखाली तसेच हवाई क्षेत्रात भारतीय नौदल संपूर्णत: सज्ज आहे. जेव्हा गरज पडेल, तेव्हा तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिले जाईल, याची शाश्वती देतो. देश आणि देशवासियांची सुरक्षा आणि रक्षणासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल एकत्र उभ आहे.

 

 

S.Tupe/J.Patankar/D. Rane



(Release ID: 1566953) Visitor Counter : 86


Read this release in: English