Posted On:
27 FEB 2019 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2019
आयएसएल म्हणजे इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी या सांकेतिक भाषा शब्दकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रकाशन झाले. दिव्यांगांच्या सबलीकरण विभागांतर्गत येणाऱ्या भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने हा शब्दकोश आणला आहे. पहिल्या आवृत्तीत या शब्दकोशात 3000 शब्द होते. दुसऱ्या आवृत्तीमधे शैक्षणिक, विधी, वैद्यकीय, तंत्रविषयक आणि दैनंदिन वापरातल्या अशा एकूण 6000 शब्दांचा समावेश आहे.
आयएसएलआरटीसी अर्थात भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनेलवरही हा शब्दकोश उपलब्ध आहे. या आधीच सुमारे 1000 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत आणि उर्वरित युट्यूबवर अपलोड करण्यात येत आहेत.
देशातल्या कर्णबधिरांसाठी उपयुक्त शब्दकोश आणण्यासाठी आयएसएलआरटीसीच्या प्रयत्नाची गेहलोत यांनी प्रशंसा केली. आयएसएल शिक्षक, कर्णबधीरांसाठीचे शिक्षक, कर्णबधीर मुलांचे पालक यांना हा शब्दकोश उपयुक्त ठरणार आहे.
N.Sapre/N.Chitale/D. Rane