पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूतल्या कन्याकुमारीला देणार भेट
Posted On:
28 FEB 2019 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूतल्या कन्याकुमारीला भेट देणार आहेत. यावेळी ते कन्याकुमारी आणि तामिळनाडूसाठीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. हे प्रकल्प तामिळनाडूतील रेल्वे आणि रस्ते जोडणीच्या कामात महत्वपूर्ण ठरणार आहेत. पंतप्रधान कन्याकुमारी इथे विविध रेल्वे प्रकल्पांचाही शुभारंभ करणार आहेत. यामधे मदुराई ते चेन्नई दरम्यानच्या तेजस एक्सप्रेसला ते हिरवा झेंडा दाखवतील. रामेश्वरम ते धनुकोडी दरम्यान रेल्वे जोडणी पुनर्स्थापित करण्याच्या प्रकल्पाची पायाभरणीही करतील. पम्बन रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.
2995 कोटी रुपये खर्चाच्या विविध महामार्ग प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करतील. कन्याकुमारी येथे उद्या पंतप्रधान 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. तसेच रस्ता सुरक्षा उद्यान आणि वाहतूक संग्रहालयाचाही शुभारंभ पंतप्रधान करतील.
या प्रकल्पांमुळे प्रदूषण कमी होईल तसेच वेगवान आणि सुरक्षित प्रवास शक्य होईल आणि प्रवासाच्या वेळेत बचत होऊन इंधनाचीही बचत होईल.
B.Gokhale/J.Patankar/D. Rane
(Release ID: 1566911)
अभ्यागत कक्ष : 95